Cotton Market Update
Cotton Market Update Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : जगभरातील अस्थिरतेने कापसाला फटका शक्य

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Cotton Market Update: जगभरातील अस्थिर वित्तीय स्थिती, आयटी क्षेत्रातील संकट व कापूस पिकात उत्पादकांना (Cotton Producer) सोसावे लागणारे नुकसान यामुळे कापूस पिकाला (Cotton Crop) मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

त्याची सुरुवात झाली असून, अमेरिकेतील लागवड (Cotton Cultivation) सुमारे १५ टक्के कमी होईल, असे दिसत आहे. याच वेळी इतर कापूस उत्पादक देशांत कापसाबाबत समाधानकारक स्थिती नाही.

त्यामुळे पुढील हंगामात (२०२३-२४) कापूसटंचाई (Cotton Shortage) अधिक राहील. कापूस बाजारात मोठी उलथापालथ दिसेल, असे संकेत आहेत.

अमेरिका जगातील सर्वांत मोठा कापूस निर्यातदार देश आहे. तेथे दरवर्षी २५० ते २५४ लाख गाठी (एक गाठ १७० किलो रुई) कापसाचे उत्पादन घेतले जाते. परंतु मागील दोन हंगाम तेथील लागवड व उत्पादन कमी राहिले आहे.

या हंगामातही तेथे जेमतेम १९८ लाख गाठींचे उत्पादन हाती आल्याची माहिती आहे. दुसरीकडे नव्या हंगामासंबंधी तेथे लागवड सुरू झाली आहे.

तेथे कापूस उत्पादनात सर्वांत अग्रेसर असलेल्या टेक्सासमध्ये कापूस दरांमधील अस्थिरता, कापसाची कमी मागणी किंवा कमी निर्यात, महागाई आदी कारणांमुळे लागवडीवर परिणाम झाला आहे. तेथे ८ ते १० एप्रिलपर्यंत लागवड दरवर्षी पूर्ण होते. यातच यंदा कापूस बाजार किंवा वायदा बाजारात कापूस दर ८० सेंटखाली आहेत.

अमेरिकेत कापूस दरपातळी या हंगामात नीचांकी राहिली आहे. अमेरिकेत कापसाला जे दर २० वर्षांपूर्वी मिळाले होते, तेच दर तेथे सध्या आहेत.

हे दर तेथील कापूस उत्पादकांना परवडणारे नाहीत. सरकार तेथील कापूस उत्पादकांचे नुकसान भरून काढण्यासाठी वित्तीय मदत उभारते.

परंतु आयटी क्षेत्रातील मंदी, वित्तीय संकटे यामुळे सरकारही तेथे सावध आहे. दुष्काळी संकट लक्षात घेऊन तेथील सिंचन प्रकल्प, जलसाठे सरकारने ताब्यात घेतले आहेत.

पाणी वापराबाबत काटकसर सुरू आहे. दुसरीकडे कापूस पिकात नुकसान होत असल्याने अमेरिकेत कापूस लागवडीत घट आली आहे. तेथे दरवर्षी ४१ ते ४२ लाख हेक्टरवर कापसाची लागवड केली जाते.

ही लागवड तेथे यंदा ३७ ते ३८ लाख हेक्टरवर राहू शकते, अशी माहिती जाणकारांनी दिली. ब्राझीलमधील लागवडदेखील १४ लाख हेक्टरवरून १२ ते १३ लाख हेक्टरपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.

चीन अस्थिर, भारतात जरतरची स्थिती

चीन अस्थिर आहे. अमेरिका व चीनमध्ये शीतयुद्ध सुरूच आहे. व्यापारविषयक निर्बंधांचे मुद्दे तेथे सतत समोर येत आहेत. चीनचा कापूस उद्योगही यंदा अडचणीत आहे. तेथे या हंगामात ५०० लाख गाठींवरही पुरेशी प्रक्रिया झालेली नाही.

शिवाय कापसासंबंधी संरक्षित साठ्याबाबतही (बफर) तेथील सरकारने स्पष्टपणे माहिती जारी केलेली नाही. भारतातही कापूस उत्पादक अडचणीत आहेत. अपेक्षित दर नसल्याने पीक परवडलेले नाही.

यामुळे भारतातही पूर्वहंगामी कापूस पिकाखालील क्षेत्र कमी होईल. उत्तरेकडे हे क्षेत्र तेलबिया पिकांखाली जाईल. तर गुजरात, महाराष्ट्रात हे क्षेत्र भाजीपाला, फळबागांखाली जाऊ शकते, असाही अंदाज आहे.

...तर उत्तर भारतात लागवडीत घट

भारतात दरवर्षी कापसाची १२५ ते १२९ लाख हेक्टरवर लागवड केली जाते. कापूस बाजार असाच अस्थिर राहिल्यास उत्तर भारतात लागवडीत मोठी घट होऊन ती एकूण १२० लाख हेक्टरपर्यंत खाली येऊ शकते.

पण दर वाढल्यास आणि जगातून मेमध्ये कापसाची मोठी मागणी आल्यास भारतात पुढे कापूस लागवड स्थिर राहील. चीनमधील लागवड क्रॉप प्लॅनिंगच्या धोरणामुळे स्थिर म्हणजेच ३२ ते ३३ लाख हेक्टरवर राहील, अशी माहिती मिळाली.

उत्पादनाचे गणित बिघडणार

या हंगामात शिलकी कापूस साठा अधिक राहू शकतो. हा साठा जगात १८ दशलक्ष टनांवर असेल. परंतु लागवडीत घट झाल्याने उत्पादन घटून २२ दशलक्ष टनांवर राहील. अर्थात, जगात १२०० लाख गाठींच्या उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही, असेही दिसत आहे. यामुळे कापूस पुरवठ्याचे गणित बिघडेल, असे सांगण्यात येत आहे.

भारतात हमीभाव वाढण्याची चर्चा

भारतात २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक आहे. तसेच कापूस उत्पादक नाराज आहेत. यामुळे कापसाचा हमीभाव वाढू शकतो. त्यात किमान १० टक्के वाढ झाल्यास हमीभाव सात हजार रुपये प्रतिक्विंटल होईल, अशीही चर्चा कापूस बाजारात आहे.

कापूससाठा यंदा अधिक आहे. वापर घटला आहे. यामुळे सध्या दरात तेजी दिसत नाही. परंतु अमेरिकेत कापूस लागवडीत घटीची माहिती येत आहे. इतर कापूस उत्पादक देशांतही कोरडवाहू व पूर्वहंगामी कापूस पिकाबाबात समाधानकारक स्थितीची शक्यता नाही. कारण कापूस उत्पादक कमी दरामुळे अडचणीत आहे. पुढील हंगामात कापूस पुरवठ्यावर परिणाम होईल.
महेश शारदा, माजी अध्यक्ष, नॉर्थ इंडिया कॉटन असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT