गंगापूरकर जलसंधारणासाठी पाहणार नाहीत शासनाची वाट... 
मुख्य बातम्या

गंगापूरकर जलसंधारणासाठी पाहणार नाहीत शासनाची वाट...

विकास गाढवे 

लातूर : दुष्काळ असो की सुकाळ, ही जलसंधारणाची अखंड चळवळ सुरू करण्यासाठी चौदा वर्षांनंतर पुन्हा गंगापूरकरांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वार्षिक वर्गणीची संकल्पना पुढे आणत पहिल्याच दिवशी पन्नास हजारांचा निधी जमवला.    पाणीटंचाई व दुष्काळ निवारण हे केवळ सरकारचेच काम नसून, त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी योगदान दिलेच पाहिजे, ही संकल्पना तत्कालीन जिल्हा उपनिबंधक संतोष पाटील यांनी गंगापूर (ता. लातूर) गावात चौदा वर्षांपूर्वी रुजवली. गंगापूरची प्रेरणा घेऊन जिल्ह्यात लोकसहभागातून जलसंधारणाच्या चळवळीला सुरवात झाली. मात्र, दुष्काळ आला की जलसंधारणाची कामे, असेच रूप चळवळीला झाले. यामुळे दुष्काळ असो की सुकाळ, ही जलसंधारणाची अखंड चळवळ सुरू करण्यासाठी चौदा वर्षांनंतर पुन्हा गंगापूरकरांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वार्षिक वर्गणीची संकल्पना पुढे आणत पहिल्याच दिवशी पन्नास हजारांचा निधी जमवला. जमिनीतील पाण्याचा वारेमाप उपसा करून आपणच निर्माण केलेला दुष्काळ आपणच परतवून लावावा लागेल, या निर्धारातून दुष्काळाची अखंड सामना कररण्यासाठी पक्षीय भेद बाजूला ठेऊन गंगापूरकरांनी पुन्हा जलसंधारणाच्या माध्यमातून जिल्ह्यापुढे आदर्श ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. गावात नवीन वर्षानिमित्त झालेल्या बैठकीत यासाठी नियोजन करण्यात आले. जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय बनसोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हनुमंतराव खंदाडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुधाकर शिंदे,  डॉ. सतीश कानडे, बाबू खंदाडे, बच्चेसाहेब शिंदे, सुग्रीव वाघे, दगडू भेटेकर, दंडिमे गुरुजी, प्रवीण मूळे, उद्धव देशमाने, गोरोबा फुटाणे व ग्रामस्थ उपस्थित होते.

जलसंधारण अन् गंगापूर चौदा वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) संतोष पाटील यांनी दुष्काळ निवारणासाठी सहकारी संस्थांच्या नफ्यात निधीची तरतूद करण्याचा पायंडा पाडला. काही सहकारी संस्थांकडून जलसंधारण निधीही जमवला. जलसंधारणाच्या कामासाठी गंगापूरची निवड करून गटसचिवांना सोबत घेऊन सिमेंट बंधाऱ्यातील गाळाचा श्रमदानातून उपसा केला. ग्रामस्थांच्या प्रतिसादानंतर चळवळ व्यापक होऊन अनेक वर्षे टंचाईने ग्रासलेले गाव टंचाईमुक्त झाले. पाटील यांनी दिलेला वसा अनेक वर्षे ग्रामस्थांनी चालवला. गंगापूरकरांनी एकत्र येऊन सुरू केलेली जलसंधारणाची चळवळ हळूहळू जिल्हाभर पोचली. चौदा वर्षांत दुष्काळ आला की जलसंधारणाची कामे, असेच स्वरूप चळवळीला आले.

देखभाल दुरुस्तीचा नवा फंडा जिल्ह्यात मागील काही वर्षांत गाळाचा उपसा, नदी व नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे अनेक कामे झाली. मात्र, एकदा कामे झाल्यानंतर त्याकडे कोणी पाहिलेच नाही. पाऊस पडून गेला की या कामांचे महत्त्व संपून गेले. पुन्हा गाळ साचून कामात पाणी साठणे बंद झाले. यामुळेच कामांच्या देखभाल दुरुस्तीचा (मेंटनन्स) नवा फंडा गंगापूरकरांनी पुढे आणला आहे. चौदा वर्षांनंतर गंगापुरात पुन्हा पाण्याचा वनवास सुरू झाला आहे. यामुळे पाण्याचा मोठा वापर करणाऱ्या बागायतदार शेतकऱ्यांकडून एकरी किमान दोनशे रुपये तर अन्य शेतकरी तसेच घटकांकडून ऐच्छिक वार्षिक वर्गणी जमा करायची आणि त्यातून जलसंधारणाची चळवळ कायम सुरू ठेवायची, असा हा फंडा आहे. यात पूर्वीच्या कामात पाणी साठवण्याची क्षमता पुनरुज्जीवन करण्यासाठी गाळाचा उपसा डागडुजी करण्यासह वृक्ष लागवड करण्याचे नियोजन आहे. 

पाटलांचा वसा तेव्हाही अन् आताही.. चौदा वर्षांपूर्वी पाटील यांनी जलसंधारणाच्या कामातून गंगापूरकरांशी निर्माण झालेले नाते आजही कायम आहे. सध्या सहकारमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी असलेल्या पाटील यांनी गंगापूरकरांनी सुरू केलेल्या अखंड चळवळीला चालना देत स्वतः पाच हजार रुपयांचा निधी दिला. पाण्याचा पिकांसाठी तसेच केवळ पिण्यासाठी वापर करणाऱ्या गावातील अनेकांनी ऐपतीप्रमाणे निधी देण्याची तयारी दाखवली. ग्रामस्थांची चौदा वर्षांपूर्वी केलेली मानसिकता आजही कायम असल्याचे पाहून पाटील भारावून गेले. यामुळे त्यांनी जलसंधारणाचा नव्या रूपात दिलेला वसा पुढे नेण्यासाठी गंगापूरकर एकत्र आले आहेत. यामुळे गावात यापुढील काळात दुष्काळ पाय ठेवण्याची हिंमत करणार नाही, असेच चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT