Dharashiv News : बारदाना उपलब्ध नसल्यामुळे हमीभावाने सोयाबीन खरेदी ठप्प झाली आहे. यामुळे सोयाबीनसाठी बारदाना उपलब्ध करून द्यावा व खरेदीला जानेवारीअखेर मुदतवाढ द्यावी, तसेच हमीभावाने तूर खरेदी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी गुरुवारी (ता. दोन) पुणे येथील सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांच्याकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठवाड्यात खरिपामध्ये सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये ९० टक्के सोयाबीनची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामध्येच सोयाबीनची काढली झाली. सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले आहे.
सोयाबीनमधील आद्रता थंड हवामानामुळे कमी होत नाही. जिल्ह्यामध्ये सोयाबीनची २० खरेदी केंद्र कार्यरत असताना गेल्या आठ दिवसांपासून बारदान्याअभावी १२ खरेदी केंद्र बंद झाली आहेत. त्यासाठी त्या खरेदी केंद्रांना बारदाना उपलब्ध करून द्यावा व सोयाबीन खरेदीची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढवावी.
जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असून, गेल्या वर्षात १२ हजार रुपये प्रतिक्विंटल तूर विक्री होत असताना आज मात्र त्याचे भाव सात हजार रुपयांवर येऊन ठेपलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल चार ते पाच हजार रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने जिल्ह्यामध्ये तूर हमीभाव केंद्र सुरू करून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळावे, अशी मागणी दुधगावकर यांनी केली आहे.
तातडीने बारदाना उपलब्ध करा : घाडगे पाटील
जिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रांवर बारदानाअभावी सोयाबीनची खरेदी रखडली आहे. २० पैकी १२ केंद्र बंद पडले आहेत. या सर्व केंद्रांना तातडीने बारदाना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार कैलास घाडगे पाटील यांनी पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात २०२४ मधील खरीप हंगामात पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात चार लाख ६२ हजार ८७२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झालेली होती. जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. मात्र खरेदी केंद्रांची अपुरी संख्या व बारदानाअभावी २० पैकी १२ केंद्र बंद पडले आहेत.
या केंद्रांना तातडीने बारदाना उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सध्या खुल्या बाजारात सोयाबीनला कमी भाव असल्याने शेतकरी आपलेसोयाबीन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणत आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये सद्यःस्थितीत २० खरेदी केंद्र कार्यरत आहेत. परंतु यातील १२ खरेदी केंद्र बारदाना उपलब्ध नसल्यामुळे बंद आहेत.
उर्वरित चार खरेदी केंद्रावर अल्प प्रमाणात बारदाना उपलब्ध असून, तेही खरेदी केंद्र बंद पडण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकऱ्यांना त्यांच्याकडील सोयाबीन नाइलाजाने खासगी बाजारपेठेत विक्री करावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. धाराशिव जिल्ह्यातील बारदानाअभावी बंद असलेल्या खरेदी केंद्रांना बारदाना मुबलक प्रमाणात उपलब्ध करून ते सुरू करणे आवश्यक आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.