शंकर बहिरट
कांदा उत्पादक शेतकरी (Onion Producer Farmer) सध्या दर पडल्यामुळे अडचणीत आले आहेत. आस्मानी आणि सुलतानी संकटाने त्यांना जेरीस आले आहेत. यंदा त्यांना तिहेरी फटका बसला आहे. आधीच वाढलेला खर्च, घटलेलं उत्पादन आणि आता चाळीतल्या कांद्याचं होत असलेलं नुकसान यामुळे शेतकऱ्यांची तिहेरी कोंडी झाली आहे. कांदा नेहमीच चर्चेत असतो. कांद्याचे भाव थोडेफार वाढले की प्रसारमाध्यमांतून मोठा गदारोळ सुरू होतो. शहरी लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटतात. कांद्याचे भाव पडल्यावर मात्र शेतकऱ्यांचे हाल कुत्रं विचारत नाही. माध्यमांमध्ये चिडीचूप शांतता असते.
आमचा चाकण परिसर कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. आमच्या कुटुंबासहित पंचक्रोशीत जास्तीत जास्त शेतकरी कांदा उत्पादक (Onion Producer Farmer) आहेत. लहानपणापासून मी बघतोय कांद्याच्या भाववाढीमुळे (Onion Rates) कांदा प्रश्नावर गदारोळ होतात. सरकार धोक्यात आलेत. सामान्य गिऱ्हाईकांच्या डोळ्यात पाणी आणलेय. सवंग चर्चा झडतात. ज्यांनी कधी शेतात पाऊल ठेवले नाही असे पोकळ शहाणपणाचे सल्ले देणारे सुद्धा ढिगभर आहेत.
कांदा उत्पादक शेतकरी मात्र आहे तसाच दरिद्री आहे. कधीतरी योगायोगाने चार-पाच वर्षात चांगला भाव मिळाला तर लॉटरी लागल्याप्रमाणे तो हुरळुन जातो. १९९९ साली कांद्याला चांगला भाव मिळाला त्यावेळी वडीलांनी खुश होऊन माझ्यासाठी मोटरसायकल घेतली होती. तेव्हापासुन २०१३ पर्यंत कांद्यात फक्त तोटा झाला. तेव्हापासून आम्ही कांदा पिक (Onion Crop) घेणे बंद केले.
पावसाळ्यात चांगला भाव मिळेल म्हणुन आर्थिक ताण असताना सुद्धा आम्ही कांदा वखारीत साठवायचो पण काढणीच्या वेळी असणाऱ्या दरा पेक्षा पावसाळ्यात दर घसरायचा.पावसाळ्यातल्या दमट हवामानामुळे कांदा खराब व्हायला सुरुवात होते. नाईलाजाने आहे त्या भावात कांदा विकायचा निर्णय घ्यावा लागतो. मग पुन्हा त्याला साफसूफ करणे आले. म्हणजे प्रत्येक कांद्याची जुनाट सुरकुतलेली साल काढायची.
मोड आलेले,दिसायला खराब झालेले 'बदला' म्हणून दहा पिशव्या मागे किमान दोन पिशव्या निघायच्या. बदला माल मातीमोल भावातच जातो किंवा कधी कधी असाच फेकून द्यावा लागतो. आज ना उद्या बाजार वाढेल या आशेने वाट बघता बघता निम्म्यापेक्षा जास्त कांदा सडून जायचा.कांदा सडल्यानंतर जिवंतपणी नरकाचा अनुभव.
सडक्या कांद्यातून सुटलेले काळपट पाणी, अतिशय घाणेरडा वास आणि वळवळणाऱ्या अळ्या पाहिल्या की जेवण जात नसे. अशा घाणीत काम केल्यामुळे दरवर्षी आई आजारी पडायची. अशी इथल्या सर्वांचीच अवस्था. साठवणुक करून सुद्धा नुकसान होतेय हे पाहून गेल्या काही वर्षांपासून शेतकरी फेब्रुवारी-मार्चमध्ये काढणीच्या वेळी शेतातच गोणी भरतात. आणि मिळेल त्या भावात विकून कसेबसे भांडवल पदरात पाडून मोकळे होतात.
जेव्हा बाजारात तेजी येते तेव्हा अपवाद वगळता शेतकऱ्यांपैकी फारसा कुणाकडे कांदा नसतो. वाढलेली महागाई, मजूर टंचाई, अवकाळी पाऊस, बदलत्या हवामानामुळे वाढलेला किडींचा प्रादुर्भाव, रासायनिक खते (Chemical Fertilizer) , किटकनाशके (pesticide) यांचा वाढलेला वापर या सगळ्यांचा विचार केला तर कांदा उत्पादक शेतकरी भयंकर तोट्यात आहे.
कांद्याला वीस वर्षांपूर्वी जो भाव होता (Onion Rates) तोच भाव आजही आहे. हे कटू वास्तव आहेत. वीस वर्षांत कित्येक पटीने आर्थिक उत्पन्न वाढलेल्या शहरी नोकरदार किंवा व्यवसायिकांनी हे वास्तव समजून घेतले पाहिजे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.