Heavy rains hit 58,000 hectares of crops in Solapur district
Heavy rains hit 58,000 hectares of crops in Solapur district  
मुख्य बातम्या

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा ५८ हजार हेक्टर पिकांना तडाखा

टीम अॅग्रोवन

सोलापूर : गेल्या दोन दिवसात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना निर्माण झालेली पुराची स्थिती शनिवारी (ता. १७) काहीशी ओसरली आहे. पण, घरे आणि शेतीचे नुकसान मात्र वाढले आहे. आतापर्यंत सुमारे ५८ हजार ५८१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तर, सुमारे ८२९ जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. तसेच जिल्ह्यातील ८ हजार कुटुंबांतील ३२ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. 

पावसामुळे जिल्ह्यातील भीमा, नीरा, सीना, भोगावती, बोरी या प्रमुख नद्यांच्या परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पूरस्थिती आहे. पात्र सोडून या नद्या वाहू लागल्याने शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. पंढरपूर, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी या तालुक्यांना पाऊस आणि पुराचा मोठा फटका बसला आहे. 

या पावसात जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, भाजीपाला, डाळिंब, कांदा, तूर, भुईमूग, बाजरी, ज्वारी, द्राक्ष मका आदी पिकांना फटका बसला आहे. १४८ लहान आणि ६८१ मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. अनेक गावे आणि घरांनाही मोठा तडाखा बसला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २ हजार २५६ घरांची पडझड झाली आहे. तर, ८ हजार ६०८ कुटुंबांतील ३२ हजार ५२१ लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.   

पंढरपुरातही चंद्रभागा नदीचे रौद्ररूप अनुभवायला मिळाले. गुरुवारपासून नदी पात्र सोडून वाहू लागल्याने अवघी पंढरी जलमय झाली. त्यामुळे नदीतील होड्या शहरातील रस्त्यावर आल्या. 

उजनी आणि वीर या दोन्ही धरणामधून भीमा नदीत पाणी सोडल्याने पुराची स्थिती निर्माण झाली आहे. परंतु, शनिवारी (ता.१७) मात्र या दोन्ही धरणाकडील विसर्ग कमी झाला. संगमहून पुढे पंढरपुरात कालपर्यंत जवळपास अडीच लाख क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग होता. पण, शनिवारी तो केवळ ४० हजार क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला. तर, वीर धरणाकडूनही १७ हजार क्युसेक एवढेच पाणी येत होते. त्यामुळे पंढरपुरात ५७ हजार क्युसेकपर्यंत पाणी राहिले. पूरस्थिती काहीशी ओसरली. 

दक्षिण सोलापूर, माढ्यात घरांत पाणी

दक्षिण सोलापुरातील सीना व भीमा नदीला महापूर आल्याने तालुक्यातील दोन्ही नदीकाठच्या गावांना झळ बसली आहे. तालुक्यातील राजूर, संजवाड, वांगी, मनगोळी, खानापूर, तेलगाव व औज गावाचा संपर्क तुटला आहे. राजूर येथील ५७ व हत्तूरजवळील चंद्रहाळ येथील २६ लोकांना एनडीआरएफच्या जवानांनी सुरक्षित स्थळी हलवले. माढ्यात सीना  नदीकाठावरील दारफळ, उंदरगाव,वाकाव, खैराव, कुंभेज येथील घरांमध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT