Congress' Satej Patil, BJP's Amrish Patel unopposed
Congress' Satej Patil, BJP's Amrish Patel unopposed 
मुख्य बातम्या

काँग्रेसचे सतेज पाटील, भाजपचे अमरिश पटेल बिनविरोध 

टीम अॅग्रोवन

मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या ६ जागा बिनविरोध करण्याचे प्रयत्न सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सुरू होते. दोन्ही बाजूच्या नेत्यांचे प्रयत्न मुंबई, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबारमध्ये फळाला आले. नागपूर आणि अकोल्यात मात्र निवडणूक होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मुंबईत भाजपचे राजहंस सिंह, तर शिवसेनेचे सुनील शिंदे, कोल्हापुरात काँग्रेसचे सतेज पाटील, तर धुळे-नंदुरबारमध्ये भाजपचे अमरिश पटेल हे विधान परिषदेवर बिनविरोध जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कालपासून (गुरुवार) दिल्लीत आहेत. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही आज (शुक्रवारी) दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर फडणवीस आणि पाटील यांची वरिष्ठांशी चर्चा झाली. दुसरीकडे राज्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची आणि फडणवीस, पाटील यांच्यातही चर्चा सुरू होती. मुंबई आणि धुळे-नंदुरबारच्या बदल्यात काँग्रेसला कोल्हापूरची जागा देण्यावर एकमत झाले. त्यानंतर दुपारी दीड वाजता फडणवीस यांनी भाजप नेते धनंजय महाडीक यांना फोन करून भाजप उमेदवार अमल महाडीक यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सांगितले. पक्षादेश आल्याने अमल महाडीक आणि शौमिका महाडीक यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे कोल्हापुरातून काँग्रेस नेते सतेज पाटील यांचि बिनविरोध निवड झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 

धुळे-नंदुरबारमध्ये अमरिश पटेल बिनविरोध  धुळे-नंदुरबारमध्ये भाजपने तगडा उमेदवार दिला. भाजपने अमरिश पटेल यांना रिंगणात उतरवले आहे. तर काँग्रेसकडून नवख्या गौरव वाणी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, धनंजय महाडीक यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि धुळे-नंदुरबारच्या बदल्यात भाजपने काँग्रेसला कोल्हापूरची जगा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गौरव वाणी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील हे स्पष्ट झाले आहे. अशावेळी धुळे-नंदुरबारमधून अमरिश पटेल यांचीही बिनविरोध निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मुंबईत शिवसेनेचे सुनील शिंदे, भाजपचे राजहंस सिंह बिनविरोध  दुसरीकडे मुंबईतून भाजपने राजहंस सिंह यांना उमेदवारी दिली होती. तर शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्यासाठी जागा सोडणाऱ्या सुनील शिंदे यांना विधान परिषदेसाठी संधी दिली आहे. मात्र, काँग्रेस नेते सुरेश कोपरकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्याने मुंबईत निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, कोपरकर यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे राजहंस सिंह आणि शिवसेनेचे सुनील शिंदेही विधान परिषदेवर बिनविरोध जाणार आहेत. 

नागपुरात बावनकुळे विरुद्ध भोयर लढत होणार  भाजपकडून नागपूरची जागाही बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांनी ताठर भूमिका घेतल्यामुळे नागपुरात बिनविरोध निवडणूक होऊ शकली नाही. त्यामुळे नागपुरात आता माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांच्यात निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, नागपूरसाठी भाजपकडून आम्हाला कुठलाही प्रस्ताव आला नाही. या निवडणुकीत कुणाकडे किती नंबर याला काही महत्व नसते. काँग्रेस उमेदवार छोटू भोयर विजयी होतील, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. 

अकोल्यात वंचितचे संख्याबळ निर्णायक  अकोला-बुलडाणा-वाशीम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नाही. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी व अपक्ष मतदार हे विजयाचा ‘जॅकपॉट’ ठरणार आहेत. त्यामुळे दोन्ही उमेदवारांकडून आता त्यांची मनधरणी केली जात असल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, असा सामना यंदा रंगणार आहे. शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बजोरिया विरुद्ध भाजपचे वसंत खंडेलवाल आमनेसामने आहेत. मात्र, या निवडणुकीत विजयाचा ‘मॅजिक आकडा’ गाठण्यासाठी दोन्ही उमेदवारांनी वंचित बहुजन  आघाडीसह अपक्षांची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT