Maize Rate
Maize Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize : मका तेजीतच राहणार?

अनिल जाधव

पुणेः देशात सध्या मक्याचे दर तेजीत (Maize Rate Boom) आहेत. मात्र युक्रेनमधून मक्याची निर्यात (Maize Export From Ukraine) आता सुरु झाली आहे. युक्रेन विविध देशांना मका निर्यात करतोय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचा पुरवठा (Global Market Maize Supply) काहीसा वाढला.

युक्रेनमधून मका निर्यात सुरु झाली आहे. युक्रेनच्या बंदरांवर अकडून पडलेली जवळपास १० जहाजे बाहेर पडली आहेत. या जहाजांमध्ये जवळपास ३ लाख टन शेतीमाल आहे. त्यात जवळपास अडीच लाख टन मका आहे. युक्रेनमधून मका निर्यात सुरु झाल्यानंतर सुरुवातीचे दोन ते तीन दिवस बाजारावर परिणाम जाणवला. मात्र अमेरिकेतून पीक नुकसानीचे अहवाल आल्यामुळे मार्केट सेन्टिमेन्ट पुन्हा बदललं आहे.

अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीएनं जागतिक मका उत्पादन २०२२-२३ मध्ये ३२० लाख टनांनी कमी राहण्याचा अंदाज वर्तवलाय. अमेरिका जगातील आघाडीचा मका उत्पादक देश आहे. अमेरिकेत यंदा पिकाला उष्णतेचा फटका बसतोय. त्यामुळे अमेरिकेतील मका उत्पादन १५५ लाख टनांनी घटण्याची शक्यता आहे. तर युद्धाची झळ सोसणाऱ्या युक्रेनचंही उत्पादन १७१ लाख टनांनी घटणार आहे. मागील वर्षी युक्रेनमध्ये ४२१ लाख टन उत्पादन होतं. यंदा ते २५० लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यता आहे. तर चीन आणि रशियातही पिकाला फटका बसल्यानं उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं एकूणच जागतिक मका उत्पादन कमी राहील.

जागतिक मका निर्यातही यंदा १६७ लाख टनांनी कमी राहण्याचा अंदाज आहे. युक्रेनमधून निर्यात होणारा मका यंदा १५० लाख टनांनी कमी राहील. येथून मागील वर्षी २४० लाख टन मका निर्यात झाला होता, तो यंदा केवळ ९० लाख टनांवर स्थिरावेल. त्यानंतर अमेरिकेची निर्यात ५३ लाख टनांनी कमी राहील. मात्र ब्राझील आणि अर्जेंटीनातून जास्त मका निर्यात होण्याची शक्यता युएसडीएनं व्यक्त केली. म्हणजेच २०२२-२३ च्या हंगामात जागतिक मक्याचं उत्पादन घटेल. तसचं मका निर्यातही कमी राहील.

यंदा जागतिक मका उत्पादन आणि निर्यात कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं मक्याचे दर वधारले आहेत. मंगळवारी शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडवर मक्याचे वायद्यांत जवळपास २ टक्क्यांची सुधारणा होती. वायदे ६.१९ डाॅलर प्रतिबुशेल्सने झाले. तर चीनच्या दलियन एक्सचेंजवरही मका दर टिकून आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील या कलामुळे भारतातील मका दराला आधार मिळतोय.

म्हणजेच जागतिक बाजारात युक्रेनमधून मका पुरवठा वाढला तरी त्याचा भारतातील दरावर काही परिणाम होणार नाही. देशात मंगळवारी देशातील बाजारांमध्ये मक्याला २ हजार ३०० ते २ हजार ७०० रुपये दर मिळाला. पुढील काळात या दरामध्ये वाढ होऊ शकते. मागणीत झालेली वाढ आणि कमी पुरवठ्यामुळे देशातील मक्याचे दर नोव्हेंबरपर्यंत तेजीत राहू शकतात, असं जाणकारांनी सांगितलं.

मका हे प्रामुख्यानं पशुखाद्य आहे. त्यामुळं सरकार मक्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी फार काही करेल, असं वाटत नाही. युक्रेनमधून मका निर्यात सुरळीत झाली तरी यंदा तिथून येणारा मका कमी असेल. त्यामुळं देशांतर्गत मक्याच्या बाजारावर त्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही.
गौरव कोचर, शेतीमाल बाजार विश्लेषक
देशात सध्या मक्याचा तुटवडा जाणवतोय. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांसाठी ७५ लाख टन मक्याची गरज असेल. पण मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. देशात मक्याचा पुरवठा २० ते ३० टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळं मका दर तेजीत राहतील.
दीपक चव्हाण, शेतीमाल बाजार अभ्यासक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

Storm Hits Meghalaya's : मेघालयात १३ गावांमध्ये घरांचे नुकसान, ४०० हून अधिक लोक बाधित

SCROLL FOR NEXT