Akola News : जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथे सीसीआयने कापूस खरेदीसाठी दहा केंद्रे दिली असतानाही एकाच केंद्रावर खरेदी सुरू केली. शिवाय खरेदीबाबतच्या नियमांमुळे येथील जिनिंगधारकांनी कापूस खरेदी बंदचा निर्णय घेतला होता.
अखेरीस शुक्रवारी (ता.१५) सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी भेट देत तोडगा काढला. सोमवारपासून (ता.१८) या ठिकाणी कापूस खरेदी पूर्ववत होत असून सर्वच केंद्रांवर खरेदी केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी जिनिंग धारकांची बाजार समितीमध्ये बैठक घेत सविस्तर चर्चाही केली.
भारतीय कापूस महामंडळाद्वारे लादलेल्या एल१ एल२ चा नवीन नियम तसेच कापूस खरेदीत दुजाभाव होत असल्याचा आरोप जिनिंग धारकांनी करीत सीसीआयच्या प्रशासनाला लेखी पत्र दिले होते. खरेदी बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. यामुळे तोडगा काढण्यासाठी सीसीआयचे ललितकुमार गुप्ता व अकोला शाखेचे उप प्रबंधक नीरजकुमार यांनी भेट दिली.
बार्शीटाकळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतिष शेळके यांची भेट घेत चर्चा केली. खरेदीदार जिनिंग फॅक्टरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत आश्वासन दिले. त्यांनी कापूस खरेदी सुरू करण्याबाबत सांगितले.
बार्शीटाकळी येथे सोमवारपासून दहाही केंद्रांवर खरेदी होणार आहे. सम प्रमाणात कापसाच्या गाड्या सोडण्याचे निर्देश ललितकुमार गुप्ता यांनी संबंधितांना दिले. कापूस विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेतल्या जाईल असे सांगितले.
भारतीय कापूस महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन जिनिंग फॅक्टरी संघटनेची बाजू समजावून घेत सकारात्मक चर्चा केली. शेतकरी व जिनिंग मालकांच्या हिताचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांसाठी दहाही केंद्रांवर कापूस खरेदी केली जाणार आहे. सोमवारपासून कापूस खरेदी सुरळीत होणार आहे.- सतिष शेळके, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, बार्शी टाकळी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.