procedure for mixing preparation 
कृषी सल्ला

फवारणीसाठी रसायनांचे मिश्रण करताना घ्यावयाची काळजी 

नियंत्रणासाठी फवारणीचे मिश्रण योग्य न झाल्यास त्याचा फायदा होण्याऐवजी तोटा होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी मिश्रण करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, याची माहिती घेऊ.

हरिष फरकाडे, डॉ. अमोल झापे

शेतकरी अनेक वेळा दोन कीटकनाशके, बुरशीनाशके किंवा तणनाशकांचे मिश्रण करतात. यामागे एकाच वेळी दोन प्रकारच्या किडी किंवा रोग किंवा तणे यांच्या नियंत्रणासाठी फवारणीची कार्यक्षमता वाढावी, असा उद्देश असतो. मात्र, हे मिश्रण योग्य न झाल्यास त्याचा फायदा होण्याऐवजी तोटा होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी मिश्रण करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, याची माहिती घेऊ. पिकांच्या वाढीच्या विविध टप्प्यामध्ये वेगवेगळ्या कीड, रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. त्यांच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड नियंत्रणाचा वापर करणे अत्यावश्यक आहे. आर्थिक नुकसान पातळीपेक्षा किडींची संख्या अधिक झाल्यानंतर फवारणीचे नियोजन केले पाहिजे. मात्र, अनेक वेळा बागेमध्ये कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव एकाच वेळी झालेला दिसून येतो. अशा वेळी अनेक शेतकरी कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांची एकत्रित फवारणी करतात.शेतकरी वेगवेगळ्या रसायनांचे एकत्रीकरण करून फवारणीचे कष्ट, वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतात. या व्यतिरिक्त किडींच्या विशिष्ट नाजूक अवस्थेत एकापेक्षा अधिक किडींच्या नियंत्रणासाठी शिफारशीप्रमाणे कीडनाशकांचे मिश्रणांची फवारणी केली जाते. तणांच्या नियंत्रणासाठीही अनेक वेळा दोन तणनाशकांचे मिश्रण केले जाते. कीटकनाशकांसोबत बुरशीनाशकाचे मिश्रण केले जाते. मात्र, कोणत्याही दोन रसायनांची एकत्रित फवारणी करण्यापूर्वी ते मिश्रण योग्य आहे का, याची खात्री करणे आवश्यक आहे.  अनेक वेळी कोणत्याही दोन रसायनांचे मिश्रण करणे हे शास्त्रीयदृष्ट्या विसंगत ठरते. ही विसंगतता पुढील तीन तत्त्वावर ठरते. अ) रासायनिक विसंगतता  दोन कीडनाशकांमधील रासायनिक घटकांची क्रिया होऊन भिन्न घटक तयार होतो. परिणामी कीडनाशकांची कार्यक्षमता कमी होते. दोन किंवा अधिक क्रियाशील घटकांचे विघटन होऊन अकार्यक्षम घटक तयार होतात. ब) जैविक विसंगतता (फायटो टॉक्सिसिटी)  दोन भिन्न रसायने किंवा कीडनाशकांच्या मिश्रणाची फवारणी केल्यानंतर काही वेळात किंवा दिवसांत त्यांचे झाडावर दुष्परिणाम दिसून येतात. उदा. पाने करपणे, चुरगळणे, वाळणे, झाडाची/पानांची अनैसर्गिक वाढ होणे/ विकृती येणे इ. क) भौतिक विसंगतता  दोन कीडनाशके मिसळल्यानंतर त्यांच्या भौतिक गुणधर्मांमध्ये बदल होतो. त्यांपैकी एक रसायन/कीडनाशक फवारणीसाठी धोकादायक किंवा अस्थिर असते. अशा मिश्रणामधील तरल व घन पदार्थ वेगळे होणे, स्फोटक क्रिया/धूर/ फेस निघणे, मिश्रणामध्ये गोळे तयार होणे इ. बाबी आढळून येतात. असे झाल्यास मिश्रण पिकावर फवारणे टाळावे. यासाठी कोणत्याही रसायनांचे मिश्रण तयार करण्यापूर्वी मिश्रणाची भौतिक विसंगतता तपासणी म्हणजेच जार चाचणी करावी. जार चाचणी कशी करावी? भौतिक विसंगतता तपासणीसाठी मिश्रणाची जार चाचणी करावी. यामध्ये टॅंक मिक्स करण्यासाठी कीडनाशकांची मात्रा (२०० लीटर/ एकर) ज्या प्रमाणात टाकीमध्ये मिसळणार आहोत, त्याच प्रमाणात पण कमी मात्रेमध्ये पाणी (१०० मि.ली.) एका काचेच्या किंवा पारदर्शक प्लॅस्टिकच्या अरुंद तोंडाच्या भांड्यामध्ये मिश्रण घ्यावे. निर्देशित क्रमाने कीडनाशकांचे मिश्रण तयार करावे. या भांड्याला घट्ट झाकण किंवा कॅप लावावी. मिश्रण जोराने ढवळावे. ते किमान दोन तास न हलवता तसेच ठेवावे किंवा रात्रभर ठेवले तरी चालेल. त्यानंतर मिश्रणाचे निरीक्षण करून वर सांगितल्याप्रमाणे मिश्रण सुसंगत की विसंगत आहे, हे ठरवावे. एकत्रित मिश्रण करताना घ्यावयाची काळजी 

  • किटकनाशकांसोबतचे माहितीपत्रक वाचावे. त्यानुसार ते कीटकनाशक टॅंक मिश्रण करण्यासाठी शिफारशीत आहे की नाही, याची खात्री करावी. शिफारस केल्यानुसार मिश्रण तयार करावे.
  • माहितीपत्रकावर कीडनाशक मिश्रणाची शिफारस नसल्यास जार चाचणी केल्याशिवाय फवारणी करू नये. 
  • जार चाचणी झाल्यावर त्याच मिश्रणाची छोट्या भागात झाडावर फवारणी करून झाडावर विपरीत परिणाम, मिश्रणाची किडींच्या नियंत्रणाची परिणामकारकता व अनावश्यक कीटकनाशकांचे अंश याबाबत तपासणी करावी. याला काही दिवस लागू 
  • शकतात.
  • विद्राव्य खते टॅंक मिक्स करायची असल्यास माहितीपत्रक पाहून तसेच आवश्यकता भासल्यास जार चाचणी करून खात्री करावी. काही खतांमुळे मिश्रणातील द्रावणाचा सामू (पीएच) बदलू शकतो. ती कीडनाशकांसोबत वापरल्यास कीडनाशकामध्ये अनावश्यक क्रिया होऊ शकते किंवा कीडनाशकांतील विषाची तीव्रता कमी होऊ शकते.
  • मिश्रणात कीडनाशकांच्या शिफारशीत मात्रेचाच वापर करावा. तसेच मिश्रण करताना कीडनाशकांची क्रमवारी तंतोतंत पाळावी.
  • मिश्रण तयार करण्याची  क्रमवारी 

  • टँक पाण्याने अर्धा भरून ढवळणे सुरू करावे. त्यामध्ये प्रथम पाण्यात मिसळणारी भुकटी (डब्ल्यू पी.), पाण्यात मिसळणारे दाणेदार (डब्ल्यू.जी.), तेलात मिसळणारे (ओ.डी.), पाण्यात वाहणारे कोरडे (डी.एफएल.), पाण्यात वाहणारे ओले (एफएल), सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट (एस.सी.), पाण्यात प्रवाही (ईसी) या क्रमाने कीडनाशके मिसळून टँक तीन चतुर्थांश भरावी.
  • वरील मिश्रण करताना सतत काठीने ढवळावे. त्यानंतर सोल्यूबल लिक्वीड (एस.एल.) या प्रकारचे कीडनाशक मिसळून टँक जवळपास पूर्ण भरावी. यानंतर तेल,  पसरणारे/ चिकटणारे पदार्थ/ स्टिकर/ वेटिंग एजंट किंवा विद्राव्य खते या मिश्रणात आवश्यकतेनुसार टाकावे. टँक पूर्ण भरून चांगले ढवळावे.
  • कीडनाशके हाताळताना घ्यायची काळजी

  • कीडनाशकाच्या डब्यावरील लाल रंगाचे आकाराचे चिन्ह असलेली कीटकनाशके सर्वांत विषारी, त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो. 
  • मिश्रण बनवताना संरक्षक कपडे, बूट, हातमोजे, नाकावरील मास्क इ.चा वापर करावा. 
  • कीडनाशकांचे मिश्रण बनविताना, डबे उघडताना, मात्रा मोजताना त्यातून निघणारी विषारी वाफ, धूर, उडणारी भुकटी इ. नाकावाटे, डोळ्यांमध्ये जाणार नाही व सरळ त्वचेशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • द्रावण बनविण्याच्या ठिकाणी खाद्यपदार्थ किंवा पिण्याचे पाणी ठेवू नये. कीटकनाशकांचा पर्यावरणाशी कमीत कमी संपर्क येईल, याची काळजी घ्यावी.
  • संपर्क- हरिष फरकाडे, ८९२८३६३६३८   प्रा. फरकाडे हे श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती येथे, तर डॉ. झापे हे   कृषी विज्ञान शाखा, ग्रामीण शिक्षण संस्था, पिंपरी, जि. वर्धा येथे सहायक प्राध्यापक आहेत.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Jammu Kashmir Cloudburst: ढगफुटीत अकरा जणांचा मृत्यू

    Maratha Reservation Protest: मराठवाड्यातील मराठे हे कुणबीच, मुदतवाढ नाहीच!

    Onion Market: आंध्र सरकारकडून कांद्याची १,२०० रुपयांना खरेदीची तयारी

    Onion Payment Delay: कांद्याच्या पैशांसाठी सणासुदीला वणवण

    Maharashtara Rain Forecast: विदर्भासह, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज

    SCROLL FOR NEXT