चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे. येत्या आठ दिवसांत या भागातील शेतकऱ्यांना गोसे खुर्द प्रकल्पाचे पाणी उपलब्ध करून दिलासा देण्याचे आश्वासन विधानसभेचे विरोधी पक्षेनेते विजय वडेट्टीवार यांनी दिले.
ब्रह्मपुरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, की गेल्या वर्षी आतापर्यंत ३९० मिलिमीटर पाऊस झाला होता. या वर्षी २१० मिलिमीटर इतकाच पाऊस पडला आहे. पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, धानउत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे. त्याची दखल घेत गोसे खुर्द प्रकल्पाचे पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वडेट्टीवार म्हणाले, की पहिल्या टप्प्यात सुमारे चार हजार ३०० एकर शेतीला पाणी दिले जाईल. सध्या ४३ हजार एकराकरिता पूर्ण हंगामभर पुरेल एवढा जलसाठा गोसे खुर्द प्रकल्पात उपलब्ध आहे. त्यामुळे धान उत्पादकांनी घाबरून जाऊ नये. गोसे खुर्दच्या कामाला गती प्राप्त व्हावी. यासाठी या वर्षी १०७० कोटी रुपयांच्या निविदा काढण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. जर मी पूर्ण वेळ मंत्री असतो तर सध्याचे चित्र फार वेगळे असते. एक वर्ष मंत्री असताना राष्ट्रीय प्रकल्प म्हणून गोसे खुर्दसाठी चार हजार ९०० कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. त्यामुळेच गोसखुर्दच्या कामाला गती मिळाली. २०२० च्या हंगामात ब्रह्मपुरी परिसरातील काही भागात दुबार पिकासाठी पाणी देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे गोसे खुर्द प्रकल्प या भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.
बारामतीपेक्षा अधिक सिंचनक्षमता बारामतीपेक्षा व महाराष्ट्रात सर्वांत मोठी सिंचनक्षमता ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात उपलब्ध होणार असल्याचा दावा आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. ८०-८२ तलाव गोसे खुर्दच्या कालव्यांना जोडत ही सिंचनक्षमता निर्माण केली जाणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.