सुपीकतेचा मार्ग गाठू या निसर्गासह शेतीतून :  सुभाष शर्मा
सुपीकतेचा मार्ग गाठू या निसर्गासह शेतीतून : सुभाष शर्मा 
मुख्य बातम्या

सुपीकतेचा मार्ग गाठू या निसर्गासह शेतीतून : सुभाष शर्मा

टीम अॅग्रोवन

१९७५ पासून शेतीमध्ये उतरलो. त्या काळात प्रचलित झालेल्या रासायनिक खते आणि कीडनाशकांचा वापर करीत शेतीला सुरवात केली. सुरवातीचा चांगले उत्पादन मिळाले तरी काही तरी चुकतेय याची जाणीव होत होती. रासायनिक शेती म्हणजे विनाशाची शेती या निष्कर्षापर्यंत पोचलो. कारण त्यात केवळ पीक सोडून प्रत्येक गोष्टीच्या विनाशाला प्राधान्य देण्यात येत होते. त्यानंतर १९८४ पासून निसर्गाच्या शेतीकडे वळलो. त्यात केवळ निर्मिती आणि निर्मितीच दिसत गेली. निसर्गातील कोणत्याही सजीवाला मारण्याचा विचार त्यात नाही. त्यामुळे त्याला मी निर्मितीची शेती असे नाव दिले आहे. १९७५ पासून शेतीला सुरवात केल्यानंतर निसर्ग हा माझा गुरू झाला. त्यात जीवजंतूपासून पाखरे, झाडे पाणी सर्वजण प्रोफेसर झाले. त्यांनी सृष्टीच्या निर्मितीचे ज्ञान दिले, असे मार्गदर्शन  नैसर्गिक शेती करणारे सुभाष शर्मा यांनी येथे केले. 'अॅग्रोवन'च्या तेराव्या वर्धापन दिन निमित्ताने  'जपाल माती, तर पिकतील मोती' या विषयावर पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात मंगळवारी (ता.१७) झालेल्या चर्चासत्राला राज्यभरातील शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर, सुभाष शर्मा, वासुदेव काठे, शास्त्रज्ञ डॉ. अजितकुमार देशपांडे यांची जमीन सुपीकतेवर केलेल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.  श्री. शर्मा म्हणाले, की गेल्या हजारो वर्षापासून हिरवीगार असणारी पृथ्वी केवळ दोनशे तीनशे वर्षामध्ये उजाड करण्याचे काम माणसांनी केले आहे. आज शेतीचा विचार प्रामुख्याने अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून होत आहे. मात्र, कृषी शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र नाही, तर जगण्याचे शास्त्र आहेत. पैसा महत्त्वाचा नाही, तर जीवन महत्त्वाचे आहे. शेती म्हणजे जीवनासाठी कारक अशा घटकांचे उदा. माती, हवा, पाणी आणि बियाणे यांचे शास्त्र होय.

हे शास्त्र टिकविण्यासाठी मी अनुभवातून खालील पद्धती राबविल्या आहेत. १) गोपालन ः  गायींसाठी माझ्या शेतीतील सुमारे दाेन टक्के क्षेत्र ठेवले आहे. सध्याची मुक्त संचार पद्धती राबविल्याने कमी मनुष्यबळामध्ये मोठ्या प्रमाणात गाई पाळणे शक्य झाले आहे. यापासून शेती व माणसांचे पोषण शक्य झाले. गायीचे ताजे शेण म्हणजे उपयुक्त जिवाणूंची खाण असते. या शेणखतामध्ये चुना, पाणी व अन्य घटकांचा वापर करीत खास खत तयार केले. त्याला अलौकिक खत असे नाव दिले आहे. तसेच गोमूत्राचा वापर करून गोसंजीवन खत बनवले आहे. पहिल्या वर्षी एकरी ६०० लिटर, दुसऱ्या वर्षी ४०० लिटर आणि पुढे कायमस्वरूपी फक्त ३०० लिटर प्रति वर्ष दिल्यास जमिनीची सुपीकता चांगली राहत असल्याचा दावा त्यांनी केला.

