सध्या शेतकऱ्यांना खतांच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुकानदार खते उपलब्ध नसल्याचे सांगतो आणि शेतकऱ्यांना पुन्हा पायपीट करावी लागते. खतांची खरच टंचाई आहे का? कोणती खते उपलब्ध आहेत? याची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे त्यांची पिळवणूक होते. परंतु आता आपल्या जिल्ह्यात तसेच जवळच्या दुकानात कोणती आणि किती प्रमाणात खते उपलब्ध आहेत याची माहिती थेट आपल्या संगणक किंवा मोबाईलमधून मिळणार आहे. हो! हे खरं आहे. केंद्राने देशभरातील कृषी निविष्ठा केंद्रांमधील दैनंदिन साठ्याची माहिती उपलब्ध करून दिली आहे. पीक हंगाम सुरू झाला की रासायनिक खतांची मागणी वाढते. मागणी वाढली कि खतांचा पुरवठा वाढविण्यासाठी स्थानिक प्रशासनाची धावपळ सुरू होते. या धावपळीत मात्र शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. काही वेळेला सोसायटीत खतांसाठी ट्रॅक्टर घेऊन गेलेला शेतकऱ्याला दुकानदार खत संपल्याचे सांगतो आणि त्याला खत न घेताच परत यावे लागते. मग प्रश्न हा निर्माण होतो कि खतांची टंचाई खरच आहे का? याची माहिती असणे गरजेचे आहे. समजा तुम्हाला RCF चा युरिया आणि IFFCO चा डीएपी हवा आहे. परंतु तुम्ही ज्या गावात आहात. त्या गावात किंवा जवळच्या गावात खत विक्रीचे दुकान असेल तर तिथे खरेदीला जाण्यापूर्वीच तुम्ही त्या दुकानाचा रासायनिक खतांचा साठा किती आहे तो online पाहू शकता. मग ते कसं शोधाचं? सोप आहे, त्यासाठी तुम्हाला तुमच्या संगणक किंवा मोबाईलवर urvarak.nic.in ही इंटरनेट लिंक टाईप करा आणि तुम्हाला याची सविस्तर माहिती तुमच्या स्क्रिनवर दिसायला सुरू होईल. त्यानंतर DOF Dashboard हा पर्याय निवडल्यास आपल्याला देशातील राज्यांमध्ये मागणीनुसार खते उपलब्ध आहेत, कि नाही याची माहिती मिळते. ओपन झालेल्या वेबसाईटवर स्क्रीनवरील ‘Kisan Corner’ या पर्याय निवड करा. तुम्ही ज्या राज्यात व जिल्ह्यातील दुकानांची माहिती शोधू इच्छिता त्यानुसार राज्य व जिल्हा निवडा. त्यानंतर तुम्हाला माहिती असेल तरच Retailer ID टाईप करा परंतु जर तुम्हाला रिटेलरचा नंबर व एजन्सी नेम माहिती नसेल तरी काही हरकत नाही. त्यानंतर तुम्ही ‘Show’ बटनावर क्लिक करून थोडावेळ थांबा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील सर्व खत विक्रेत्यांच्या दुकानांची यादी दिसायला सुरू होईल. या यादीमध्ये तुम्ही निवडलेल्या जिल्ह्यातील सर्व दुकानदारांच्याकडे उपलब्ध असलेल्या युरिया, डीएपी, एसएसपी, एमओपी, एनपीके, कंपोस्ट खतांची उपलब्धता दिसून येईल. त्यातील आपणास आवश्यक असलेल्या विक्रेत्याच्या Retailer ID वर क्लिक केल्यास तुम्हाला तुमच्या स्क्रिनवर निवडलेल्या त्या दुकानदाराकडील खतांची सविस्तर माहिती म्हणजेच Retailer Opening Stock as on Today उपलब्ध होईल. तुम्ही ज्या दुकानदाराच्या Retailer ID वर क्लिक कराल त्याच्याकडे कोणत्या कंपनीची, कोणत्या प्लांटची खते उपलब्ध आहेत, त्या खतांची टनांतील किंमत आणि उपलब्ध साठा याची माहिती मिळते. सदरची माहिती ही दररोज अपडेट होत असते. भारत सरकारच्या NIC कडून ही माहिती अद्यावत केली जाते. प्रत्येक दिवशी ही माहिती तुम्हाला त्या दिवसाचा संबंधित रिटेलरचा साठा दर्शवित असते. या मध्ये रिटेलर तथा विक्रेत्या जवळ कोणत्या कंपनीचे, कोणत्या प्लांटमधून व कोणती रासायनिक खते किती प्रमाणात दुकानात उपलब्ध आहेत, माहिती दर्शविली जाते. समजा तुम्हाला RCF चा युरिया खरेदी करावयाचा आहे व त्या निवडलेल्या दुकानात तो युरिया प्रोडक्टच शिल्लक नसेल तर दर्शविल्या जात असलेल्या माहितीमध्ये तुम्हाला तो प्रोडक्ट दिसणार नाही. इथे फक्त तुम्हाला त्या दुकानातील शिल्लक असलेल्या खतांचा साठा दर्शविला जातो. त्यामुळे ज्या दुकानात तुम्हाला हवे असलेले खत नसेल तर तुम्ही त्या दुकानात खत खरेदीसाठी जाण्याची गरज नाही. दुकानदार खते नाकारू शकत नाही शेतकऱ्यांना गरज असलेल्या रासायनिक खतांची माहिती तत्काळ उपलब्ध होते. त्यासाठी कोणत्याही पासवर्ड अथवा लॉग इनची गरज नाही. या माहितीमुळे शेतकरी वर्गाचा वेळ वाचतो, अनावश्यक मेहनत वाचते. तसेच एखादा दुकानदार खत शिल्लक नाही, असे म्हणू शकत नाही. कारण तुम्ही त्यांना या माहितीच्या आधारे उलट प्रश्न विचारू शकता आणि यातून अनावश्यक कृत्रिम टंचाई नाहीशी होण्यास मदत होईल. खरेदीचे बिल घ्या शेतकरी मित्रांनो, इथून पुढे रासायनिक खतांच्या खरेदीला जाण्यापूर्वी या माहितीचा जास्तीत जास्त वापर करून तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी, योग्य ती रासायनिक खते खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. तसेच कोणत्याही रासायनिक खतांची खरेदी करताना Point of Sale (PoS) मशिनद्वारे निर्मित झालेले खत खरेदीचे बिल घेण्यास कधीच विसरू नका.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.