Soybean Rate Agrowon
मार्केट बुलेटीन

Soybean Rate : पाम तेलाच्या दरवाढीमुळे सोयाबीनला फायदा

सोयाबीनचे भाव कधी वाढतील, याकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत. पाम तेलाचे दर वाढत आहेत. मलेशियन पाम तेलाच्या किंमतीत चांगली सुधारणा झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला चीनमध्ये कोरोना निर्बंधांविरोधात जनतेची निदर्शने सुरू झाल्यामुळे खळबळ उडाली. चीन सरकारने निर्बंधांच्या बाबतीत एक पाऊल मागे घेतले आहे.

टीम ॲग्रोवन

कापसाचे दर वाढण्याची शक्यता

१. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कापसाच्या दरात प्रति क्विंटल २०० ते ३०० रूपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यामुळे तेथील सरकारने कडक निर्बंध लादले होते. त्यामुळे अर्थकारणावर विपरित परिणाम झाला. त्यामुळे चीनकडून कापसाची मागणी मंदावली होती. परंतु सरकारच्या निर्बंधांविरोधात चीनमधील जनता रस्त्यावर उतरली. अनेक ठिकाणी निदर्शने झाल्यानंतर चीन सरकारने काहीशी नरमाईची भूमिका घेतली आहे. नागरिकांमधील वाढत्या रोषामुळे ग्वांगझू आणि चोंगकिंग या शहरांमधील निर्बंध सरकारने शिथिल केले आहेत. चीन सरकार इतरही शहरांमधील कोरोना निर्बंध शिथिल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीनकडून कापसाची मागणी वाढण्याची चिन्हे आहेत. त्याचा परिणाम म्हणून भारतातील कापसाला उठाव मिळू शकतो. त्यामुळे येत्या काही दिवसांत कापसाचे भाव प्रति क्विंटल २०० ते ३०० रूपये वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी बाजारातील भावपातळीवर नजर ठेऊन टप्प्याटप्प्याने कापूस विकावा, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

२.१४ लाख टन साखर निर्यात कोट्याची अदलाबदल

२. केंद्र सरकारने साखर कारखान्यांना निर्यातीसाठीच्या कोट्यातील २.१४ लाख टन साखरेची अदलाबदल करण्याची परवानगी दिली आहे. १७ साखर कारखान्यांनी तशी मागणी केली होती. या कारखान्यांना एकत्रितपणे २.८८ लाख टन साखर कोटा मंजूर करण्यात आला होता. अन्न मंत्रालयाने याआधी २.३८ लाख कोट्याची अदलाबदल करण्याची परवानगी दिली होती. बिहार आणि उत्तर प्रदेशातील अनेक साखर कारखान्यांनी महाराष्ट्रातील कारखान्यांबरोबर साखर कोटा अदलाबदलीसाठी करार केले होते. महाराष्ट्रात बंदरे असल्याने निर्यातीसाठी अधिक वाव आहे. केंद्र सरकारने ३१ मे रोजी यंदाच्या वर्षासाठी ६० लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली होती. त्यासाठी कोटा पध्दत लागू करण्यात आली.

तेलंगणामध्ये रब्बी कापूस लागवडीचा प्रयोग

३. तेलंगणामध्ये अनेक ठिकाणी पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे रब्बी हंगामात कापसाची लागवड करण्याचे प्रमाण वाढले आहे. खरीप हंगामात सोयाबीन, भात, मूग, ज्वारी आणि मक्यासारखी पिके घेतल्यानंतर रब्बी हंगामात कापूस लागवडीचा प्रयोग केला जात आहे. परंतु शास्त्रज्ञांनी मात्र या प्रयोगाबद्दल शेतकऱ्यांना धोक्याचा इशारा दिलाय. रब्बी कापसामुळे गुलाबी बोंड अळी शेतात वाढते आणि खरीप कापूस वाढेपर्यंत ती शेतात कायम राहते. दुसरं म्हणजे वाढत्या तापमानाचा पिकाला फटका बसतो. रब्बी कापूस जर फेब्रुवारीच्या आसपास फुलोऱ्यात आला तर वाढत्या तापमानामुळे उत्पादनात मोठी घट होते. रब्बी कापूस हा केवळ एक प्रयोग म्हणून ठीक आहे; परंतु त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करणे चुकीचे ठरेल, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेनेही शेतकऱ्यांना रब्बी हंगामात कापूस लागवडीसाठी प्रोत्साहन देऊ नये, असे म्हटले आहे.

सरकारी तांदूळ खरेदीत ९ टक्के वाढ

४. केंद्र सरकार २३ पिकांच्या किमान आधारभूत किंमती म्हणजे हमीभाव जाहीर करते. परंतु तांदूळ व गहू या दोन पिकांचीच मोठ्या प्रमाणावर खरेदी करते. चालू वर्षीही सरकारने तांदूळ खरेदी वाढवलीय. गेल्या वर्षीच्या तुलनेत तांदळाची खरेदी सुमारे ९ टक्के वाढली आहे. पंजाब, हरियाणा, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमधून तांदळाची जास्त खरेदी करण्यात आली आहे. दरवर्षी साधारणत: ऑक्टोबरमध्ये मॉन्सून परतल्यानंतर लगेचच सरकारकडून तांदूळ खरेदी सुरू होते. तथापि, दक्षिणेकडील राज्यांमध्ये, विशेषत: केरळ आणि तामिळनाडूमध्ये तांदूळ खरेदी एक महिना आधीच म्हणजे सप्टेंबरपासून सुरू होते. पंजाबमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत तांदूळ खरेदीत २.७६ टक्के घट झाली आहे. हरियाणामध्ये मात्र तांदूळ खरेदी ८.१८ टक्क्यांनी वाढली आहे.

पाम तेलाच्या दरवाढीमुळे सोयाबीनला फायदा

५. मलेशियन पाम तेलाच्या (Palm Oil Rate) किंमतीत वाढ झाली आहे. मागील आठवड्यातील निचांकी ३ हजार १७८ रिंगीट प्रतिटनावरून पामतेल सुधारले आहे. पाम तेलाच्या फ्युचर्स किंमतींमध्ये वाढ झाली आहे. पाच महिन्यांतील उच्चांकी दराकडे वाटचाल सुरू आहे. चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यामुळे तिथे झिरो कोरोना पॉलिसीची कडक अंमलबजावणी करण्याचं सरकारने जाहीर केलं होतं. त्यामुळे अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता होती. पाम तेलाची मागणी (Palm Oil Demand) मोठ्या प्रमाणावर घटली असती. परंतु चीनमधील जनता सरकारच्या कडक निर्बंधांच्या विरोधात रस्त्यावर उतरली. लोकांच्या निदर्शनांमुळे सरकारने झिरो कोरोना पॉलिसीबद्दल एक पाऊल मागे घेतले. त्यामुळे पाम तेलाच्या मागणीवर परिणाम होण्याची भीती निकालात निघाली आहे.

मलेशियातून चीन आणि भारताला पाम तेलाची निर्यात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाम तेलाचे दर वधारले आहेत. त्याचा थेट परिणाम सोयातेलावर होणार आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दराला आधार मिळण्याची शक्यता आहे. पामतेलातील दरवाढ सोयाबीन उत्पादकांच्या पथ्यावर पडणार आहे. शेतकरी चांगला दर मिळण्याच्या आशेने सोयाबीन टप्प्याटप्प्याने विकत आहेत. त्यामुळे अडचणीत आलेले प्रक्रियादार वाढीव दराने सोयाबीन खरेदीच्या मनःस्थितीत आहेत. पामतेलातील दरवाढ आणि सोयाबीन प्रक्रिया उद्योगाकडून वाढती मागणी यामुळे येत्या काळात सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. आज देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये क्विंटल दर मिळला. तर प्रक्रिया प्लांट्सचे दर ५ हजार ४०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT