ग्रामपंचायत कार्यालयात चर्चेसाठी एकत्र आलेल्या महिला बचत गटातील सदस्या.
ग्रामपंचायत कार्यालयात चर्चेसाठी एकत्र आलेल्या महिला बचत गटातील सदस्या.  
महिला

बचत गटांतून मिळाली विकासाला उभारी

Suryakant Netke

अस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर. मात्र या गावातील महिलांना बचत गटांनी खऱ्या अर्थाने रोजगार उभा करून दिला. साधारण वीस वर्षांपूर्वी गावामध्ये महिला बचत गट चळवळ उभी राहिली. गटांच्या माध्यमातून बचत सुरू झाली. पंचवीस बचत गटांतून गावातील महिलांनी आर्थिक प्रगती साधली आहे.

अस्तगाव हे नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्‍यामधील सुमारे तेरा हजार लोकवस्तीचे गाव. गावाला जोडून सात वाड्या-वस्त्या. हा भाग तसा सधन; मात्र या गावांत वैयक्तिक कौटुंबिक विकासाला पाठबळ आणि दिशा मिळाली ती महिला बचत गटांमुळे. महिलांनी गटाच्या माध्यमातून बचत करत वेगवेगळे व्यवसाय सुरू केले. नियमितपणे बचत करणाऱ्या गटांना बॅंकांनी कर्ज दिले. आतापर्यंत २५ महिला बचत गटांना ८० लाखांपेक्षा अधिक रकमेचे कर्ज बॅंकांनी दिले असून, सुमारे पावणेचारशे महिला दर महिन्याला सुमारे पन्नास हजारांची बचत करीत आहेत. अस्तगावामध्ये सध्या ओमशांती, साई, श्रद्धा सबुरी, आहिल्यादेवी होळकर, संत सावता, प्रतिभा, ओमसाईराज, स्वराज, वीरभद्र, जगदंबा, ओमसाई, महेश, क्रांती, प्रतीक्षा, रानपाखरे, सहेली, लक्ष्मीनारायण, संतोषीमाता, जयभवानी, श्रीगणेश, महालक्ष्मी, पद्मावती, मोरया हे गट कार्यरत आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी गणपती तयार करणे (५ महिला), शेळीपालन (५० महिला), गाईपालन (३० महिला), ब्यूटिपार्लर (३ महिला), आइस्क्रीम पार्लर (१ महिला), दुग्धव्यवसाय (५० महिला), कपडे व्यवसाय (१ महिला), बोंबील विक्री (१५  महिला), कृषी व्यवयाय (१ महिला), हॉटेल (१ महिला), रोपवाटिका (२ महिला), भाजीपाला विक्री (३ महिला), शिवणकाम (१५ महिला) असे व्यवसाय सुरू केले आहेत.

   ओमशांती गटातून झाली सुरवात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडून समाजसेवेची प्रेरणा घेऊन अस्तगावात १९९८ मध्ये दमयंती शेजुळ यांनी ओमशांती हा पहिला महिला बचत गट तयार केला. सुरवातीला दहा रुपये प्रतिमहिना अशी प्रत्येक महिलेने बचतीला सुरवात केली. आता दर महिन्याला सुमारे पावणेचारशे महिला प्रत्येकी शंभर रुपयांची बचत करतात. गटामुळे महिलांत एकोपा निर्माण झाला. सार्वजनिक कामांत महिला आता अग्रेसर आहेत. मुलांचे शिक्षण, लग्नासाठी बचत गटांचा आधार मिळाला आहे.  

आत्मविश्‍वासाने सावरले संसार धुळे जिल्ह्यामधील रहिवासी असलेल्या जरीना खाटीक या अठरा वर्षांपासून अस्तगावमध्ये राहतात. रोजगाराच्या शोधात आलेल्या जरीना यांना रहायला घर नव्हते. २००३ मध्ये साई महिला बचत गटाने तीन हजारांचे कर्ज दिले. त्यानंतर त्यांनी शेळीपालन व्यवसाय सुरू केला. त्या व्यवसायाच्या जोरावरच त्यांनी जागा घेऊन घराचे बांधकाम केले. मुलांना व्यवसाय सुरू करून दिला. चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी जरीना यांनी मुलाला महिला बचत गटाच्या सहकार्याने पन्नास हजार रुपये उपलब्ध करून दिले. ओमशांती महिला बचत गटातील मुन्नीमज्जीत पठाण यांच्या पूरक व्यवसायाला बळकटी मिळाली. गटाच्या जोरावरच घर बांधले. मनीषा मल्हारी जेजुरकर यांनी दीड एकरावर डाळिंब लागवड तसेच रोपवाटिका सुरू केली. सुनीता लोंढे यांनी रोपवाटिका सुरू केली. बेबीताई जेजुरकर यांनी दोन वर्षांपूर्वी वीस हजारांचे कर्ज घेऊन अस्तगाव फाट्यावर हॉटेल सुरू केले. मुलांना व्यवसायासाठी चारचाकी वाहन घेऊन दिले. काही महिलांनी फुलशेती सुरू केली आहे. येथील फुले दररोज शिर्डी बाजारपेठेत जातात.

सामाजिक कामात सहभाग अस्तगावच्या सरपंचपदी सुवर्णा नंदकुमार जेजुरकर आहेत. बचत गटाच्या बैठका व अन्य उपक्रमांच्या माध्यमातून महिला एकत्र येतात. बहुतांश समाजिक कामांत महिलांचा सहभाग असतो. गटामुळे महिलांना रोजगार मिळाला, बोलण्याची हिंमत आली. महिला आर्थिक विकास महामंडळाने महिलांना प्रशिक्षण दिले. गटातील काही महिला ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत. मुलींच्या जन्माचे स्वागत, वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम, हळदी कुंकू समारंभासह गावातील समाजिक कामांत महिलांचा चांगला सहभाग आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून ७०० महिलांनी जनधन योजनेतून बॅंक खाती उघडली. महिलांना आर्थिक देवाण- घेवाणीचे प्रशिक्षण मिळाल्याची माहिती उमा अष्टेकर, पुष्पा जेजुरकर यांनी दिली. प्लॅस्टिक बंदीमुळे कापडी आणि कागदी पिशव्यांना मागणी वाढली. हे लक्षात घेऊन बचत गटातील महिलांना पुढील महिन्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी चौदाव्या वित्त आयोगातून निधी खर्च करण्याचे नियोजन केले आहे.

  व्याजाच्या पैशांतून आधार बचत गटातील महिलांनी गावामध्ये रामरहिम महिला ग्राम समिती स्थापन केली. याच्या अध्यक्षा योगिता सापते आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्त्रीशक्ती लोकसंचलित सेवा केंद्राअंतर्गत सहा लाखांचे रामरहिम ग्राम समितीला कर्ज दिले अाहे. ग्राम समितीने प्रत्येकी पन्नास हजार रुपयांप्रमाणे बारा गटांना वाटप केले. ही रक्कम गटाने दोन महिलांना कर्जस्वरूपात दिली. स्त्रीशक्ती लोकसंचलित सेवा केंद्राला तीन वर्षांनंतर ही रक्कम परत करायची असली, तरी महिलांना दिलेल्या रकमेचे व्याज ग्राम समितीकडे जमा होईल. या व्याजाच्या रकमेतून सामाजिक कामासह, गरजू महिलेला आर्थिक आधार देण्यात येणार आहे. प्रत्येक गट त्यासाठी पाचशे रुपयांची बचत करतो.

बचत गटाचे फायदे

  • महिला एकत्रीकरण
  • रोजगाराची संधी, आर्थिक विकास
  • व्यवहारज्ञान मिळाले, कामांचा आत्मविश्‍वास वाढला
  • महिलांमध्ये एकोपा तयार झाला, ग्रामविकासाला चालना
  • पूरक व्यवसायाला गती बचत गटामुळे गावातील महिला एकत्र आल्या. आर्थिक आधार मिळाल्यावर पूरक व्यवसायामध्ये स्वतःची वेगळी ओळख तयार केली. अनेक महिला नियमित पैशांची परतफेड करतात.   -  दमयंती शेजुळ, ७७९८१८०६०९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

    Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

    Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

    Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

    Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

    SCROLL FOR NEXT