Jaggery Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Jaggery Production : यंदा गुळाचे उत्पादन वाढणार

यंदा गुळाचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जादा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकातील गूळ उत्पादक भागामध्ये महापुराने उसाचे फारसे नुकसान न झाल्याने यंदा गुऱ्हाळ घरांना मुबलक ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

कोल्हापूर : यंदा गुळाचे उत्पादन (Jaggery Production) गेल्या वर्षीपेक्षा जादा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकातील गूळ उत्पादक (Jaggery Producer) भागामध्ये महापुराने उसाचे फारसे नुकसान (Sugarcane Crop Damage) न झाल्याने यंदा गुऱ्हाळ घरांना मुबलक ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. परिणामी, पहिल्यापासूनच गुळाची निर्मिती (Jaggery Production) चांगली होईल असे चित्र आहे.

सध्या गूळ हंगाम सुरू होण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दसऱ्यानंतर गुऱ्हाळे सुरू होण्यास प्रारंभ होईल. महाराष्ट्राबरोबर कर्नाटकातही यंदा उसाचे क्षेत्र वाढले आहे. यामुळे साहजिकच गुऱ्हाळ घरांनाही मुबलक ऊस मिळणे शक्य होणार असल्याचे गूळ उद्योगातून सांगण्यात आले.

गुजरातमध्ये दिवाळीनंतर गुळाचा उठाव शक्य

पितृ पंधरवड्यामुळे गुजरातमध्ये गुळाची विक्री फारशी होत नव्हती. दसरा-दिवाळीनंतर लग्नसराईमुळे गुळाची विक्री वाढण्याची शक्यता आहे. यंदा कोविडचे सावट नसल्याने गुळाची विक्री चांगली होईल, असा आशावाद व्यापाऱ्यांना आहे. यानुसार गूळ खरेदीचेही नियोजन सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून गुजरात येथील व्यापारी कोल्हापूरसह सांगली व कर्नाटकातील गुळावरही अवलंबून आहेत.

गुऱ्हाळ घरे पूर्ण क्षमतेने चालणार

यंदा पाऊस चांगला झाला आहे. गुऱ्हाळे असणाऱ्या भागांमध्ये दोन ते तीन वेळा पूर आला असला तरी पूर्ण ऊस खराब होण्याइतके उसाचे नुकसान झाले नाही. यामुळे गुऱ्हाळ घरे पूर्ण क्षमतेने चालतील, अशी शक्यता आहे. गेल्या वर्षी मात्र पुरामुळे उसाचे मोठे नुकसान झाले होते. उसाचे पूर्णपणे नुकसान झाल्याने गुऱ्हाळ घरांना चांगला ऊस मिळवण्यासाठी तब्बल एक महिना प्रतीक्षा करावी लागली.

यंदाही ऊस क्षेत्रात पुराचे पाणी आले असले तरी ते फार काळ टिकले नाही यामुळे उसाची प्रत चांगली राहिली आहे. उसाची वाढही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगली असल्याचे ऊस उत्पादकांनी सांगितले. याचा अनुकूल परिणाम गुऱ्हाळ घरांना ऊस उपलब्धतेसाठी होणार आहे. सध्या गुऱ्हाळघर चालकांकडून उसाच्या क्षेत्राची चाचणी करण्याचे काम सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यांना निश्‍चितच समाधानकारक परिस्थिती असल्याचे गुऱ्हाळघर चालकांनी सांगितले.

कोल्हापुरात दोनशे गुऱ्हाळ घरे सुरू होण्याची शक्यता

कोल्हापूर जिल्ह्यात यंदा सुमारे २०० गुऱ्हाळ घरे सुरू होतील, असा अंदाज आहे. काही गुऱ्हाळ घरांनी घटस्थापनेला मुहूर्त केला. प्रत्यक्ष गूळ तयार करण्यास दसऱ्यानंतर वेग येऊ शकतो. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यात थोड्या थोड्या प्रमाणात गूळनिर्मिती सुरूच राहिली. यामुळे एप्रिल, मे नंतर बंद होणारा गूळ विभाग यंदा अजूनपर्यंत सुरू आहे.

काही गुऱ्हाळ घरे बारमाही स्वरूपात सुरू असल्याने बाजार समितीत एक-दोन दिवसाआड गुळाची आवक सुरूच असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. ज्या प्रमाणात गूळ येत होता तो विक्रीही होत आहे. कोरोनानंतर बाजारपेठा खुल्या झाल्याचा सकारात्मक परिणाम गुळाच्या विक्रीवरही झाला आहे. सध्याही काही गुऱ्हाळ घरांनी गुऱ्हाळ सुरू करण्यास प्राधान्य दिले. पण दसऱ्यानंतर पूर्ण क्षमतेने मजूर आल्यानंतर गुळाचा हंगामही वेग घेईल, अशी शक्यता आहे.

कोल्हापुरात गुळाची आवक सुरूच

राज्यातील गुळाची प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या कोल्हापूर बाजार समितीत एक दिवसाआड दहा ते बारा हजार गूळ रव्यांची आवक होत आहे. विशेष करून करवीर तालुक्यातून हा गूळ येत आहे. येत्या पंधरा दिवसांत कागल, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड आदी तालुक्यांतूनही गुळाच्या निर्मितीस प्रारंभ होईल, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. सध्या येणाऱ्या गुळास प्रति क्विंटल ३८०० ते ४००० रुपये दर मिळत आहे.

गूळ उत्पादनात महाराष्ट्र, कर्नाटक अग्रेसर राहण्याची शक्यता

जगात २५ देशांमध्ये गुळाचे उत्पादन घेतले जाते. जगातील या देशांकडून सुमारे १३ दशलक्ष टन गुळाची निर्मिती दरवर्षी होते. यापैकी तब्बल ५५ टक्के वाटा हा भारताचा आहे. पाच ते सात दश लक्ष टन गूळ एकट्या भारतात तयार केला जातो. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू ही प्रमुख गूळ उत्पादक राज्ये आहेत.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून विशेष करून उत्तर कर्नाटकात गुळाची नवी बाजारपेठ उदयास येत आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, उत्तर कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यामध्ये यंदा मुबलक पाऊस झाल्याने उसाची वाढ चांगली झाली आहे. यामुळे गुऱ्हाळ घरांना ऊस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल, असे सध्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Samruddhi Yojana: पैशाचे सोंग आणता येत नाही

Electricity Bill Recovery: महावितरणकडून वीजबिल वसुलीची मोहीम तीव्र

Water Rate Extension: पाण्याच्या दरनिश्चितीला मुदतवाढ

Panchanama Scam: ग्रामसेविकेने नुकसानभरपाईत मागितला शेतकऱ्याला वाटा

Gram Rozgar Assistant: ग्रामरोजगार सहायकांवर उपासमारीची वेळ

SCROLL FOR NEXT