Shetkari Andolan : गाड्यांच्या लांबच लांब रांगा, वळवलेली वाहतूक आणि रोवण्यात येणारे तंबू आणि घातले जाणारे लंगर ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाची आठवण ताजी झाली. शेती कायद्यांविरोधात २०२०-२१ मध्ये शेतकऱ्यांनी ऐतिहासिक आंदोलन करून सरकारला माघार घेण्यास भाग पाडले होते.
हरियानात सूर्यफुलाचे भाव पडल्यानंतर शेतकऱ्यांनी ६ जूनपासून हमीभावाने खरेदीसाठी आंदोलन सरु केले होते. काल राज्य सरकारने हमीभावाने सूर्यफुल खरेदीचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
सूर्यफुलाला हमीभावाची मागणी शेतकरी करत होते. मागील हंगामात सूर्यफुलाला ६ हजार ४०० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला होता. तर २०२३-२४ च्या हंगामासाठी सूर्यफुलाच्या हमीभावात ३६० रुपयांची वाढ करून ६ हजार ७६० रुपये करण्यात आला.
पण यंदा हमीभाव फक्त नावालाच दिसतो आहे. कारण खुल्या बाजारात सूर्यफुलाचे भाव सपशेल कोसळले. सध्या हरियानात सूर्यफुलाचे भाव ४ हजारांवर आले.
सध्या सूर्यफुलाला गेल्यावर्षीच्या हमीभावापेक्षा २ हजार ४०० रुपये आणि चालू हंगामातील हमीभावापेक्षा २ हजार ७६० रुपये कमी भाव मिळत आहे. यातून उत्पादन खर्चही वसूल होत नाही, असे शेतकरी सांगतात. शेतकऱ्यांच्या या दाव्याला सरकारचेच आकडे पुरावा देतात.
सरकारने यंदाचा हमीभाव जाहीर करताना सरकारने एक क्विंटलसाठी ४ हजार ५०५ रुपये उत्पादन खर्च येतो असे सांगितले आहे. या उत्पादन खर्चावरूनच हमीभाव ठरविण्यात आला. म्हणजेच शेतकऱ्यांना सध्या उत्पादन खर्चापेक्षा ५०५ रुपये कमी भाव मिळत आहे.
कर्नाटकनंतर हरियाना सूर्यफुल उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. देशातील एकूण उत्पादनापैकी १० टक्के उत्पादन हरियानात होते. हरियाना राज्य सरकारने खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दरात सूर्यफुल विकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भावांतर भरपाई योजना सुरु केली.
पण या योजनेतून शेतकऱ्यांना क्विंटलसाठी केवळ एक हजार रुपये भरपाई मिळत आहे. वास्तवात मिळणारा भाव अडीच हजारांनी कमी आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना भरपाई मिळाली तरी किमान दीड हजारांचा तोटा आहे. यामुळे शेतकरी हमीभावाने सूर्यफुल खरेदी करण्याची मागणी होती.
सूर्यफुलाचे भाव का पडले?
भारताला खाद्यतेलाची ७० टक्के गरज आयातीतून पूर्ण करावी लागते. भारत दरवर्षी २० ते २५ लाख टन सूर्यफुल तेल आयात करतो. मागील दोन वर्षात खाद्यतेलाचे दर वाढल्यामुळे केंद्र सरकारने आयातशुल्कात मोठी कपात केली.
त्यातच युध्दाची झळ सोसणाऱ्या युक्रेनने सूर्यफुल तेलाचे भाव कमी करून निर्यात वाढवली. सहाजिकच भारतात अधिक आयात झाली. आता परिस्थिती अशी आहे की सोयाबीन तेलापेक्षा सूर्यफुल तेल स्वस्त आहे. एरवी सूर्यफुल तेलाचे भाव लिटरमागे २० ते ३० रुपयांनी जास्त असतात. पण सध्या सूर्यफुल तेल ११० ते १२० रुपयाने विकले जाते.
तर सोयाबीन तेलाचे भाव १३० रुपयांवर आहेत. त्यामुळे देशातील सूर्यफुलापासून तयार होणाऱ्या तेलाचेही भाव पडले. परिणामी बाजारात सूर्यफुलाचे भाव पडले. याला जबाबदार केंद्र सरकारचे आयातजीवी धोरण आहे.
खाद्यतेल आयातीचा लोंढा अला असून देशात साठे पडून आहेत. त्यामुळे खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करावी, अशी मागणी देशातील शेतकरी, आयातदार, रिफायनिंग उद्योग आणि जाणकार करत आहेत. पण सरकारने याकडे सपशेल दुर्लक्ष केले. त्याचे दुष्परिणाम आता सूर्यफुल उत्पादकांना भोगावे लागत असून आंदोलनाचा भडका उडाला होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.