नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक 
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक  
कृषी सल्ला

नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक 

प्र. र. चिपळूणकर

गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या पुस्तकांच्या आधारे भू सूक्ष्मजीवशास्त्राची ओळख करून घेत आहे. मागील भागामध्ये आपण सूक्ष्मजीवांसाठी परिस्थितिकी, कर्बचक्र आणि हायड्रोकार्बन हा भाग पाहिला. या वेळी नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणाऱ्या घटकांची माहिती घेऊ.  युरियाचे अमोनियम कार्बामेट झाल्यानंतर पुढे स्थिरीकरणाकडे अगर उपलब्धीकरणाकडे वाटचाल होते. वाढणाऱ्या वनस्पतीची मागणी असल्यास अमोनियमचा प्राणवायूशी संयोग होऊन पहिल्या पायरीत नायट्राईट व त्यानंतर नायट्रेट तयार होते. याला मराठीत नत्रीकरण म्हणता येईल. बहुतेक वनस्पती (भात हा अपवाद) या नत्राचे सेवन नायट्रेट स्वरूपात करतात. यामुळे शेतकऱ्यांच्या अभ्यासासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरते. या संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे पाहू. 

  • चिबडी अगर आम्लयुक्त जमिनीत नत्रीकरणाची प्रक्रिया मंदावते. 
  • या प्रक्रियेसाठी प्राणवायूची गरज असल्याने नत्रीकरणासाठी जमिनीत हवेचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. 
  • ५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी व ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात ही क्रिया मंदावते. ३० ते ३५ अंश सेल्सिअस हे सर्वांत उत्तम तापमान. 
  • अतिरिक्त नत्र पुरवठा झाल्यास उपलब्ध नत्राचे प्रमाण वाढते. हा नत्र पाण्यात विरघळला जाऊन निचऱ्यावाटे जमिनीबाहेर वाहून जातो. परिणामी, नजीकच्या पाणी साठ्यात नायट्रेट नत्राचे प्रमाण वाढते. असे पाणी पिण्यास अयोग्य बनते. अशा पाण्यात शेवाळ अगर जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढतात. आज बहुतेक नद्या व तलावात जलपर्णीची बेसुमार वाढ दिसून येण्यामागे नायट्रेट नत्राचे प्रदूषण हे मुख्य कारण आहे. 
  • अमोनियमचे नायट्रेटमध्ये रूपांतर वेगाने न होता सावकाश होण्यासाठी अनेक रसायनांचा वापर केला जातो. शास्त्रीय भाषेत याला डिनायट्रीफाईंग एजंट असे म्हणतात. उदा. आपल्याकडे १०-२० टक्के निंबोळी पेंड युरियात मिसळणेची शिफारस आहे. अगर अलीकडे निंबोळी तेल लावलेला युरिया बाजारात उपलब्ध झाला आहे. 
  • नत्रीकरणातून पिकाला नत्र उपलब्ध होतो. ही क्रिया होत असता नायट्रीक आम्लाची निर्मिती होते, त्यामुळे सामू कमी होतो. याचा परिणाम पिकाला पोटॅशिअम्, फॉस्फरस, मॅंगनेशिअम, लोह, मॅंगनीज व कॅल्शिअम उपलब्धता वाढविण्यावर होतो. ही एक नवीन माहिती आहे. 
  • नत्रीकरण ही जैविक क्रिया आहे.  अमोनियम ------ नायट्रोसोमोनस -------- नायट्राईट  नायट्राईट -------- नायट्रोबॅक्‍टर -------- नायट्रेट 

