Pune News : हवामान बदलाचा फटका कृषी क्षेत्राला बसत असल्याचे बोलले जात होते. मात्र त्याचे दृष्य परिणाम थेट जाणवू लागले आहेत. कोकणातील थंडीचे कमी दिवस, चाळिशी पार गेलेला पारा, याचा फटका हापूस आंबा उत्पादनाला बसला आहे.
वाढत्या तापमानामुळे पहिला मोहर जळाला, तर दुसरा मोहर वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागत आहे. हवामानाच्या चढ-उताराचा फटका उत्पादनाला बसला असून, फेब्रुवारी-मार्चमध्ये मिळणारा हंगाम हातातून गेला आहे. परिणामी बाजारात देखील आंब्याची अत्यल्प आवक आहे.
कोकणातील हापूस आंबा हंगामाबाबत पुणे बाजार समितीमधील कोकण हापूसचे अडतदार करण जाधव म्हणाले, की हवामान बदलांचा फटका दिवसेंदिवस कोकणातील हापूस आंब्याला बसत आहे. या वर्षीच्या हंगामात अवकाळी पाऊस, कडक थंडीचे कमी दिवस यामुळे पहिल्या टप्प्यातील चांगला लागलेला मोहर वाढत्या उष्णतेमुळे गळाला, तर अनेक ठिकाणी काळा पडला (जळाला). यामुळे फेब्रुवारी, मार्चमध्ये होणारी आवक रोडावली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये साधारणतः ३ ते ४ हजार पेटी होणारी आवक पुणे बाजार समितीमध्ये होत होती. मात्र आता हीच आवक ५०० ते १ हजार पेटी होत आहे. त्यामध्येही दर्जेदार आंबा नाही.’’
पहिल्या मोहराचा हंगाम हातातून गेल्यानंतर आता शेतकऱ्यांनी दुसऱ्या मोहराचे व्यवस्थापन सुरू केले आहे. मात्र या मोहराला देखील वाढत्या तापमानाचा फटका बसत असून, विविध फवारण्या करून मोहर टिकविणे आणि हंगाम साधण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे जाधव यांनी सांगितले. तर, एप्रिल-मेमध्ये दुसऱ्या हंगामातील चांगले उत्पादन मिळण्याचा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. मात्र हा हंगाम उशिरा सुरू होऊन, १५ मे पर्यंत संपेल अशी सध्याची परिस्थिती असल्याचेही जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, पुणे बाजार समितीमध्ये कोकणासह कर्नाटक राज्यातून देखील मोठ्या प्रमाणावर हापूस, लालबागसह विविध आंब्याची आवक होत असते. कोकणासह कर्नाटकला देखील हवामान बदलाचा फटका बसल्याचे कर्नाटक आंब्याचे प्रमुख अडतदार रोहन उरसळ यांनी सांगितले. उरसळ म्हणाले, की कर्नाटकामधून सध्या केवळ १०० ते २०० बॉक्सची आवक होत आहे.
ही आवक रमझानसाठी होत असली तरी, गेल्या दोन-चार वर्षांत मार्च मध्ये होणारी आवक घटली आहे. याचे मुख्य कारण हे हवामान बदलामधील मोठ्या प्रमाणावर होणारे चढ-उतार आहेत. यामध्ये लांबलेला पाऊस, अवकाळी पाऊस, थंडीच्या दिवसांचे कमी दिवस आणि लागलीच होणारी तापमानवाढ यामुळे आंब्याला फार काळ पोषक वातावरण मिळत नाही. यामुळे एकाच वेळी मोठी आवक होत आहे. ही आवक आता एप्रिल-मे मध्ये होईल.
पारंपरिक हंगामाकडे वाटचाल
पूर्वी होळीनंतर आंबा काढायला सुरुवात होऊन, गुढीपाडवा आणि अक्षय तृतीयेला आंब्याचा पारंपरिक हंगाम असायचा. मात्र मध्यंतरीच्या १५ ते २० वर्षांच्या काळात बागा विकून बागवान लोकांकडून लवकर हंगाम सुरू करण्याच्या स्पर्धेसाठी बेसुमार संप्रेरकांचा वापर झाडांना झाला. यामुळे डिसेंबरपासूनच आंबा बाजारात दिसू लागला होता. मात्र आता पुन्हा होळीनंतरच आंबा मिळू लागला असून, जुन्या परंपरेने गुढीपाडवा आणि अक्षय तृतीयेला आंब्याचा पारंपरिक हंगाम दिसण्याची चिन्हे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
अशी आहे आवक आणि दर
कोकण हापूस
दैनंदिन आवक
५०० ते ८०० पेटी --- दर ३-४ डझन कच्चा ३ ते ९ हजार रुपये
कर्नाटक हापूस
आवक -१०० ते २०० बॉक्स --- दर ८०० ते १००० रुपये
लालबाग (प्रति किलो) - ८०-१२०
आमची साधारण एक हजार झाडे असून, यंदा आक्टोबरपर्यंत लांबलेल्या पावसामुळे लवकर मोहर लागला नाही. तर थंडीदेखील म्हणावी अशी न पडल्याने आणि कमी दिवस राहिल्याने मोहर फार कमी लागला. त्यातच तापमान वाढल्याने आहे तो मोहर गळाला. त्यामुळे फेब्रुवारी-मार्चचे उत्पादन मिळाले नाही. आता पण खूप ऊन आहे. यामुळे एप्रिलमध्येच हंगाम संपेल अशी परिस्थिती आहे. मे महिन्यात आंबा मिळेलच अशी परिस्थिती नाही. एप्रिलमध्ये अचानक सर्व बाजूंनी आंबा आला तर दर देखील मिळणे मुश्कील आहे.- मंदार कदम, गावखेडी, पावस, रत्नागिरी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.