cotton planting  
मुख्य बातम्या

देशात यंदा कापूस लागवड वाढणार

देशात २०२०-२१च्या हंगामात कापसाचे उत्पादन ४०० (एक गाठ १७० किलो रुई) लाख गाठींपर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. कापूस लागवडही सुमारे सात लाख हेक्‍टरने वाढणार आहे.

Chandrakant Jadhav

जळगाव ः देशात २०२०-२१च्या हंगामात कापसाचे उत्पादन ४०० (एक गाठ १७० किलो रुई) लाख गाठींपर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. कापूस लागवडही सुमारे सात लाख हेक्‍टरने वाढणार आहे. परंतु, कोरोना व वित्तीय संकटांमध्ये देशांतर्गत वस्त्रोद्योगात कापसाचा वापर कमी म्हणजेच सुमारे २९८ लाख गाठींपर्यंत होऊ शकतो, असे संकेत जाणकारांनी दिले आहेत. देशात मागील हंगामात (२०१९-२०) कापसाची १२२ लाख हेक्‍टरवर लागवड झाली होती, तर सप्टेंबर २०२० पर्यंत ३३० लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज आहे. नव्या हंगामातील कापूस उत्पादनासंबंधी युनायटेड स्टेट्‌स डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर (यूएसडीए), भारतातील कापूस सल्लागार मंडळ, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आदी संस्थांनी आपापले अंदाज जाहीर केले आहेत.   ‘यूएसडीए’नुसार देशात नव्या हंगामात ३७५ लाख गाठींचे उत्पादन होऊ शकते, तर कापूस सल्लागार मंडळानुसार देशात ४०० लाख गाठींचे उत्पादन मिळणार आहे. याचे कारण म्हणजे देशात कापसाची लागवड यंदा वाढणार आहे. शिवाय, अनेक कापूस उत्पादक राज्यांमध्ये मोसमी पावसाचे वेळेत आगमन झाले आहे. तसेच, सरकारने कापसासाठीचा हमीभाव पाच टक्‍क्‍यांनी वाढविला आहे. मागील हंगामात ५४५० व ५५५० रुपये प्रतिक्विंटल असा दर अनुक्रमे मध्यम व लांब धाग्याच्या कापसासाठी शासनाने निश्‍चित केला होता. तेलंगणात यंदा लागवड अधिक झाली आहे. मागील हंगामात ११ जूनपर्यंत तेलंगणात दीड लाख हेक्‍टरवर लागवड झाली होती. यंदा तेथे ११ जूनपर्यंत दोन लाख ३७ हजार हेक्‍टरवर लागवड झाली असल्याचा मुद्दा ‘यूएसडीए’ने आपल्या अहवालात नमूद केला आहे. गाठींचा वापर कमी होणार जगात भारतीय वस्त्रोद्योग क्रमांक दोनवर आहे. पहिल्या क्रमांकावर चीन, त्यापाठोपाठ भारत, बांगलादेश व व्हिएतनाममध्ये सूत, कापडाचे चांगले उत्पादन घेतले जाते. देशात यंदा कोरोनामुळे २०१८-१९ च्या तुलनेत वस्त्रोद्योगाची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. पुढेही देशातील वस्त्रोद्योगाला ‘कोरोना’चा सामना करावा लागणार आहे. या स्थितीत देशात २९८ लाख गाठींचा वापर होऊ शकतो. एरवी देशातील वस्त्रोद्योगाला ३१५ ते ३२० लाख गाठींची गरज असते. परंतु, वस्त्रोद्योग १०० टक्के क्षमतेने कार्यरत राहणार नाही, असा अंदाज अजूनही आहे. 

निर्यात वाढणार देशातून कापसाची निर्यात मात्र पुढील हंगामातही वाढणार आहे. ही निर्यात किमान ४५ ते ५० लाख गाठींपर्यंत पोचू शकते. गाठींची सर्वाधिक निर्यात बांगलादेशात होईल. त्यापाठोपाठ चीन, व्हिएतनाम, तुर्कीमध्ये गाठींची निर्यात होणार आहे. बांगलादेशात सुमारे २५ ते ३० लाख गाठींची निर्यात होण्याची अपेक्षा जाणकारांनी व्यक्त केली आहे. देशातील वस्त्रोद्योगात कापसाचा वापर कमी होऊ शकतो. कारण, ‘कोरोना’चे संकट दूर झालेले नाही. सूतनिर्यातीसंबंधी अडचणी आहेत. शिवाय, कापड उद्योगालाही फटका बसत आहे. यंदा लागवड व उत्पादन वाढेल. यामुळे बाजारात कापूस मुबलक प्रमाणात राहील. त्याचा उठाव कसा राहील, हे मात्र आता स्पष्ट करता येणार नाही.  - दीपक पाटील, अध्यक्ष, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, उंटावद होळ, जि. नंदुरबार​  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT