Sunflower agrowon
ॲग्रोमनी

TOP 5 NEWS-युक्रेनमध्ये सूर्यफुलाचा पेरा वाढला

Team Agrowon

1. सूर्य आग ओकत असल्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र अक्षरश: होरपळून निघाला. उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उष्ण लाट आली आहे. चंद्रपूर येथे शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्याचे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४५.८ अंश सेल्सिअस तापमाने नोंदले गेले. तर जळगाव, अकोला, ब्रह्मपुरी, वर्धा येथे ४५ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत उष्ण लाट आली. तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाल्याने नगर येथेही उष्ण लाट होती. उद्या विदर्भात तीव्र उष्णतेच्या तर जळगावमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. उर्वरित राज्यात उन्हाची ताप वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.

2. इंडोनेशियाने पामतेल(Palm oil) निर्यातीवर बंदी घातल्यानंतर जागतिक खाद्यतेल बाजाराला फोडणी मिळाली. पामतेलासह मोहरीतेल, सोयाबीन, सरकी तसेच सूर्यफुल तेलाच्या दरात मोठी वाढ झाली. तर शेंगदाणा तेलाच्या दरात विशेष वाढ झाली नाही. याचा केवळ भारतच नाही तर इतर देशांवरही परिणाम झाला. शेजारच्या बांगलादेशातही खाद्यतेलाच्या दरात लिटरमागे जवळपास १५ टकाची वाढ झाली. टका हे बांगलादेशचे चलन आहे. भारतातही खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली. याचा थेट फटका ग्राहकांना बसत आहे.

3. सरकारने हरभऱ्याची आत्तापर्यंत ८ लाख ७६ हजार टन हमीभावाने खेरदी केली. हमीभावाने हरभरा खरेदीत अद्यापही गुजरात पुढे आहे. गुजरातमध्ये आत्तापर्यंत ३ लाख ९८ हजार टन हरभरा खरेदी झाली. तर महाराष्ट्रात ३ लाख ६७ हजार टन हरभरा(Gram) शेतकऱ्यांनी नाफेडने विकला. कर्नाटकात ६७ हजार टनांपर्यंत खरेदी झाली. तर आंध्र प्रदेशात केवळ ४२ हजार टन हरभरा नाफेडच्या खरेदी केंद्रावर आला. उत्तप्रदेशात १ हजार ११३ टन तर तमिळनाडूनत २२ हजार टनांची खरेदी झाली.


4. मागील वर्षभरापासून आंतरराष्ट्रीय बाजारात खतांचे दर(Fertilizer rates) वाढले. चीनसह महत्वाच्या खत उत्पादक देशांनी निर्यातीवर निर्बंध लादले आहेत. तसेच सध्या युक्रेन आणि रशिया युद्धामुळे मोठी समस्या निर्माण झाली. त्यातच भारत खतासाठी आयातीवर अवलंबून आहे. त्यामुळे ही परिस्थिती भारतासाठी चिंताजनक आहे. या युद्धामुळे भारताला खतांची टंचाई भासू शकते, असे निती आयोगाने म्हटले आहे. भारत पोटॅश खतासाठी रशियावर अवलंबून आहे. तर नैसर्गिक वायूसाठी अनेक देश रशियावर भीस्त ठेऊन असतात. त्यामुळे खतांचा तिढा निर्माण झाला.

5. युक्रेनमध्ये वसंत ऋतुतील पेरणीला वेगात सुरु आहे. आत्तापर्यंत ३६ लाख हेक्टरवर पेरा झाला. परंतु उद्दीष्टाच्या केवळ २५ टक्के लागवड झाली. मागील आठवडाभरात येथील पेरणीला गती मिळाली. २१ ते २५ एप्रिल या पाच दिवसांत ५ लाख ७० हजार हेक्टरवर पेरा झाल्याचे युक्रेनच्या कृषी विभागाने सांगितले. युक्रेनचे कृषी धोरण आणि अन्नमंत्री मायकोला सोल्स्की यांनी शेतकऱ्यांना पेरणीत येणाऱ्या समस्या मांडल्या. युद्धजन्य भागात पेरणी ठप्प आहे. सरकारपासून शेतकरी आणि गावकऱ्यांपर्यंत सर्वजण पेरणीच्या कामात व्यस्त आहे. सरकारने पेरणीच्या कामात गुंतलेल्या लोकांना पास दिल्या आहेत. त्यामुळे त्यांचे काम सोपे होत आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना पेरणीसाठी इंधनाची टंचाई(Fuel scarcity) भासत आहे. रशियाच्या ताब्यात असलेल्या भागांत इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली. लाॅजिस्टीकची समस्या कायम असल्याने दरात मोठी वाढ झाली. रशियाचे (Russia)सैन्य अद्याप युक्रेनच्या मध्यापर्यंत पोचले नाही. त्यामुळे पेरणीची कामे सुरु आहेत. त्यामुळे आम्ही एकूण क्षेत्राच्या ७५ टक्के पेरणी करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे, असेही मंत्री सोल्स्की यांनी सांगितले. आत्तापर्यंत युक्रेनमधील ९ प्रांतात पेरणी उरकली. तर इतर भागांत पेरणी वेगाने सुरु आहे. गव्हाची १ लाख ७० हजार हेक्टरवर पेरणी झाली. हे क्षेत्र एकूण उद्दीष्टाच्या ८८ टक्के आहे. बार्लीची लागवड ८ लाख १९ हजार हेक्टरवर पोचली. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही लागवड ३९ टक्के कमी आहे. तर सूर्यफुलाचा पेरा ३ टक्क्यांनी वाढून ११ लाख हेक्टरवर पोचल, असे युक्रेनच्या कृषी विभागाने सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT