Cotton Rate
Cotton Rate Agrowon
बाजार विश्लेषण

Cotton Rate : देशातील कापूस उत्पादन खरंच वाढणार का ?

Anil Jadhao 

देशातील उद्योगांनी यंदा कापूस उत्पादन (Cotton Production) वाढून ३४४ लाख गाठींवर पोचेल, असा अंदाज कायम ठेवला. मात्र कापूस बाजारातील (Cotton Production) काही अभ्यासक आणि शेतकरी यांना हा अंदाज मान्य नाही. मग कापूस उत्पादनाबाबत नेमक कोण खरं सांगतंय? कापूस बाजार का सुधारला? सध्या कापसाला काय (Cotton Rate) दर मिळत आहे? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

1. सोयाबीन दरात चढ-उतार


मागील तीन दिवसांपासून देशातील बाजारात सोयाबीन दरात काहीसे चढ-उतार पाहायला मिळाले. आजही सोयाबीनचे दर काही बाजार समित्यांमध्ये क्विंटलमागे १०० रुपयांनी नरमले होते. तर प्रक्रिया प्लांट्सचे दरही आज १०० रुपयांनी कमी झाले होते. प्रक्रिया प्लांट्सचे दर कमी झाल्याचा परिणाम बाजारातील दरावरही जाणवला होता. आज देशात सोयाबीनचे व्यवहार प्रतिक्विंटल ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळाला. सोयाबीनची दरपातळी पुढील काही दिवस ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
 

2. उडदाचे दर टिकणार

देशातील बाजारात उडीद दरही कमी जास्त होत आहेत. आज उडदाचे दर क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांनी सुधारले होते. देशात यंदा उडदाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. तर म्यानमारमधून उडीद आयात सुरुच राहण्याचा अंदाज आहे. मात्र देशात उडदाला चांगली मागणी असल्यानं दर कमी होण्याची शक्यता नसल्याचं व्यापारी सांगत आहेत. सध्या उडदाला प्रतिक्विंटल ६ हजार ८०० ते ७ हजार ९०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. 

3. कांदा दर स्थिरावले

कांदा दर मागील काही दिवसांपासून स्थिर दिसत आहेत. मागील महिनाभरापासून कांदा दरात सुधारणा झाली होती. कांद्याचा सरासरी दर १ हजार २०० रुपयांवरून आता १ हजार ८०० रुपयांवर पोचला. तर बऱ्याच भागांमध्ये कांद्याचा कमाल दर २ हजार ३०० रुपयांवर होता. मात्र मागील काही दिवसांपासून कांदा दर याच भावपातळीभोवती फिरत आहेत. पण पुढील महिनाभरात कांद्याच्या दरात पुन्हा सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कांदा बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. 

4.  गाजराचे दर तेजीतच

बाजारात सध्या गाजराची आवक सरासरी आहे. राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूर बाजार समित्यांमध्ये आवक काहीशी जास्त दिसत आहे. मात्र इतर बाजारांमधील आवक आजही कमीच आहे. त्यामुळे गाजराचे दर तेजीत आहेत. सध्या गाजराला सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. बाजारतील आवक वाढेपर्यंत हे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. 

5. देशातील बाजारात कापसाचे दर सध्या तेजीत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या दरात वाढ पाहयाला मिळाली. मात्र काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने नुकतेच देशात ३४४ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. तर कापसाचा वापर कमी होईल, असंही म्हटलं. मात्र कापूस बाजार अभ्यासकांच्या मते देशातील कापूस उत्पादन यापेक्षा कमीच राहील. स्वतः काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाही नंतरच्या काळात त्यात बदल करू शकते, असंही काहीजण सांगत आहेत. शेतकरीही कापूस पिकाला यंदा मोठा फटका बसल्याचं सांगतात. कापूस उत्पादन कमी असल्याचं वास्तव बाजारातील सर्वच घटकांना माहीत आहे, तसंच मागील हंगामातील कापूस शिल्लक नाही. शेतकऱ्यांनी कापूस विक्री कमी केल्यानंतर दरवाढ झाली, यातून हे सिध्द झाल्याचंही जाणकार सांगतात. तसंच पुढील काळात शेतकऱ्यांची कापूस विक्री कशी राहते, यावरच दर अवलंबून आहेत. सध्या कापसाच्या दरात क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांचे चढउतार होत आहेत. मात्र दरात घसरण नाही. आज देशभरात कापसाला ८ हजार ते ९ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.  शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात किमान सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed Policy : बियाणे कंपन्यांच्या धोरणामुळे कृषी व्यावसायिक त्रस्त

Leopard Terror : आठ दिवसांत सहा बिबटे जेरबंद

Crop Damage Survey : नुकसानीचे त्वरित पंचनामे करा

Fodder Shortage : चाऱ्या अभावी जनावरे जगविण्याचे आव्हान

Agriculture Irrigation : ‘चासकमान’चे आवर्तन सुटले

SCROLL FOR NEXT