Jalgaon News : गेल्या खरीप हंगामातील (२०२२) कापसापासून यंदा बारा लाख गाठींची निर्मिती झाली आहे. गतवर्षीपेक्षा तीन लाख गाठींची अधिक निर्मिती झाली आहे. गतवर्षी केवळ ९ लाख गाठींची निर्मिती झाली होती. कापूसदरात मागील आठवड्यात सुधारणा होऊन कापसाला ७१०० ते ७२०० रुपयांपर्यंत दर मिळाला.
नवीन खरीप हंगामातील पेरणीची लगबग सुरू झाल्याने आता जिनिंग, प्रेसिंगमध्येही लवकरच कापसावर प्रक्रिया करणे थांबून यंदाचा हंगाम संपेल, असे सध्याचे चित्र आहे. कापसाच्या दरात मागील आठवड्यात २०० ते ३०० रुपयांची सुधारणा हेाऊन कापसाला ७१०० ते ७२०० रुपयांपर्यंत दर मिळाला. कापसापासून दरवर्षी १८ ते २५ लाख गाठी तयार होतात.
गतवर्षी (२०२१) कापूस टंचाईने केवळ नऊ लाख गाठींची निर्मिती झाली होती. यंदा (२०२२) कापूस उपलब्ध असूनही दहा ते तेरा हजारांचा दर कापसाला मिळाला नाही. यामुळे हंगामात कापसाची आवक बाजारपेठेत न झाल्याने जिनर्सला २५ लाख गाठींचे उत्पादन करता आले नाही. आतापर्यंत केवळ १२ लाख गाठींची निर्मिती झाली. जून अखेरपर्यंत जिनिंग सुरू राहतील, त्यात आणखी दोन लाख गाठींची निर्मिती शक्य आहे.
एकशे दहा जिनिंगपैकी सध्या फक्त २५ ते ३० जिनिंग सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी नव्हती. परिणामी कापसाला दरही नाहीत. २७ मे रोजी कापसाला ६८०० चा नीचांकी दर मिळाला. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी वाढू लागली असून, खंडीचा दर ५८ हजारांवरून ६० हजारांपर्यंत पोहोचला आहे. परिणामी, कपाशीच्या दरात दोनशे ते तीनशे रुपयांची सुधारणा झाली.
सध्या ७१०० ते ७२०० चा दर कापसाला मिळत आहे. यंदा शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला प्रतिक्विंटल दहा ते १३ हजारांचा दर मिळालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील ५५ टक्के कापूस अद्याप शेतकऱ्यांकडे पडून आहे.
दृष्टिक्षेपात...
* दरवर्षी होणारे कापसाच्या गाठींचे उत्पादन : १८ ते २५ लाख
* गतवर्षी उत्पादित गाठी : ९ लाख
* यंदा आतापर्यंत झालेले उत्पादन : १२ लाख गाठी
* खंडीला सध्या मिळत असलेला भाव : ६० हजार रुपये
* शेतकऱ्यांना गतवर्षी प्रतिक्विंटल मिळालेला दर : ९ ते १३ हजार रुपये
* यंदाचा सध्याचा कापसाचा दर : ७१०० ते ७२०० रुपये
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.