  • (नत्रीकरण अशा दोन पायऱ्यात दोन जिवाणूंच्या गटांकडून पार पाडले जाते. नायट्रेटचा नाश निचऱ्याद्वारे होऊ शकतो. तसा नायट्राईटचा नाश होत नाही. कार्यक्षम नत्र वापरासाठी निसर्गाने केलेली ही सोय.) 
  • अधूनमधून अमोनिया, अमोनियम सल्फेट, युरिया या तीन नत्रयुक्त खतातील नत्राचे नायट्रेटमध्ये जलद रूपांतर होऊ शकते. त्या मानाने सेंद्रिय खतातील नत्राचे होऊ शकत नाही. 
  • पीक उत्पादन वाढविण्यासाठी जगभर या रासायनिक खतांचा वापर वाढला. दिलेल्या खतातील फार थोडा भाग पिकांकडून शोषला जातो. नुकसानीत जमिनीत अल्कता वाढते. ज्या जमिनीत सेंद्रिय पदार्थ भरपूर आहेत, तिथे कमीत कमी नुकसान होते. (१९६१ साली प्रकाशित पुस्तकात लेखक ही माहिती लिहीत आहे. याचाच अर्थ त्याही आधी कधी तरी हे प्रयोग झालेले असावेत. अगदी आज २०१९ मध्ये यातील किती माहिती शेतकऱ्यापर्यंत पोचली? 
  • यानंतर आपण नत्रचक्रातील शेवटच्या सहजीवी व असहजीवी नत्र स्थिरीकरण या दोन प्रकरणे पाहू.  जैविक नत्र स्थिरीकरणाच्या वेगासाठी तीन प्रमुख बाबी - १. जिवाणूंची संख्या कमाल असली पाहिजे.  २. नवीन पेशी तयार होण्याचा वेग मोठा असला पाहिजे.  ३. स्थिरीकरण झालेला नत्र प्रामुख्याने हवेतून आलेला असला पाहिजे.  नवीन पेशी तयार होण्याच्या वेगासंबंधी लेखक लिहितो .  २ किलो नत्र प्रतिहेक्‍टर स्थिरीकरणासाठी प्रतिग्रॅम मातीमध्ये १० चा ७ वा घात ( म्हणजे दहावर सात शून्ये) इतके जिवाणू असणे गरजेचे असते. दररोज प्रतिग्रॅम मातीत ५० हजार जिवाणू तयार झाल्यास हेक्‍टरी २ किलो नत्र स्थिरीकरण होऊ शकते. (हे प्रमाण फक्त नत्रासाठीचे आहे. बाकी अन्नद्रव्यासाठीचा हिशोब वेगळा.)  ( हे सर्व जिवाणू जमिनीत वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची काय तयारी करावी, याविषयी येथे फारशी चर्चा नाही. मात्र, आपण या मालिकेत लेख क्र. १० मध्ये त्याची चर्चा केली आहे. मागील भागामध्ये जैविक नत्रस्थिरीकरणातील जिवाणूंचे वर्गीकरण दिले आहे.)  जिवाणूंच्या पोषणासाठी व ऊर्जेसाठी सेंद्रिय कर्बाची गरज असते. या विषयी लेखक लिहितो. 

  • ऊर्जेची उपलब्धता हा जैविक नत्र स्थिरीकरणावर मर्यादा आणणारा प्रमुख घटक आहे. यासाठी जमिनीला सहज कुजणारे पदार्थ, काड, पिकाचे शेषभाग (ज्यांचे कर्ब/नत्र गुणोत्तर मोठे आहे.) असे पदार्थ दिल्यास नत्र स्थिरीकरणाचा वेग वाढतो. 
  • १ ते ३० मिलिग्रॅम नत्र स्थिरीकरणासाठी अंदाजे १ ग्रॅम कार्बन वापरला जातो. जास्त उपलब्ध कर्ब जास्त असल्यास नत्र स्थिरीकरणही जास्त हे तत्त्व मी वाचले १९८०-८५ साली. मात्र, नेमकेपणाने समजण्यास मला २००५ साल उजाडले. इतरांपर्यंत हे ज्ञान कधी पोचेल? 
  • तापमान, आर्द्रता, सामू यांचा परिणाम स्थिरीकरणावर होतो. 
  • सहजीवी नत्र स्थिरीकरणावर अनेक बाबींचा प्रभाव असतो. त्या खालीलप्रमाणे - 

  • कडधान्य वनस्पतीचा प्रकार. 
  • जिवाणूंची कार्यक्षमता. 
  • जमिनीतून होणारी नत्राची उपलब्धता. 
  • उपलब्ध स्फुरद, पालाश. 
  • उपलब्ध दुय्यम व सूक्ष्म अन्नघटक. 
  • सामू. 
  • हवेतील काही घटक. 
  • जमिनीतून नत्र उपलब्ध झाल्यास हवेतून नत्र स्थिरीकरण मंदावते. मुळावरील गाठींचे प्रमाण कमी जास्त होते. मॉलिब्डेनम्‌ या घटकाचा स्थिरीकरणाशी अन्नोन्य संबंध आहे. एक संदर्भ सांगतो की वाटाणा पीक पानात तयार झालेल्या अन्नद्रव्यांपैकी ३२ टक्के मुळावरील गाठीतील जिवाणूंच्या कार्यभागासाठी, १६ टक्के वाढीसाठी, ३७ टक्के श्वसनासाठी, बाकी १५ टक्के झाडात वेगवेगळ्या भागात स्थिर होते. यामुळे धान्याच्या तुलनेत कडधान्याचे उत्पादन कमी असते. आज कृषी विद्यापीठे तथा खासगी उत्पादकाकडून विकत घेऊन जिवाणू खताची पाकिटे शेतकरी अपुऱ्या ज्ञानाने वापरत राहतात. नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व शेतकऱ्यांना कोण सांगणार?  ः प्र. र. चिपळूणकर, ८२७५४५००८८,

    (लेखक कोल्हापूर येथील प्रगतिशील शेतकरी आहेत.) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

    Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

    Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

    Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

    Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

    SCROLL FOR NEXT