मढी येथील गाढवांचा बाजार
मढी येथील गाढवांचा बाजार 
मुख्य बातम्या

दुष्काळामुळे गाढवांच्या खरेदी-विक्रीवर परिणाम

टीम अॅग्रोवन

मढी, जि. नगर  ः राज्यात यंदा गंभीर दुष्काळाचे सावट आहे. भटक्यांची पंढरी असलेल्या मढी (ता. पाथर्डी) येथे कित्येक पिढ्यांपासून प्रसिद्ध असलेल्या गाढवांच्या बाजारावरही यंदा दुष्काळाचा परिणाम झाला आहे. मुळात राज्यासह देशाच्या अनेक भागांतून येथे होणारी गाढवांची आवक गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यावर आली आहे. शिवाय खरेदी-विक्रीही फारशी होताना दिसत नाही. बाजारात यंदा फारसा उत्साह दिसला नाही. 

भटक्यांची पंढरी अशी मढीच्या यात्रेची ओळख आहे. नवनाथांपैकी एक असलेल्या श्री कानिफनाथ महाराज यांची येथे संजीवन समाधी असल्याने देशासह राज्यभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यात भटक्या समाजातील भाविकांची संख्या अधिक असते. मढी येथे होळी ते गुढीपाडवा या काळात यात्रा भरते. यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे रंगपंचमीला येथे गाढवांचा बाजार भरतो. साधारण तीन दिवस हा बाजार सुरू असतो.

या बाजारात खरेदी-विक्रीसाठी महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेशासह अन्य भागांतून गाढवे विक्रीसाठी येतात. दरवर्षी साधारण तीन ते चार हजार गाढवांची येथे आवक होत असते. यंदा राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती आहे. त्याचा परिणाम शेती, सामाजिक जीवनावर झालेला आहे. तसाच परिणाम मढीतील गाढवांच्या बाजारावर झालेला आहे. दरवर्षी येथे साधारण साडेतीन ते चार हजार गाढवे विक्रीला येतात यंदा केवळ एक हजार गाढवांची आवक झालेली आहे. त्यातही बाहेरील राज्यातून मोजकीच गाढवे दाखल झाली आहेत.

बाजारातून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील गाढवांच्या बाजारात मढीचा बाजार महत्त्वाचा आहे. याशिवाय जेजुरी, माळेगाव (नांदेड), जुन्नर, उज्जैन येथे गाढवांचा बाजार भरतो. यंदा येथे काठेवाडी (राजस्थान) गाढवाला १० हजारांपासून पंचवीस हजारांपर्यंत दर मिळत आहे. तर महाराष्ट्रीयन गाढवाला पंधरा हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. मात्र दरवर्षीच्या तुलनेत यंदा फारसे सौदे होताना दिसत नाहीत. दुष्काळाचा आणि कामे नसल्याचा बाजारावर परिणाम झाला आहे, असे बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील आकाश बोरुडे यांनी सांगितले. 

राज्यात पूर्वी वाळू वाहतूक, शेतातील बांधबंदिस्ती, दगड वाहतूक यांसह विविध कामांसाठी गाढवांचा वापर केला जात असे. आता मात्र अशा कामांसाठी यंत्रांचा वापर केला जात आहे. त्यामुळे आपसूकच गाढवांची संख्या घटली आहे. त्याचाही यंदा बाजारावर परिणाम झाला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : कोकणातील रानमेवा हंगामदेखील लांबणीवर

Education Fund : रानमसलेच्या प्राथमिक शाळेसाठी ‘लक्ष्मी’कडून सव्वा कोटींचा निधी

Lake Conservation : जैवविविधतेच्या बळावर ‘त्या’ करतात तलावाचे संवर्धन

Lemon Rate : लिंबाचे दर पोहोचले ६,५०० रुपयांवर

Hirda Picking : जुन्नर तालुक्यात हिरडा गोळा करण्याची लगबग

SCROLL FOR NEXT