मुंबई: करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत, असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी काल जाहीर केले.
श्री. मदान यांनी सांगितले की, राज्यात करोना विषाणूचा (कोव्हिड- 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगास केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा 10 ऑगस्ट 2005 रोजीच्या निकालानुसार नैसर्गिक आपत्ती अथवा आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगास आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणुकांशी संबंधित प्रभाग रचना, मतदार यादी व प्रत्यक्ष निवडणूक आदी स्वरूपाचे सर्व कार्यक्रम आज, ता.17 रोजी आहे त्या टप्प्यांवर स्थगित केले आहेत.
राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1 हजार 570 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यासाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तसेच नाशिक, धुळे, परभणी व ठाणे महानगरपालिकेतील प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीकरिता मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. वसई- विरार महानगरपालिका, अंबरनाथ, कुळगाव- बदलापूर, वाडी, राजगुरूनगर, भडगाव, वरणगाव, केज, भोकर आणि मोवाड या नऊ नगरपरिषदा/ नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या 15 पंचायत समित्या; तसेच सुमारे 12 हजार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेसंदर्भात कार्यवाही सुरू होती. या सर्व कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. पुढील कार्यवाहीसंदर्भात परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील, असेही श्री. मदान यांनी स्पष्ट केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.