औरंगाबाद : सध्यस्थितीमध्ये मराठवाड्यातील सोयाबीनवर ‘पिवळा मोझॅक’ (केवडा) रोगाचा (Soybean Yellow Mosaic Yellow) प्रादुर्भाव आढळून आला आहे. प्रमाण कमी अधिक असले तरी पोषक स्थितीमुळे विषाणूंमुळे (Soybean) पसरणाऱ्या या रोगाची वेळीच ओळख पटवून त्यावर एकात्मिक पद्धतीने नियंत्रणाची गरज निर्माण झाली आहे.
यंदाच्या खरिपात (Kharif Season) मराठवाड्यातील पेरणी (Soybean Sowing) झालेल्या एकूण क्षेत्रापैकी ५० टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या हंगामाच्या तुलनेत यंदा जवळपास तीन ते चार टक्के सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. २३ लाख ५५ हजार ३९ हेक्टरवर पसरलेल्या या सोयाबीनच्या क्षेत्रापैकी विशेषतः: उस्मानाबाद, बीड आणि लातूर, नांदेड व जालन्यातील काही ठिकाणी ‘पिवळा मोझॅक’ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव, वरपगाव, श्रीपत रायवाडी येथे प्रादुर्भाव सर्वप्रथम निदर्शनास आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, कडधान्य आणि तणे ही याच्या पर्यायी यजमान वनस्पती आहेत. या रोगामुळे सोयाबीनमध्ये १५ ते ७५ टक्केपर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.
‘‘‘पिवळा मोझॅक’ रोग आता काही प्रमाणात आपल्याकडेही डोके वर काढतो आहे. त्यावर सजग राहून वेळीच नियंत्रण करावे,’’ असा सल्ला ‘वनामकृवि’च्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे डॉ. जी. डी. गडदे यांनी दिला. डॉ. डी. डी. पटाईत आणि एम. बी. मांडगे तसेच तुळजापूर कृषी विज्ञान केंद्राचे पीक रोग शास्त्रज्ञ डॉ. श्रीकृष्ण झगडे यांनीही मार्गदर्शन केले.
...अशी आहेत रोगाची लक्षणे
सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरीजवळ विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात. त्यानंतर पाने जसे परिपक्व होत जातात, तसे तसे त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात. काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात. लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. अशा झाडांना कालांतराने फूले आणि शेंगा कमी लागतात. पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते. तसेच दाण्यांमधील तेलाचे प्रमाण घटते. तर, प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते. या विषाणूचा पानातील रसामार्फत प्रसार होतो आणि हा प्रसार मुख्यतः पांढऱ्या माशीद्वारे केला जातो.
...असे करा व्यवस्थापन
- पिवळा मोझॅक झालेली प्रादुर्भावग्रस्त पाने, झाडे वेळोवेळी काढून नष्ट करावीत. त्यामुळे निरोगी झाडांवर होणारा किडीचा व रोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल.
- वेळोवेळी पिकाचे कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे.
- पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिकावर रोगाची लक्षणे दिसताच थायामेथोक्झाम २५ टक्के हे कीटकनाशक (४० ग्रॅम प्रति एकरी) फवारावे.
- पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रतिएकरी १० पिवळे चिकट सापळे लावावेत.
- फवारणीसाठी कीटकनाशकाची व पाण्याची शिफारस केलेली मात्राच वापरावी.
- नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळावा.
- मूग, उडीद यासारख्या पर्यायी खाद्य वनस्पतीवरून पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी अशा पिकांवरील पांढरी माशीचे व्यवस्थापन करावे.
- कमीत कमी पहिले ४५ दिवस पीक तणमुक्त ठेवावे.
- पावसाचा ताण पडल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे.
- बिगर हंगामी सोयाबीनची लागवड शक्यतो टाळावी, जेणेकरून किडीच्या जीवनक्रमात खंड पडेल.
- पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकता वाटल्यास दहा
दिवसानंतर दुसरी फवारणी करावी.
बीड जिल्ह्यासह इतर भागात प्रदूर्भावग्रस्त पिकाच्या मिळालेल्या माहितीवरून प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर जाऊन त्याची तीव्रता व शिफारशीत उपाययोजना शेतकऱ्यांना सांगण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. आजपासून (ता.८) ही मोहीम अधिक गतिमान करण्यात येईल.डॉ. डी. एल. जाधव, विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद.
मे महिन्याच्या शेवटी लागवड केलेले जवळपास एक हेक्टरवरील सोयाबीन ‘पिवळ्या मोझॅक’ रोगाने प्रादूर्भावग्रस्त झाले. पांढरी माशी नियंत्रणासाठी आजवर सहा फवारण्या घेतल्या. मोठ्या प्रमाणात पिवळे चिकट सापळे लावले.अरुण देशमुख शेतकरी, लोखंडी सावरगाव, ता. अंबाजोगाई, जि. बीड.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.