अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः गेल्या सात वर्षांपासून साखर कारखान्यांच्या चर्चेत असलेल्या ‘कोव्हीएसआय १८१२१’ या उसाच्या नवीन जातीच्या चाचण्या आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. लागवडीसाठी या जातीची शिफारस २०२४ पर्यंत होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
साखर कारखान्यांमध्ये सध्या ‘को ८६०३२’ हे वाण जास्त पसंतीला उतरले आहे. मात्र उत्पादन आणि उतारा या दोन्ही मुद्द्यांवर
‘१८१२१ वाण’ सरस ठरते आहे. या वाणावर गेल्या काही वर्षांपासून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) व भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) या दोन संस्था संयुक्तपणे संशोधन करीत आहेत.
‘कोव्हीएसआय १८१२१’ हे नवे वाण तयार करण्यासाठी ‘को १८१२१’ ही जात ‘को ८६०३२’ व ‘कोटी ८०२१’ अशा दोन वाणांचा संकर घडवून आणला गेला आहे. या वाणाच्या चाचण्या समाधानकारकपणे सुरू आहेत. ‘व्हीएसआय’चे महासंचालक शिवाजीराव देशमुख व संचालक संभाजी कडू पाटील यांच्याकडून सातत्याने माहिती घेतली जात आहे.
साखर उद्योगात कितीही अत्याधुनिक तंत्रज्ञान आले तरी अधिकाधिक उतारा साखर उतारा देणारी उसाची जात हाती असणे हीच मुख्य बाब समजली जाते. ‘आयसीएआर’च्या कोइमतूरमधील ऊस पैदास संशोधन संस्थेचे संचालक बक्शी राम यांनी ‘को-०२३९’ हे सर्वोत्कृष्ट वाण स्वीकारले. हे वाण उत्तर प्रदेशाने स्वीकारल्यानंतर सरासरी उत्पादन हेक्टरी ८० टनाच्या पुढे गेले. त्यामुळे तेथील साखर उद्योगाला मोठी चालना मिळाली.
२०१८ मध्ये ‘व्हीएसआय’ने पाण्याचा ताण सहन करणारी ‘०८००५’ ही उसाची नवी जात प्रसारित केल्यानंतर राज्याच्या दुष्काळी भागात उसाची लागवड वाढली. “‘१८१२१’ वाणाच्या चाचण्या अजून काही महिने चालतील. त्यानंतर विद्यापीठांच्या चाचण्यांसाठी पूर्वप्रसारित होईल. २०२४ ते २५ पर्यंत या वाणाच्या गाळप चाचण्या होतील. त्यातील निष्कर्ष पाहूनच सार्वत्रिक लागवडीसाठी या वाणाची शिफारस केली जाईल,” अशी माहिती ‘व्हीएसआय’च्या सूत्रांनी दिली.
अशी आहेत ‘कोव्हीएसआय १८१२१’ ची वैशिष्ट्ये
- संकर करण्यासाठी ‘को ८६०३२’ व ‘कोटी ८०२१’ वाणाचा वापर
- उत्पादन व उतारा ‘को ८६०३२’ वाणापेक्षाही जादा
- चाचणीत उत्पादन हेक्टरी १५५ टनापेक्षा अधिक
- गाळपात साखर उतारा मिळतो १२.५० ते १३.१० टक्के
- एका कांडीचे वजन ५ ते ६ किलोपर्यंत
- यांत्रिक तोड, ठिबक, आंतरपिकांसाठी उत्तम वाण
“‘कोव्हीएसआय १८१२१’ हे नवे ऊस वाण २०२४ पर्यंत शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, असे उद्दिष्ट ठेवत शास्त्रज्ञ परिश्रम घेत आहेत. या वाणाकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. कारखाना चाचण्यांमध्ये (मिल्स ट्रायल्स) वाण यशस्वी ठरल्यास राज्याच्या साखर उद्योगाला बळकटी मिळू शकते.”
- डॉ. रमेश हापसे, मुख्य शास्त्रज्ञ, ऊस प्रजनन विभाग, व्हीएसआय
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.