water management should be maintained during the growth phase of groundnut
water management should be maintained during the growth phase of groundnut 
कृषी सल्ला

योग्य पद्धतीने करा पीक व्यवस्थापन

डाॅ. व्ही. ए. खडसे डॉ. दिलीप मानकर

रब्बी पिके निघालेल्या शेताची त्वरीत नांगरणी करावी. त्यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडीचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. जमीन सुधारणेची कामे प्राधान्याने हाती घ्यावी. शेतीची मशागत उताराला आडवी किंवा शेतात समतल (कंटूर) रेषेला समांतर करावी. शेताबाहेर पाणी मिश्रीत माती वाहून जाणार नाही, याबाबत काळजी घ्यावी.

  • स्वच्छता मोहिम हाती घेऊन जास्तीत जास्त कंपोस्ट खड्डे भरावेत.शेतातील काडीकचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करावे.
  • उताराच्या शेवटी दोन हेक्टर क्षेत्राकरीता २०x२०x३ मि. आकाराचे शेततळे खोदावे.
  • पावसाळ्यात झाडे लावण्याचे नियोजन असल्यास खड्डे खोदून तयार करावे.
  • शेतातील खोल मुळ्याची तणे व पालव्या खोदून काढाव्यात.
  • कडूनिंबाच्या निंबोळ्या जास्तीत जास्त गोळा कराव्यात.
  • पिकांचे हंगाम पूर्व नियोजन करावे.
  • उत्पादन खर्च कमी करण्यासाठी घरचे बियाणे स्वच्छ करुन, त्यांची उगवण तपासणी करावी.
  • पीक व्यवस्थापन गहू

  • उशिरा गव्हाची पेरणी केली असेल व गहू पीक शेतात सध्या उभे असेल तर कंबाईन हार्वेस्टरच्या सहाय्याने काढणी करुन घ्यावी.
  • कंबाईन हार्वेस्टरची उपलब्धता नसल्यास मजुरांमध्ये योग्य ते अंतर ठेवून पट्टा पद्धतीने गव्हाची कापणी व मळणी करुन घ्यावी.
  • गव्हाची योग्य पद्धतीने वाळवण करुन गोदामात साठवणूक करावी.
  • काढणी पश्चात गव्हाचे काड न जाळता, जमिनीची नांगरणी करुन शेत पुढील हंगामासाठी तयार ठेवावे.
  • उन्हाळी भुईमुग

  • उन्हाळी भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत जाण्यास सुरुवात झाल्यावर आंतरमशागत करु नये.
  • उन्हाळी भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत जाण्याच्या वेळी ते शेंगा पोसण्याच्या कालावधीत पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • भुईमुगास शक्य असल्यास स्प्रिंकलर पद्धतीने पाणी द्यावे. उशिरा भुईमुग पेरणी झाली असल्यास झाडांना माती लावावी.
  • पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण-  डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) १ मि.ली प्रती लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • टिक्का रोग नियंत्रण-  क्लोरोथॅलोनील (७५ टक्के डब्लूपी) २ ग्रॅम किंवा प्रोपिकोनॅझोल (२५ इसी) १ मिली किंवा हेक्साकोनॅझोल १ मिली किंवा टेब्युकोनॅझोल (२५.९ इसी) १ मिली किंवा कार्बेन्डाझीम २ ग्रॅम यांची प्रती लीटर पाण्यातून फवारणी करावी.
  • रोगाच्या तीव्रतेनुसार आवश्यकता भासल्यास पुन्हा १५ दिवसांनी बुरशीनाशक बदलून फवारणी करावी.
  • पाने पोखरणारी अळी, तूडतूडे व फुलकिडे नियंत्रण- लँबडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.४ ते ०.६ मि.ली किंवा क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २.८ मि.ली यांची प्रती लीटर पाण्यातून फवारणी करावी.
  • ऊस

  • सुरु उसाची लागण झालेल्या क्षेत्रात पीक चार महिन्याचे होईपर्यंत खुरपणी व कोळपणी करुन तण विरहीत ठेवावे.
  • उन्हाळा चालू झाल्याने उसाला योग्य वेळेच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. ऊस पिकास पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. पाणी कमी असल्यास सरी वरंबा पध्दतीमध्ये एक आड एक सरीस पाणी द्यावे.
  • सुरु हंगामी लागवड केलेल्या ऊस पिकाच्या लागणीस ६ ते ८ आठवडे झाले असल्यास नत्र खताचा दुसरा हप्ता द्यावा.
  • सुर्यफुल, मूग व तीळ

  • सुर्यफुल पिकाला कळी अवस्थेत, फुलोर अवस्थेत व दाणे भरण्याव्या वेळी पाण्याचा ताण पडणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • तीळ व मुग या पिकांना तणनियंत्रण करुन नियमित ६-७ दिवसाचे अंतराने ओलीत करावे.
  • उन्हाळी तिळात पर्णगुच्छ (फायलोडी) हा विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास अशी झाडे काढून नष्ट करावीत.
  • उन्हाळी भात (धान)

  • खोड कीड नियंत्रण-  शेतात एकरी ८ कामगंध सापळे लावावेत. फूटव्यात प्रादूर्भाव ५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास क्लोरअॅन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) १२ मि.लि. प्रती १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • करपा रोगांच्या नियंत्रणासाठी, हेक्झाकोनॅझोल (५ ई.सी.) २ मिली प्रती लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • कपाशीतील गुलाबी बोंड अळी नियंत्रणाच्या उपाययोजना -

  • पिकाचा हंगाम संपवून किडग्रस्त बोंडांसहीत पऱ्हाट्याचे सेंद्रीय खत करावे किंवा योग्य प्रकारे जाळून नष्ट करावे.
  • प्रत्येक कापूस संकलन केंद्रे व जिनींग फॅक्टरीमध्ये १५ ते २० कामगंध सापळे (डिसेंबर ते जून पर्यंत) लावून पतंगाचा मोठ्या प्रमाणावर नायनाट करावा.
  • हंगाम संपल्याबरोबर लगेच खोल नांगरणी करावी. म्हणजे पतंगाचे जमिनीतील कोष तसेच सुप्तावस्थेतील किडी उन्हाने किंवा पक्ष्यांचे भक्ष्य होऊन नष्ट होतील.
  • खरिप पिकाच्या बियाण्याचे नियोजन -

  • यावर्षी अती पावसामुळे सोयाबिन सारख्या पिकांची हानी झाल्यामुळे बियाण्याची चणचण भासू शकते. याकरीता घरातील धान्यातले किंवा मागच्या हंगामातील चांगले बियाणे वेगळे करुन पेरणीसाठी साठवून ठेवावे.
  • त्याकरिता बियाण्याची उगवण क्षमता घरच्या घरी तपासून घ्यावी. पेरणीसाठी बियाण्याचे योग्य प्रमाण ठरवता येईल. त्यानुसार झाडांची प्रति हेक्टर संख्या राखणे शक्य होईल. परिणामी बियाण्यावरील खर्चात कपात व अपेक्षित उत्पादन मिळविणे शक्य होईल.
  • शेतकऱ्यांनी आपल्या भागातील पारंपारिक पिके उदा. ज्वारी, सुर्यफुल, मूंग व उडिद यासारख्या पिकांचे नियोजन करावे.
  • भाजीपाला पीक नियोजन-

  • सततच्या वाढत्या तापमानामुळे सर्व भाजीपाला पिकात पाण्याचे योग्य नियोजन करावे.
  • कांदा काढणीसाठी आला असल्यास काढणी करुन शेतात ३ ते ४ दिवस सुकवावा नंतर पात कापून ३ आठवडे सावलीत सुकवावा त्यानंतर प्रतवारी करुन साठवणूक करावी.
  • लसूण काढणी झाल्यानंतर पातीचा रंग परतल्यानंतर जुड्या बांधून हवेशीर ठेवावा.
  • गवार व चवळी पिकाची तोडणी वेळोवेळी करावी.
  • भेंडी पिकावरील रस शोषण करणाऱ्या मावा या प्रादुर्भाव आढळून आल्यास, डायमिथोएट (३० ई.सी.) १.५ मिली प्रती लीटर पाण्यातून फवारणी करावी.
  • भाजीपाला पिकातील तण काढून घ्यावे, त्यामुळे कीड व रोगाचा प्रादूर्भाव होणार नाही.
  • मावा, तुडतुडे नियंत्रण- वेलवर्गीय पिकांमध्ये यांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रति लिटर पाण्यातून डायमिथोइट ३ मिली किंवा इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के एसएल) ०.५ मिली. फवारणी करावी.
  • कोळी नियंत्रण-   फेनप्रोपॅथ्रीन (३० ईसी ) ०.५ मिली किंवा डायकोफॉल (१८.५ ईसी) २ मिली प्रती लीटर पाण्यातून फवारावे.
  • मिरची मिरची पिकावरील फुलकिडे व कोळीचे एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी

  • नत्र खताचा अवास्तव वापर करू नये.
  • पीक दाटू देउ नये.
  • ५ टक्के निंबोळी अर्क किंवा कडूनिंब आधारित कीडनाशक (अॅझाडिरेक्टीन १० हजार पीपीएम) २ ते ३ मिली या प्रमाणे आलटून पालटून वापर करावा. या किडीचा उद्रेक होणार नाही.
  • दोन फवारणीमधील अंतर नेहमी १२ ते १५ दिवस ठेवावे.
  • फवारणी प्रती लीटर पाणी
  • इमामेक्टीन बेन्झोएट (५ टक्के दाणेदार) ०.४ ग्रॅम किंवा इथियॉन (५० टक्के) ३ मिली, किंवा लॅंबडा सायहॅलोग्रीन (५ टक्के) ०.६ मिली किंवा फेनप्रोपॅथ्रीन (३० टक्के) ०.३५ मिली.
  • संपर्क- डाॅ. व्ही. ए. खडसे, ९८५००८५९६६ डॉ. दिलीप मानकर, ७५८८९६२८३७ (संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. )

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

    Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

    Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

    Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

    Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

    SCROLL FOR NEXT