Soybean Market
Soybean Market  Agrowon
ॲग्रोमनी

Soybean Market : सोयाबीनचे दर वाढणार; शेतकऱ्यांना फायदा होणार का?

Anil Jadhao 

पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर (Soyameal rate) तेजीत आहेत. देशातून सोयापेंड निर्यातही वाढली. आपल्या सोयापेंडला दरही चांगला मिळतो आहे. पण याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोचताना दिसत नाही. सोयाबीनचा हंगाम सुरु होऊन ४ महिने झाले.

शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत सोयाबीन ठेवलं. पण मागील महिनाभरापासून सोयाबीन दरात तेजी आली नाही. त्यामुळं अनेक शेतकरी अस्वस्थ होऊन सोयाबीन विकत आहेत. पण सोयाबीनचा हंगाम सुरु होऊन आता कुठं ४ महिने झाले आणखी ८ महिने बाकी आहेत.

सोयापेंडची निर्यात वेगाने सुरु असल्याने सोयाबीनच्या दरातही वाढ होईल, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडला चांगला दर मिळत आहे. देशातून निर्यातही वाढली. म्हणजेच सोयापेंडसाठी प्रक्रियादार आणि निर्यातदारांना चांगला भाव मिळत आहे. पण याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. सोयाबीनचे दर ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

सध्या शेतकऱ्यांकडेही मोठ्या प्रमाणात सोयाबीन आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन रोखलं. मात्र शेतकरी काही थेट निर्यात करणार नाहीत किंवा प्रक्रिया करणार नाहीत, तसंच अनेक शेतकरी जास्त दिवस विक्रीसाठी थांबूही शकत नाहीत, हे उद्योगानांही माहीत आहे.

त्यामुळं सध्याच्या दरात जास्तीत जास्त सोयाबीन खरेदीचा उद्योगांचा प्रयत्न असेल, असं काही सोयाबीन खरेदीदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.

सोयापेंड निर्यात वेगाने

सोयाबीन दर मुख्यतः सोयापेंडच्या दरावर अवलंबून असतात. सोयाबीनमध्ये १८ ते २० टक्क्यांपर्यंत तेल तर ८० ते ८२ टक्क्यांपर्यंत पेंड मिळते. देशात यंदा सोयापेंड उत्पादन जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळं निर्यात वाढणं गरजेचं आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंड तेजीत आहे. विशेष म्हणजे सध्या भारताची सोयापेंड आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षा स्वस्त आहे. सध्याच्या परिस्थितीत निर्यात वेगानं सुरु आहे. यंदाच्या हंगामात ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये ४ लाख टन सोयापेंड निर्यात झाली.

तर मागीलवर्षी याच काळातील निर्यात २ लाख ७५ हजार टन होती. तसंच जानेवारीतही निर्यात वाढल्याचं सांगितलं जातं. पण जानेवारीचे आकडे अजून आले नाहीत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातही निर्यातीचे सौदे वाढले.

मार्च महिन्यात तर विक्रमी ४ ते ६ लाख टनांच्या दरम्यान सोयापेंड निर्यात होण्याची शक्यता आहे. सोयापेंडसाठी एवढी संधी असतानाही शेतकऱ्यांना याचा सध्या फायदा होताना दिसत नाही.

शेतकऱ्यांना अस्वस्थ करण्याचा प्रयत्न

बाजारात काही बातम्याही पेरण्यात आल्या. सोयाबीन मागील महिनाभरापासून दबावात आहे, त्यामुळं पुढील काळातही दर वाढणार नाहीत, अशा अफवा सध्या बाजारात आहेत. पण उद्योगांना सोयापेंड निर्यात करायची किंवा देशातील बाजारात विकायची म्हटलं तरी सोयाबीन लागेलचं. त्यामुळं बाजारात कमी सोयाबीन असलं की दरवाढ होईलच, असंही या खरेदीदारांनी सांगितलं.

सोयाबीनचे भाव दबावात असण्याला सरकारची काही धोरणंही जबाबदार आहेत. त्यापैकी महत्वाचं म्हणजे स्वस्त खाद्यतेल आयातीला प्रोत्साहन आणि वायदेबंदी. सरकारनं खाद्यतेलावरील आयातशुल्क कमी केले. त्यामुळं देशात मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आयात होत आहे. आयातशुल्क नसल्यानं आयात होणारं तेल स्वस्त पडतय. तसंच आयात मोठ्या प्रमाणात होत आहे.

खाद्यतेल आयातशुल्क वाढवणे गरजेचे

जाणकारांच्या मते, देशात एरव्ही खाद्यतेलाचा स्टाॅक १२ ते १५ लाख टनांच्या दरम्यान राहायचा. पण सध्या ३० ते ३५ लाख टन खाद्यतेल उपलब्ध आहे. तसंच आयात सुरुच आहे. जानेवारीतच जवळपास ४ लाख टन सोयातेल आयात झाली.

४ लाख टन सोयातेलासाठी २० लाख टन सोयाबीनचं गाळप करावं लागलं असतं. हे तेल आयात झालं नसतं तर आपल्या सोयाबीनपासून तयार होणाऱ्या तेलाला उठाव मिळाला असता. त्यामुळं सरकरानं खाद्यतेल आयातीवरील शुल्कात तातडीनं वाढ करणं गरजेचं आहे.

वायदे सुरु करावेत

सरकारनं सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या वायद्यांवर मागील वर्षापासून बंदी घातली. तसंच पुढील एक वर्ष वायद्यांवरील बंद कायम ठेवली. तसं शेतकऱ्यांना सोयाबीनच्या वायद्यांचा थेट फायदा नाही. पण वायद्यांमुळे पुढील काही महिन्यांतील किंमत कळते.

सर्वात महत्वाचं म्हणजे प्रक्रियादार, उद्योग, व्यापारी, निर्यातदार यांना जोखिम व्यवस्थापन करता येते. सध्या फक्त प्रत्यक्ष खरेदी सुरु आहे. वायद्यांमुळे आपलं सोयातेल किंवा सोयापेंड भविष्यातील तारखेला डिलिवरीसाठी विकता येईल.

तसंच वायद्यांमधून भविष्यातील दरही ठरतील. पण सध्या हा कोणताच पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळं सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडचे वायदे तातडीने सुरु करणं आता अत्यंत आवश्यक बनलं.

दरवाढ गरजेची

उद्योग आणि सरकाच्या या खेळात शेतकऱ्यांच्या अपेक्षांची मात्र राखरांगोळी होतेय. सरकार खाद्यतेल आयातशुल्क वाढ आणि वायदेबाजार सुरु करत नाही, तोपर्यंत सोयाबीन प्रक्रियादार, निर्यातदार स्वतःवर जोखिम घेणार नाहीत. यात तोटा होतोय शेतकऱ्यांचा.

सध्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील भावपातळी, सोयापेंड निर्यात आणि शेतकऱ्यांनी ठेवलेला साठा, पाहता याही परिस्थितीत सोयाबीन दरवाढ गरजेची होती. पण झाली नाही.

शक्य असल्यास थांबावं

जाणकारांच्या मते, देशातून सोयापेंड निर्यातीसाठी सौदे होत आहेत. हे सौदे पूर्ण करण्यासाठी प्रक्रियादारांना सोयाबीन खरेदी करावीच लागेल. शेतकऱ्यांनी सोयाबीनची मर्यादीत विक्री केल्यास दर वाढू शकतात. त्यामुळं शेतकऱ्यांनी किमान ५ हजार ५०० रुपयांचे टार्गेट ठेवण्यास हरकत नाही.

जे शेतकरी थांबू शकतात, त्यांनी आणखी थोडे दिवस थांबव. आता सोयाबीन हाती येऊन चार महिने झाले. हंगाम आणखी ८ महिने असेल. त्यामुळं पुढील काळातील तेजी मंदीचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी शक्य असल्यास थांबावं, असं आवाहनही सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT