बचत गटाने दिली शेती, पूरक व्यवसायाला साथ
बचत गटाने दिली शेती, पूरक व्यवसायाला साथ 
महिला

बचत गटाने दिली शेती, पूरक व्यवसायाला साथ

Suryakant Netke

चिंचोली काळदात (ता. कर्जत, जि. नगर) गावातील दहा महिलांनी एकत्र येत २००४ मध्ये पहिला बचत गट स्थापन केला. त्यानंतर गावात टप्प्याटप्प्याने तेरा महिला बचत गट सुरू झाले. या बचत गटांच्या माध्यमातून गावातील महिलांनी दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्‍कुटपालनासह अन्य व्यवसायांतून आर्थिक प्रगती साधत शेतीला नवी दिशा दिली आहे. चिंचोली काळदात गावशिवारात सिंचनाचा अभाव. त्यामुळे कायमस्वरूपी रोजगाराची समस्या गावकऱ्यांच्या समोर होती. मात्र चौदा वर्षापूर्वी गावातील दहा महिलांनी एकत्र येत अाशा सत्यवान वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली संत रोहिदास महिला बचत गट सुरू केला. प्रत्येकीने शंभर रुपयांची मासिक बचत करून वर्षभर अंतर्गत व्यवहार केले. सहा महिन्याने गटाला सहकारी बॅंकेने एक लाखाचे कर्ज दिले. त्यातून महिलांनी शेळीपालन, कुक्कुटपालनात वाढ केल्यामुळे गावातील अन्य महिलांना विश्‍वास आला आणि महिलांचे संघटन वाढले. त्यानंतर गावांत टप्प्याटप्प्याने यशोदा, पद्मावती, राणी लक्ष्मी, सावित्रीबाई फुले, मोहटादेवी, क्रांती ज्योती, जगदंबा, राजमाता, काळूबाई, श्रीलक्ष्मी, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि तुळजा भवानी असे महिला बचत गट तयार झाले. गावामध्ये सुखदेव काळदाते यांच्या अध्यक्षतेखाली रानजाई शेळापालन समूह गट सुरू झाला. महिलांच्या एकीतून गावच्या सरपंचपदी वंदना धनराज उबाळे यांना संधी मिळाली आहे. गावातील बचत गटांना महिला आर्थिक विकास महामंडळाने पाठबळ दिले. गाव समिती, शेळीपालन समूह, लोकसंचलीत साधन केंद्र यांच्या माध्यमातून तेरा गटांतील १६० महिलांनी १० लाख ३२ हजार रुपयांची बचत केली. या गटांना ५८ लाख ७८ हजार रुपयांचे कर्ज मिळाले. कर्जाच्या आधारावर शेती सुधारणा, पूरक व्यवसायाला चालना मिळाली.

  गावात सुरू झाले दूध संकलन केंद्र

 बचत गटातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीने महिलांनी गाई, म्हशींच्या संगोपनावर भर दिला. मात्र दूध विक्रीसाठी अडचणी येऊ लागल्या. हे लक्षात घेऊन यशोदा बचत गटाने गावात दूध संकलन केंद्र सुरू केले. सीमा बाळासाहेब मोरे या केंद्राची जबाबदारी पाहतात. पहिल्या दिवशी सतरा लिटर दूध संकलन झाले होते. आता दररोज  २७५ लिटर दूध संकलन होते. दूध वाहतुकीला वाहन नसल्याने पद्मावती गटातील पशुपालन करणाऱ्या संध्या सुखदेव काळदाते यांनी गटाच्या आर्थिक मदतीवर वाहतुकीसाठी वाहन खरेदी केले. त्याचा दूध वाहतुकीस फायदा होतो. 

  फळबाग, पूरकव्यवसाय उभारणी 

अनुसया किसन वाघमारे यांनी बचत गटातून कर्ज घेऊन डाळिंब, बोराची फळबाग केली. सेंद्रिय शेतीला त्यांनी प्राधान्य दिले आहे. संगीता बिभीषण परहर यांनी गाईपालन, कुक्कुटपालनास सुरवात केली. राणी लक्ष्मीबाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा अलका उबाळे यांनी मत्स्यपालनास सुरवात केली आहे. सीमा बाळासाहेब मोरे यांनी पन्नास हजाराचे कर्ज घेऊन विहिरीचे काम केले, तसेच तीन संकरीत गाई खरेदी केल्या. ताई गोवर्धन जाधव यांनी विहीर खोदून शेतीमध्ये शाश्‍वत पाण्याची सोय केली आहे.    अठ्ठावीस गावांत २८५ महिला बचत गट

चिंचोली काळदात येथील महिला बचत गट हे महिला आर्थिक विकास महामंडळाशी जोडलेले आहेत. महामंडळाच्या अहिल्याबाई लोकसंचलीत साधन केंद्राच्या समन्वयाने महिला बचत गटाचे काम चालते. सध्या साधन केंद्राच्या माध्यमातून २८ गावांत २८५ महिला बचत गट कार्यरत असून ३ हजार ७१९ महिला एकत्र आल्या असल्याचे साधन केंद्राच्या अध्यक्षा आशा घोडके आणि व्यवस्थापक श्रीकांत चव्हाण यांनी सांगितले.

  गटातून झाली प्रगती 

  •  सावकारी बंद झाली, बचत गटातून पैसा मिळाला. 
  •  शेती, पूरक उद्योगात सुधारणा. आर्थिक मिळकत वाढली. 
  •  स्थलांतर थांबले. विविध योजनांचा योग्य लाभार्थीची निवड.
  •  पाणी, रस्ता, स्मशानभूमीची कामे मार्गी लागली. गावात पंचवीस बांधकाम कामगारांची नोंदणी.  
  • शेळीपालनातून नफा  महिला आर्थिक विकास महामंडळाने बचत गटातील महिलांना अाधुनिक शेळीपालनाचे दोन दिवसाचे प्रशिक्षण दिले. उस्मानाबादी शेळ्यांची संख्या वाढावी यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत अहिल्याबाई  लोकसंचलीत साधन केंद्राने आठ महिलांना प्रत्येकी सहा हजार रुपये गुंतवून सोळा शेळ्या दिल्या. उत्पन्नातील अर्धा हिस्सा महिलांचा आणि अर्धा हिस्सा अहिल्याबाई लोकसंचलीत साधन केंद्राचा आहे. यासाठी दोन वर्षाचा करार झाला. या सोळा शेळांपासून आजपर्यंत २५ पाटी आणि १६ बोकड जन्मले. गटाने बाजारपेठेत बोकडांची प्रति किलो २२० रुपये दराने विक्री केली. शेळीपालनातून महिला गटाला २६ हजारांचा नफा मिळाला. अजून काही करडांची विक्री बाकी आहे. चिंचोलीत जास्तीत महिला शेळीपालन करतात. त्यामुळे येथील महिलांना शेळ्यांचे आरोग्य व्यवस्थापन, लसीकरणाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्याचा शेळ्यांच्या वाढीवर चांगला परिणाम झाला. शेळ्यांच्या लसीकरणाची जबाबदारी सीमा बाळासाहेब मोरे सांभाळतात. त्यांची पशुसखी म्हणून निवड झाली आहे.  

    आता हिमतीने बोलतो... चिंचोली काळदात गावात महिला बचत गटामुळे चांगले बदल दिसू लागले आहेत. ताई गोवर्धन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले ग्रामविकास संस्था या गावसमितीच्या माध्यमातून गटात सहभागी झालेल्या महिला समाजिक उपक्रमात सहभागी होतात. गावात मुलींच्या जन्माचे स्वागत होते. सरकारी योजनेचा लाभार्थीही गावसमितीतून निवडला जातो. ग्रामसभेची हजेरी वाढली आहे. बचत गटामुळे महिला त्यांच्या समस्या ग्रामपंचायत, सरकारी अधिकाऱ्यांसमोर मांडतात. आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीच्या समन्वयक मीरा मिश्रा, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्राजक्ता लवांगरे यांच्यासह विविध जिल्ह्यातील बचत गटांनी चिंचोली काळदात गावातील महिला बचत गटाच्या उपक्रमांना भेटी दिल्या आहेत, अशी माहिती सहयोगिनी लता उदमले यांनी दिली.

    पूरक उद्योगातून विकास

    महिला आर्थिक विकास महामंडळामुळे गावातील महिलांची प्रगती झाली. चिंचोली काळदात गावातील बचत गटांपासून प्रेरणा घेत विविध जिल्ह्यांतील महिला गटांनी पूरक उद्योगांना सुरवात केली आहे. - संजय गायकवाड (जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, नगर)  ः ९४०४९८३१९९  

    ग्रामविकासाला चालना

    महिला बचत गटामुळे आर्थिक व्यवहार कळला. ग्रामसभांतही महिला मत मांडू लागल्या आहेत. स्वतःबरोबरच गावाच्या विकासालाही चालना मिळू लागली.` - संध्या सुखदेव काळदाते,  : ९९८७३५३६१४ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

    Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

    Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

    Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

    Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

    SCROLL FOR NEXT