२) ऑक्सिजन देणारी व अन्य सजीवांच्या वाढीला चालणारी मोठी झाडे शेतीत असली पाहिजे. यांच्या सावलीमुळे १० टक्क्यापर्यंत क्षेत्रातून पिकांचे उत्पादन मिळाले नाही, तरी सूक्ष्मजीव, पक्षी यांचे पोषण होते. ही झाडे आपल्या विभागानुसार फळपिकांची असल्यास त्यातून काही प्रमाणात शेतकऱ्यांनाही उत्पन्न मिळते. माझ्याकडे संत्र्याची १०० झाडे आहेत. त्यातून सावली आणि ओलाव्यामुळे अन्य अनेक सजीवांच्या जगण्याची व्यवस्था होते.

३) शेतीतील पिकांचे आणि वनस्पतींचे नियोजन ः पिकांच्या पोषणासाठी पिकांच्या अवशेषांचा वापर करण्याकडे प्राधान्य लक्ष देतो. तणे काढून त्यांचे आच्छादन केले जाते. हिरवळीच्या खत पिकांची लागवड शेतीतील पिकांसोबतच करण्याची पद्धत तयार केली आहे. त्यामुळे वेगळी जागा व वाया जाणारा वेळ वाचवता आला. त्यात पिकामध्ये ज्वारी, बाजरी अशा बारीक दाण्यांच्या धान्यांचा व बोरू, धैंचा हिरवळीच्या बियांचा समावेश करतो. दोन तास तुरीचे, तर चार तास हिरवळीच्या पिकांचे, चवळी, बाजरी यांचे घेतले जाते. योग्य वाढी झाल्यानंतर ही पिके जमिनीत गाडली जातात. बाजरी दोन वेळा कापून टाकता येते. याचा संपूर्ण शेतामध्ये सुमारे एक फुटाचा थर तयार होतो. ते लवकर कुजण्यासाठी गोसंजीवक टाकून घेतले जाते. यांच्या कुजण्यातून जमिनीला व जिवाणूला सेंद्रिय कर्ब मिळतो. या पद्धतीतून पूर्वी केवळ एकरी पाच क्विंटल मिळणारे तुरीचे उत्पादन वाढून १५ क्विंटलपर्यंत पोचले आहे. आमच्या कपाशीमध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला नाही. कारण शेतीमध्ये येणाऱ्या पतंगाचा पक्ष्यांनी फडशा पाडल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. ४) पाणी ः शेतीमध्ये ओलावा टिकविण्याकडे प्राधान्याने लक्ष दिले. पडणारा पाऊस व त्यामुळे सुपीक मातीची होणारी धूप रोखण्यासाठी बांधबंदिस्तीबरोबरच ८० फुटी बाय १० फुटी लॉकिंग चर तयार केले. शेतीमध्ये केवळ आपणच काम करतो असे नाही, तर आपल्यासोबत झाडे, पशू, पक्षी, कीटक व अन्य सजीवही कामाला लागलेले असतात. उदा. मुंग्या, वारूळे, गांडुळे यांच्यामुळे पाणी अधिक खोलवर जाण्यास मदत होते. प्रत्येक सूक्ष्मजीवही पाणी धरून ठेवण्यासाठी जीवतोड मेहनत करतो. पिकांची लागवडही उतारानुसार समतल (कंटूर) पद्धतीने केली जाते. सरी ओरंबा पद्धतीमुळे सुमारे वाहणारे ७० टक्के पाणी अडवले जाते. ते तिथेच जिरण्यासाठी काही अंतरावर लॉकिंग केले जाते. ५) पिकांच्या फेरपालटा चेही शास्त्र बसवण्याचा प्रयत्न अनुभवातून केला आहे. केवळ एकच पीक एका वेळी करण्याऐवजी त्यात अनेक पिकांचा समावेश केला जातो. त्यामुळे एक नाही, तर दुसऱ्या पिकांतून उत्पन्न मिळून जाते. आर्थिक धोका कमी होते. भोपळा, तूर, कोथिंबीर (धने) अशी रचना आहे.

संपर्क ः सुभाष शर्मा, ९४२२८६९६२०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

SCROLL FOR NEXT