१) कापूस पुन्हा ७ हजारांवर (Cotton Rate)
देशातील बाजारात कापूस दरातील नरमाई आजही कायम होती. अनेक बाजारांमध्ये सरासरी भावपातळी आता ७ हजारांवर पोचली. तर कमाल भाव ७ हजार ५०० रुपयांवर आहे. वायद्यांमध्येही कापूस दरात ५४० रुपयांची नरमाई आली.
वायदे ५८ हजार ७०० रुपये प्रतिखंडीवर बंद झाले होते. सध्या बाजारातील कापूस आवक कमी झाली आहे. पण सरासरीपेक्षा आवक जास्त आहे. त्यामुळे कापसाच्या भावावर दबाव येतोय. काही दिवस दरातील चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
२) सोयाबीन आवक जास्तच (Soybean Arrival)
बाजारातील सोयाबीन आवक टिकून आहे. आजही सव्वा लाख क्विंटलच्या दरम्यान सोयाबीन आवक झाली. मिल्सना गरजेप्रमाणे माल मिळत असल्याने बाजार स्थिर आहे. सोयाबीनला आजही ४ हजार ६०० ते ५ हजार १०० रुपयांचा भाव मिळत आहे.
खरिपाच्या पेरण्यांसाठी शेतकरी माल विकत आहेत. त्यातच सोयाबीन स्टाॅक बऱ्यापैकी असल्याने दर सध्याच्या पातळीवर आणखी काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
३) टोमॅटो बाजार मंदीतच (Tomato Market)
राज्यातील बाजारात टोमॅटो दरात चढ उतार दिसत आहेत. महत्वाच्या बाजारात आवक जास्त असल्याने दर कमी दिसतात. पण चालू आठवड्यात मागील आठवड्याच्या तुलनेत दरात काहीशी सुधारणा दिसून येत आहे. सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ३०० ते १ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.
सध्याचा भावही कमी असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. पुढील काही दिवस टोमॅटो बाजारातील ही स्थिती कायम राहू शकते, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
४) लसणाच्या दरात तेजी (Garlic Rate)
लसणाच्या भावात मागील काही दिवसांपासून चांगलीच वाढ झाली आहे. आवकेचा विचार करता मागील तीन ते चार आठवड्यांपासून घट झाली. तर लग्न आणि समारंभामुळे लसणाला चांगला उठाव राहिला. परिणामी दरात वाढ झाली. ही वाढ आजही कायम होती.
लसणाला आज सरासरी ७ हजार ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. हा भाव आणखी काही दिवस दिसतील, असा अंदाज व्यापारी आणि जाणकार व्यक्त करत आहेत.
५) तुरीचे भाव सध्या काय आहेत? (Tur Rate)
देशातील बाजारात सध्या तुरीचे भाव तेजीतच आहेत. तुरीला सरासरी ९ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. सरकारने तुरीवर स्टाॅक लिमिट लावले तरी भावात नरमाई दिसून आली नाही. देशातील काही बाजारांमध्ये तुरीने ११ हजारांचा टप्पा गाठल्यानंतर सरकारने तातडीने स्टाॅक लिमिट लावली.
घाऊक बाजारात तूर सध्या सरासरी प्रतिकिलो १०० रुपयांवर पोचली. तर खुल्या बाजारात तूर डाळीने १५० रुपयांचा टप्पा गाठला. निवडणुकीच्या तंद्रीत असलेल्या सरकारसाठी ही चिंतेची बाब होती. त्यामुळे सरकारने तुरीवर स्टाॅक लावले, असे व्यापारी सांगत आहेत.
सरकारने स्टाॅक लिमिट लावल्यानंतर तूर डाळीच्या भावात २०० रुपयांपर्यंत नरमाई आली होती. पण तुरीचे भाव कायम राहीले. तुरीचा सरासरी कमाल भाव १० हजार ५०० रुपयांवर आहे. तर किमान भाव आता ९ हजारांच्या पुढे गेले. देशातील महत्वाच्या लातूर, गुलबर्गा, अकोला, अमरावती या बाजारांमध्येच तुरीचे भाव ९ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत.
देशात तुरीचा पुरवठाच कमी असल्याने दरात पुढील काळातही तेजी राहू शकते, असा अंदाज आहे. आफ्रिकेतील देशांमध्ये सप्टेंबरपासून तुरीची आवक सुरु होईल. तोपर्यंत आवकेची गती कमी राहील. त्यामुळे तुरीचे भाव तेजीतच राहतील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.