Soybean Market Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : शिल्लक सोयाबीनचं प्रमाण यंदा जास्त का?

Team Agrowon

Soybean Bajarbhav : शेतकरी अजूनही मागील हंगामातील सोयाबीनला अपेक्षित भाव मिळण्याची वाट पाहत आहेत. सोयाबीन पेरणी अगदी तोंडावर असतानाही गेल्या वर्षीपेक्षा शिल्लक सोयाबीनचं प्रमाण यंदा १३ टक्क्यांनी जास्त आहे. हा साठा शेतकरी, व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगाकडे असल्याचे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाने म्हटले आहे.

देशात सध्या सोयाबीनचा बाजार दबावात आहे. मागील हंगामात शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे यंदाही चांगला भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती.

अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले नाही. त्यातच सरकारने खाद्यतेल आयातीला पाडघड्या घातल्या. यामुळे सोयाबीन दरावर आणखी दबाव आला. सध्या सोयाबीन प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ७०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे.

सध्या बाजारातील आवकही जास्त आहे. आज देशातील बाजारात जवळपास २ लाख टनांची आयात झाली होती. यात मध्य प्रदेशातील आवक सर्वाधिक १ लाख क्विंटलच्या दरम्यान आहे. तर महाराष्ट्रात ८० हजार क्विंटलची आवक होत आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

बाजारातील सोयाबीन आकेचा दबाव असल्याचा परिणाम दरावर दिसत आहे. पण अनेक शेतकरी माल मागे ठेवत आहेत. अपेक्षित भावपातळी नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सध्या देशात किती सोयाबीन शिल्लक आहे, हे पाहावे लागेल.

सोपाच्या मते देशात यंदा १२४ लाख टन सोयाबीन उत्पादन झाले. तर मागील हंगामातील २५ लाख टन शिल्लक माल होता. होणारी आयात धरून यंदा देशात १५४ लाख टनांचा पुरवठा झाला. तर गेल्या हंगामातील पुरवठा १२६ लाख होता. म्हणजेच यंदा गेल्यावर्षीपेक्षा २८ लाख टनांनी पुरवठा जास्त राहीला.

पण बाजारातील आवक यंदा २० लाख टनांनी अधिक राहून ९१ लाख टनांवर पोचली. सोपाच्या मते अजूनही जवळपास ५९ लाख टन सोयाबीन शिल्लक आहे. पण हा साठा केवळ शेतकऱ्यांकडे नाही. तर व्यापारी, स्टाॅकीस्ट आणि प्रक्रिया प्लांट्सकडेही साठा आहे.

गेल्या वर्षीपेक्षा शेतकऱ्यांनी यंदा जास्त माल मागं ठेवला, असे परभणी जिल्ह्यातील रावराजूर येथील शेतकरी हेमचंद्र शिंदे यांनी सांगितले.

सोयाबीनचा नवा हंगाम सुरु व्हायला अजून ५ महिन्यांचा कालावधी आहे. तर बाजारभाव खाद्यतेलाच्या दबावामुळे काहीसे स्थिर राहू शकतात, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केला. त्यामुळे पुढील हंगामासाठी यंदाही मोठ्या प्रमाणात शिल्लक साठा राहू शकतो, असा अंदाज आहे.

देशात १ जूनपर्यंत यंदा ५९ लाख टन सोयाबीन शिल्लक होते. गेल्या हंगामात याच काळात ५३ लाख टनांचा स्टाॅक होता. म्हणजेच यंदा गेल्या वर्षीपेक्षा ६ लाख टनांनी अधिक आहे. याचाच अर्थ असा की शिल्लक सोयाबीन १३ टक्क्यांनी अधिक आहे. मात्र यंदा सोयाबीन पुरवठा जवळपास २३ टक्क्यांनी अधिक होता.

म्हणजेच यंदा शेतकऱ्यांनी १ जूनपर्यंत सोयाबीनची विक्री जास्त केली. खरिपासाठी शेतकरी सोयाबीन विकत असल्याचे जालना जिल्ह्यातील उमरी येथील शेतकरी बळीराम गाडेकर यांनी सांगितले.

देशात यंदा खाद्यतेल आयातीचा लोंढाच आला. यामुळे सोयाबीन दरावर दबाव आला. ब्राझीलमध्ये विक्रमी उत्पादन झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव घसरले. याचाही परिणाम देशातील बाजारावर झाला. सध्या खरिप पेरणीचा कालावधी आहे.

पण पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. तसेच महत्वाच्या सोयाबीन उत्पादक मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात यंदा पाऊसमान कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील महिनाभरात या दोन्ही राज्यांमध्ये पाऊस कसा होतो आणि पेरणी कशी होते याचा बाजारावर परिणाम दिसू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

मागील दोन हंगामात सोयाबीनला जास्त भाव मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या भावाची अपेक्षा आहे. अनेक शेतकऱ्यांनी माल मागे ठेवला. काही शेतकऱ्यांकडे तर दोन हंगामातील माल आहे. सध्या १० ते १५ टक्के माल शिल्लक असू शकतो.
हेमचंद्र शिंदे, तज्ज्ञ शेतकरी, रावराजूर, जि. परभणी
यंदाही सोयाबीनला चांगला भाव मिळेल आशा होती. पण भाव अपेक्षित पातळीवर पोचलेच नाहीत. खरिपाचा हंगाम आला की शेतकरी थांबू शकत नाहीत. शेतकऱ्यांच्या अडचणी असतात. त्यामुळे नाइलाजाने कमी भावात माल विकत आहेत.
बळीराम गाडेकर, शेतकरी, उमरी, जि. जालना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT