Market Bulletin : ब्राझीलमध्ये पूर येऊन सोयाबीन पिकाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाल्याने गेल्या आठवड्याच्या शेवटी सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात तेजी आली होती. पण आज दुपापर्यंत भावात काहीशी नरमाई आली. सोयाबीनचे वायदे १२.०९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. तर सोयापेंड ३६९ डाॅलरवर होते.
देशातही आज प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव ४८०० रुपये काढले होते. तर बाजार समित्यांमधील भावापातळी ४३०० ते ४६०० रुपयांच्या दरम्यान पोचली होती. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापसाच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे काहीसे कमी होऊन ७७.७९ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. तर देशातील बाजारात कापसाचा भाव कायम दिसतो. देशातील बाजारात कापसाची आवक मागील काही दिवसांपासून एका पातळीदरम्यान होत आहे.
त्यामुळे बाजार समित्यांमधील भावपातळी ७ हजार २०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होती. कापसाच्या भावात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीबंदी उठवल्यानंतर कांद्याच्या भावात झालेली सुधारणा बहुतांशी बाजारांमध्ये कायम आहे. कांद्याला बाजारात आजही १७०० ते २००० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर बाजारातील आवक काही प्रमाणात वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत.
कांद्याचे भाव सुधारण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीवर लावलेले ५५० डाॅलर प्रतिटन किमान निर्यात मूल्य आणि त्यावर ४० टक्के निर्यात काढावे, अशी मागणी शेतकरी आणि निर्यातदार करत आहेत.
तुरीच्या भावातील तेजी कायम आहे. वाढती मागणी आणि घटलेला पुरवठा, याचा दरावर परिणाम दिसून आला असून वाढ कायम आहे. देशातील महत्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी ११ हजारांच्या दरम्यान आला.
तर देशभरातील बाजारातील सरासरी भाव १० हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. बाजारातील घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली. तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
बाजारात सध्या हिरव्या मिरचीला चांगला भाव मिळत आहे. बाजारातील आवक कमी आणि उठाव मात्र चांगला दिसतो. त्यातच लग्न सराई आणि सणांमुळे हिरव्या मिरचीला चांगल मागणी येत आहे. यामुळे हिरव्या मिरचीचे भाव सध्या तेजीत आहेत.
सध्या हिरव्या मिरचीला ४ हजार ५०० ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तसेच वाढत्या उन्हामुळे मिरची पिकाला फटका बसत आहे. त्यामुळे पुढच्या काळात मिरचीची आवक कमी होत जाईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.