Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market : सण-उत्सवाच्या काळातही केळी १० हजार रुपयांवरच

Banana Rate : सण-उत्सवाचा काळ असल्याने केळीची मागणी वाढत दर चांगले मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.

Team Agrowon

Yavatmal News : सण-उत्सवाचा काळ असल्याने केळीची मागणी वाढत दर चांगले मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र यंदाही केळीच्या दरात कोणतीच सुधारणा झाली नसल्याने दहा हजार रुपये टन याप्रमाणेच बागायतदारांना विक्री करावी लागली. व्यापाऱ्यांकडून थेट बागेतूनच कापणी आणि वाहतूक होत आहे.

शेतकरी आत्महत्याग्रस्त असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात रेशीम, केळी, ऊस, हळद यांसारख्या व्यावसायिक पिकांची लागवड करण्यासाठी शेतकरी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे बऱ्याच भागातील अर्थकारण सुधारण्यास चालना मिळाली आहे. दारव्हा तालुक्‍यातील गाजीपूर परिसरात तीळ त्यासोबतच केळी आणि आता काही शेतकरी उसासारख्या पिकाकडे वळले आहेत.

केळी खालील क्षेत्र ५ हेक्‍टर पेक्षा अधिक नसल्याचे तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात यांनी सांगितले. मात्र आहे त्याच क्षेत्रातून दर्जेदार केळीचे उत्पादन होते. परिणामी चांगला परतावा मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा राहते. सध्या श्रावण सोमवार असल्याने केळीचे दर तेजीत राहतील, असे वाटत होते.

मात्र केळीच्या हंगामाला सुरुवात झाली तेव्हापासून दहा रुपये किलो (दहा हजार रुपये टन) असाच दर मिळत आहे. स्थानिक दारव्हा येथील व्यापाऱ्यांद्वारे याची खरेदी होते. बाजारात केळीची किरकोळ विक्री ५० रुपये प्रति डझन याप्रमाणे होत आहे. किरकोळ बाजारात चांगला भाव मिळत असला तरी घाऊक दर मात्र अपेक्षित नसल्याची खंत केळी बागायतदारांनी व्यक्‍त केली.

वर्षभरात एक एकरातून २५ टन मालाची उत्पादकता अपेक्षित आहे. एकरी एक लाख रुपयांचा खर्च व्यवस्थापनावर होतो. १० हजार रुपये टन असा दर आहे. केळीला २०१८-१९ या वर्षात १२ हजार रुपये टनाचा उच्चांकी दर मिळाला होता. त्यानंतर दरात वाढ झाली नाही. १५ हजार रुपये टनापर्यंतचाही दर मिळू शकतो. परंतु क्षेत्र कमी असल्याने व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा नाही. त्याचाही परिणाम दरावर होतो.
- जगदीश चव्हाण, केळी उत्पादक, गाजीपूर, यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Disease : खारपाण पट्ट्यात कपाशीवर ‘स्पोडोप्टेरा’चा प्रादुर्भाव

Anil Daunde : प्रशासनाने वारकऱ्यांना सुविधा द्याव्यात

Electricity Bill : खेडमधील १९ हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले माफ

Paddy Crop Harvesting : भात पीक काढणीची लगबग

CM Eknath Shinde : महायुतीच्या योजना चोरून बनवला वचननामा : मुख्यमंत्री शिंदे

SCROLL FOR NEXT