नाशिक : गत सप्ताहापासून पावसाने दडी दिल्याने शेतकऱ्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मात्र, जिल्ह्याच्या पूर्व भागात प्रामुख्याने नांदगाव व मालेगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याचे दिसून आले. तर येवल्याच्या पूर्व भागातही रविवारी (ता. २८) काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
जिल्ह्यात आत्तापर्यंत चार लाख हेक्टर क्षेत्रावर एकूण ६१ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक पेरण्या या सटाणा, नांदगाव, मालेगाव, देवळा व येवला तालुक्यात झालेल्या आहेत. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा होती. आता पिके जोमाने उभी राहण्याच्या कालावधीत पावसाने दडी दिल्याने पिके कोमेजू लागली होती.मात्र, या पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मालेगाव तालुक्याच्या शहर परिसरसह पूर्व भागात झोडगे व निमगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. तर पश्चिम भागात कौळाणे, सायने, दाभाडी परिसरातील अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. नांदगाव तालुक्यातील शहर परिसरसह सर्वदूर जोरदार पाऊस झाला. पूर्व भागात साकोरे, मूळडोंगरी, चांदोरे, नाग्यासाक्या धरण व हिंगणवाडी परिसरात शेतांमधून पाणी साचून वाहिले. येवला तालुक्याच्या पूर्व भागात दोन पाऊस दमदार झाले आहेत.
अंदरसुल मंडळात पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली; मात्र पश्चिम भागात अद्यापही पावसाची वाट पहावी लागत आहे. सटाणा तालुक्यातील लाडुद परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर काही भागांमध्ये हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे संकट कमी झाले आहे. सटाणा व देवळा तालुक्यातील अनेक भागात पावसाची वाट पाहावी लागत आहे.
नाशिक तालुक्यातील अनेक भागात दमट वातावरण होते.पाऊस येईल, अशी शेतकाऱ्यांना अपेक्षा असताना पावसाने दांडी मारली. दिंडोरी, कळवण, देवळा, पेठ, सुरगाणा, सिन्नर तालुक्यातही हीच परिस्थिती आहे. निफाड तालुक्यातील अनेक भागांमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. गोदाकाठ परिसरात पाऊस पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या असून दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर आहे.सिन्नर तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन व मका पेरणी वाया जाण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मंडळनिहाय झालेला पाऊस (मिमी मध्ये) ः येवला तालुका ४, सावरगाव २, अंदरसुल १८. नांदगाव तालुका ः नांदगाव, ४३ मनमाड ५, वेहेळगाव १९, जातेगाव ७, हिसवळ ५. मालेगांव तालुका ः मालेगांव ३४, दाभाडी ४, वडनेर २, झोडगे ६५, कळवाडी १२, कोळाने ४२, सायने १८, निमगाव ३८.
तालुकानिहाय झालेला एकूण पाऊस | ||
तालुका | पाऊस (मिमी | सरासरी |
नांदगाव | ७९ | १५.८ |
मालेगाव | २१४ | २१.४० |
येवला | २४ | ४ |
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.