soybean market
soybean market agrowon
बाजार विश्लेषण

Soybean Market : सोयाबीन दरवाढीसाठी पूरक स्थिती

Team Agrowon

पुणेः सोयाबीन बाजाराला (Soybean Market) आधार देणाऱ्या घडामोडी सध्या घडत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन (Soybean), सोयापेंड (Soyameal) आणि सोयातेलाचे (Soya Oil) दर वाढत आहेत. तसेच अर्जेंटीना आणि चीनमधून सोयाबीन बाजाराला आधार मिळत आहे. त्यामुळे मागील महिनाभरापासून दरवाढीची वाट पाहणाऱ्या सोयाबीन उत्पादकांना यामुळं दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर तेजीत आहेत. आज सोयाबीनचे दर मागील सहा महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोचले होते. सीबाॅटवर आज सोयाबीनचे वायदे १५.३० डाॅलर प्रतिबुशेल्सने पार पडले. क्विंटलमध्ये हा दर ४ हजार ६८० रुपये होतो. सोयाबीनचे दर मागील चार दिवसांपासून तेजीत आहेत.


सीबाॅटवर सोयाबीनसह सोयापेंडच्या दरातही वाढ झाली. सोयाबीनचे दर मुख्यतः सोयापेंडच्या दरावर अवलंबून असतात. पण सोयातेलाचाही आधार अनेकदा मिळत असतो. आज सोयापेंडचे दर वाढून ४७१ डाॅलर प्रतिटनावर पोचले होते. रुपयात हा दर जवळपास ३९ हजार रुपये प्रतिटन होतो.

भारत सरकारने ३ फेब्रुवारी २०२२ पासून सोयाबीनसह तेलबिया आणि खाद्यतेलावर स्टाॅक लिमिट लावले होते. त्याला मुदतवाढ देत ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत वाढवले होते. पण आता सरकारनं अधिसूचना काढत जानेवारी २०२३ पासून सोयाबीनसह तेलबियांवरील स्टाॅक लिमिट काढल्याची घोषणा केली. त्यामुळं व्यापारी, प्रक्रियादार आणि स्टाॅकीस्ट यांना साठा करता येईल. याचा सकारत्मक परिणाम सोयाबीन बाजारावर दिसू शकतो.

……………
अर्जेंटीनात कमी पाऊस
अर्जेंटीनात सध्या कमी पाऊस आहे. अर्जेंटीनात चालू आठवड्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता होता. मागील काही दिवसांपासून अर्जेंटीनातील सोयाबीन पिकाला कमी पावसाचा फटका बसतोय. पिकाच्या वाढीवर कमी पावसाचा परिणाम होतोय. त्यामुळं अर्जेंटीनातील सोयाबीन पिकाला पावसाची नितांत गरज होती. पण पाऊस झाला नाही. त्यामुळं येथील उत्पादन कमी राहील, असे अंदाज आता येत आहेत. तसंच अर्जेंटीनातील शेतकऱ्यांनी जवळपास ८० टक्के सोयाबीनची आगाऊ विक्री केल्याचे वृत्त आहे. याचा परिणाम सोयाबीन दरावर जाणवतोय.

…………..
चीनमधून वाढली मागणी
अगदी या आठवड्याच्या सुरुवातीला चीनमध्ये कोरोना लाॅकडाऊन कडक होण्याच्या बातम्या येत होत्या. मात्र झालं उलंट. चीनमध्ये निर्बंध शिथिल केले जात आहेत. पुढील काही दिवसांमध्ये चीनची बाजारपेठ पूर्ण खुली होईल, असंही सांगितलं जातं. त्यामुळं चीनमधून सोयाबीनला मोठी मागणी येण्याची शक्यता आहे. या कारणामुळंही सोयाबीनचे दर वाढले आहेत.

…………….
खाद्यतेलाचे वाढते दर…
इंडोनेशियाने जैव इंधनात पामतेलाचा वापर ३५ टक्क्यांपर्यंत करण्याचे धोरण फेब्रुवारीपासून राबवण्याचं ठरवलं आहे. तसंच चीनमधूनही पामतेलाला मागणी वाढत आहे. यामुळं पामतेलाचे दर वाढले. याचा आधार सोयातेलाला मिळाला. सोयातेलाचे दरही हळूहळू वाढत आहेत. आज सोयातेलाच्या दरात जवळपास एक टक्क्यांची सुधारणा पाहायला मिळाली. सोयापेंड आणि सोयातेलाला आधार मिळत असल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचेही दर वाढले.

………….
देशातील बाजारात स्थिती काय?
देशातील बाजारात आजही सोयाबीन दर स्थिर होते. सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळाला. आंतरराष्ट्रीय पातळीवर नाताळ आणि नवीन वर्षामुळं दरवर्षी मोठे आयातदार, ब्रोकर्स आणि कंपन्यांमध्ये सुट्ट्यांचा काळ असतो. परिणामी या काळात खरेदी विक्रेचे मोठे व्यवहार होत नाहीत. मात्र जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून बाजार पुन्हा सुरळीत सुरु होतो. त्यामुळे जानेवारीत सोयापेंडला मागणी वाढू शकते. त्यामुळे सोयाबीनचे दरही वाढतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

…………….
दर किती वाढतील?
भारताच्या रुपयाचं अवमूल्यानंही झालेलं आहे. त्यामुळं भारताची सोयापेंड आणखी स्वस्त झालीये. जानेवारीत भारताच्या सोयापेंडला चांगली मागणी येऊ शकते. खाद्यतेलाचेही दर वाढू शकतात. यामुळं देशातील सोयाबीनचे दरही ५ हजार ५०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान वाढू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.

………………
प्रतिक्रिया
देशात सोयाबीनचे दर कमी झाल्यानंतर देशातून सोयापेंडची निर्यात वाढली. आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर वाढत आहेत. मात्र नाताळ आणि नवीन वर्षामुळं दरवर्षी मोठे मोठे आयातदार, ब्रोकर्स आणि कंपन्यांमध्ये सुट्ट्यांचा काळ असतो. परिणामी या काळात खरेदी विक्रेचे मोठे व्यवहार होत नाहीत. मात्र जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून बाजार पुन्हा सुरळीत सुरु होतो. त्यामुळे बाजार सुरु झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचा आपल्या देशातील सोयाबीन बाजारावर परिणाम दिसेल.
- सचिन अगरवाल, सोयाबीन प्रक्रियादार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

SCROLL FOR NEXT