वाशीम : उन्नत शेती - समृद्ध शेतकरी या मोहिमेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान २०१७-१८ अंतर्गत जिल्ह्यासाठी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यातून अवजारे बँक स्थापन करण्यासाठी दोन लक्ष्यांक मिळाले आहेत.
एकूण खर्चाच्या ४० टक्के शासकीय अनुदान दिले जाणार आहे. जिल्ह्यासाठी १० लाखापर्यंतचे ४० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यास एक लक्ष्यांक प्राप्त आहे. तसेच २५ लाखांपर्यंतची अवजारे बँक स्थापन करणाऱ्यास १० लाख रुपयांपर्यंतचे ४० टक्के अनुदान मिळू शकणार आहे. यासाठी देखील एक लक्ष्यांक प्राप्त आहे.
जिल्ह्यातून अद्यापपर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात अवजारे बँकेसाठी एकच अर्ज प्राप्त झालेला आहे. यासाठी यंत्र अवजारांचे कोटेशन व तपासणी प्रमाणपत्र, संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र व लाभार्थी अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असल्यास जातीचे वैध प्रमाणपत्र, आधार कार्ड, संलग्न बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची छायांकित प्रत आदी कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे बुधवारपर्यंत (ता. २५) सादर करावेत, तसेच याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी यांनी केले आहे.
जिल्ह्यास देण्यात आलेल्या लक्ष्यांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता. ३१) सकाळी ११ वाजता लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.