कापूस आयात
कापूस आयात 
मुख्य बातम्या

रुपया घसरल्याने कापूस आयात घटली

Chandrakant Jadhav

जळगाव ः डॉलर रुपयाच्या तुलनेत मजबूत असल्याने यंदाच्या कापूस हंगामात (ऑक्‍टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८) कापूस आयातीवर मोठा परिणाम झाला आहे. परकीय कापूस खंडी (३५६ किलो रुई) भारतीय आयातदारांना जवळपास ६० हजार रुपयांत पडत असल्याने आयात मागील वर्षाच्या तुलनेत घटली आहे. यंदा फक्त २१ लाख गाठींची आयात होईल, असे संकेत वस्त्रोद्योगातील जाणकारांकडून मिळत आहेत.  निर्यात तसेच देशांतर्गत मिलांकडून मागणी चांगली असल्याने फारशा गाठी शिल्लक राहणार नाहीत. अनेक वर्षांनंतर देशातील शिलकी साठा घटला आहे. 

मागील वर्षी दिवाळीच्या वेळेस डॉलर रुपयाच्या तुलनेत काहीसा नरमाईच्या स्थितीत होता. ६३ रुपये प्रतिडॉलर, असे दर होते. त्याच काळात गुलाबी बोंड अळीचा कहर झाल्याने दर्जेदार रुईचा तुटवडा देशांतर्गत बाजारात निर्माण झाला आणि मिलांनी आयातीवर भर दिला. त्या वेळेस भारतीय खंडी ३८ ते ३९ हजार रुपयांत मिळत होती. तर अमेरिकन, ऑस्ट्रेलियातील दर्जेदार कापसाची खंडी ४० ते ४१ हजार रुपयांत पडत होती. सरकीचे दरही १४५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. आयात परवडत असल्याने मिलांनी धडाका लावला. सर्वाधिक आयात यंदाच्या कापूस हंगामात देशांतर्गत वस्त्रोद्योगात होईल, असेही मानले जात होते. परंतु जानेवारीपासून डॉलर वधारत गेला. मध्यंतरी तर डॉलरचे दर ६९.७० रुपयांपर्यंत पोचले. मागील दोन महिन्यांपासून डॉलरचे दर ६८ रुपयांपर्यंतच आहेत. अशातच सरकीचे दर २००० रुपये प्रतिक्विंटल पुढे पोचले आणि कापसाचे दरही वधारले. मागील दोन महिन्यांपासून भारतीय खंडीला सरासरी ४७ हजार ५०० रुपये दर मिळाला आहे. तर परकीय रुईला सध्या ५८ हजार ते ६० हजार रुपये प्रतिखंडी असा दर आहे. परकीय रुई खरेदीचे सौदे जवळपास बंदच आहेत. 

परकीय रुई परवडत नसल्याने देशांतर्गत रुईचा उठाव वाढला. यामुळे कॅरी फॉरवर्ड (शिलकी गाठी) संबंधीचे अंदाज चुकले असून, ४० लाख गाठी शिल्लक राहतील, असे म्हटले जात होते. परंतु, आता मागणी लक्षात घेता पुढील हंगामासाठी देशात फक्त सात ते आठ लाखच गाठी राहतील. गेल्या अनेक वर्षांनंतर शिलकी साठा कमी राहणार आहे, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या सदस्यांनी म्हटले आहे. 

लांब धाग्याच्या सात लाख गाठी आयात देशात सुमारे २० लाख गाठींची आयात झाली आहे. त्यात जवळपास सात लाख गाठी पिमा व गिझा प्रकारच्या कापसाच्या आहेत. ३५ मिलीमीटर लांब धाग्याचा कापूस म्हणून पिमा व गिझा प्रसिद्ध आहेत. भारतात मध्य प्रदेश वगळता इतरत्र कुठेही ३५ मिलीमीटर लांब धाग्याचा कापूस फारसा उपलब्ध होत नाही. मध्य प्रदेशातही अत्यल्प उत्पादन घेतले जाते. यामुळे भारताला पिमा व गिझा कापसाची आयात करावी लागली आहे. ही आयात ऑस्ट्रेलिया, तुर्की व अमेरिका येथून झाल्याची माहिती मिळाली. 

पाकिस्तान, बांगलादेशकडून मागणी कायम पाकिस्तानचे चलन रुपया असून, त्यांना एक डॉलर १२२ रुपयांना पडत आहे. बांगलादेशचे चलन टाका असून, त्यांना सुमारे ८७ टाका एक डॉलरसाठी मोजावे लागत आहेत. यामुळे त्यांनी कापूस आयातीसाठी भारताला पसंती दिली असून, सुतासह रुईची मोठी निर्यात तेथे सुरू आहे. बांगलादेशात जवळपास ३५ लाख गाठींची निर्यात भारतातून झाली आहे. तर पाकिस्तान भारतीय सुताचा दुसऱ्या क्रमांकाचा खरेदीदार देश ठरला आहे.   

शिलकी (कॅरी फॉरवर्ड) गाठींची स्थिती  (एक गाठ १७० किलो रुई)

२०१४-१५  ६६.२३
२०१५-१६     ३६.४४
२०१६-१७        ४७.८१ 
२०१७-१८ सात ते आठ (अपेक्षित)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

Horticulture : ‘कोठली’ला मिळाला बागायती चेहरा

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

SCROLL FOR NEXT