The use of biofertilizers promotes vigorous growth of the crop. 
कृषी सल्ला

जमीन सुपीकतेसाठी द्रवरूप जिवाणू खते

जिवाणू खतामुळे जमिनीची सुपीकता वाढते. पीक उत्पादनक्षमतेत वाढ होते. मुळांच्या संख्येत व लांबीमध्ये भरपूर वाढ होते. द्रवरूप जिवाणू खते व्हेंच्युरी व खताच्या टाकीद्वारे ठिबक सिंचनातून पिकास देता येतात.

डॉ. अनिल धमक, डॉ. सय्यद इस्माईल

जिवाणू खतामुळे जमिनीची सुपीकता वाढते. पीक उत्पादनक्षमतेत वाढ होते. मुळांच्या संख्येत व लांबीमध्ये भरपूर वाढ होते. द्रवरूप जिवाणू खते व्हेंच्युरी व खताच्या टाकीद्वारे ठिबक सिंचनातून पिकास देता येतात. जमिनीचे आरोग्य टिकविण्यासाठी रासायनिक व सेंद्रिय खतांसोबत जिवाणू खतांचा वापर महत्त्वाचा ठरतो. द्रवरूप जिवाणू खते वापरण्यास व हाताळण्यास सोपी असतात.  बियाणे तसेच जमिनीमध्ये उपयुक्त जिवाणूंची जगण्याची चांगली क्षमता असते. जिवाणूंची संख्या १२ ते २४ महिन्यापर्यंत सतत स्थिर राखली जाते. जिवाणू खतामुळे मुळांच्या संख्येत व लांबीमध्ये भरपूर वाढ झाल्यामुळे जमिनीत मुख्य खोडापासून दूरवर आणि खोलवर असणारे अन्नद्रव्य, पाणी पिकास उपलब्ध होते. जिवाणू खतांचा पूरकखते म्हणून वापर केल्यास रासायनिक खतांवरील (नत्र व स्फुरद) शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा २५ टक्के बचत होते. जमिनीत प्रतिजैविके सोडल्यामुळे पिकांची रोग व कीड प्रतिकार शक्ती वाढते.  जिवाणू खतातील जिवाणू पिकाच्या वाढीसाठी आवश्‍यक पदार्थाची (उदा. जीब्रेलीन, जीवनसत्त्व ब-१२, बायोटीन, इंडोल ॲसिटिक ॲसिड) निर्मिती करतात. बियाण्याच्या उगवणीवर व वाढीवर चांगला परिणाम होऊन उत्पादन वाढीस मदत होते. पीक उत्पादन १५ ते ३० टक्यांपर्यंत वाढते. धान्याचा दर्जा सुधारतो. द्रवरूप जिवाणू खते वापरावयाच्या पद्धती बियाण्यास अंतरक्षीकरण 

  • १० किलो बियाणास १०० मिलि (सोयाबीन व भुईमुगासाठी प्रत्येकी ५० मिलि प्रति १० किलो बियाणे ) जिवाणू खत लावावे.
  • जिवाणू खताचा लेप सर्व बियाणांवर सारख्या प्रमाणात लागेल याची काळजी घ्यावी.
  • पेरणीपूर्वी बियाणे थोडा वेळ सावलीत वाळवावे. बियाण्यास दोन किंवा जास्त जिवाणूखताचे अंतरक्षीकरण करता येते. त्याचे कोणतेही विपरीत परिणाम होत नाही. 
  • रोपांच्या मुळावर अंतरक्षीकरण 

  • पुनर्लागवड करणाऱ्या पिकांमध्ये (भाजीपाला, भात,इ.) पुनर्लागवड करताना ॲझोटोबॅक्‍टर/ ॲझोस्पिरीलम व स्फुरद विरघळणाऱ्या द्रवरूप जिवाणूंचा वापर केला जातो. 
  • १०० मिलि प्रत्येकी द्रवरूप जिवाणूखताची मात्रा २५ ते ३० लिटर पाण्यात मिसळून द्रावण करावे. लागवड करण्याअगोदर अर्धा तास रोपांची मुळे द्रावणात बुडवून ठेवावीत. 
  • मातीत मिसळणे  एक एकरासाठी प्रत्येकी २०० मिलि द्रवरूप जिवाणूखत ४०० किलो शेणखत किंवा गांडूळखत किंवा ओलसर मातीत मिसळावे. हे मिश्रण झाडाखाली ५० टक्के ओलावा राहण्यासाठी रात्रभर ठेवावे.पेरणी अगोदर सरी मध्ये टाकून झाकावे किंवा हे मिश्रण जमिनीत पाणी देण्याअगोदर मिसळावे. ठिबक सिंचनाद्वारे वापर नत्र स्थिरीकरण करणारे, स्फुरद विरघळविणारे आणि पालाश विरघळविणारे आणि वहन करणारे द्रवरूप जिवाणू खत (बायोएनपीके)२००० मिलि प्रति एकरासाठी पाण्याच्या स्त्रोतामध्ये मिसळून ठिबक सिंचनाद्वारे ऊस, केळी, कापूस, आले व हळद इत्यादी पिकांना द्यावे.   पिकाच्या मुळाभोवती देणे एक एकरासाठी प्रत्येकी १००० मिलि जिवाणू खत प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी यंत्राच्या साहाय्याने रोपाच्याजवळ सकाळी किंवा संध्याकाळी फवारावीत.  ऊस,बटाटा व हळद बेण्यावर अंतरक्षीकरण  प्रति एकर ऊस, बटाटा व हळद बेण्यासाठी प्रत्येकी ५०० मिलि ॲसेटोबॅक्‍टर / ॲझोटोबॅक्‍टर व स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत प्रति ५०० लिटर पाण्यात द्रावण तयार करून लागवडीपूर्वी अर्धा तास बेणे बुडवून लागवड करावी.  नत्र स्थिर करणारे जिवाणू रायझोबियम 

  • जिवाणूचे कार्य सहजिवी पद्धतीने चालते. हे जिवाणू कडधान्यवर्गीय पिकाच्या मुळावर ग्रंथी निर्माण करतात. 
  • ग्रंथीमध्ये राहून हवेतील नत्र वायू शोषून पिकास उपलब्ध करून देतात. 
  • जिवाणूंना नत्र स्थिर करण्यासाठी रोपांची आवश्‍यकता असते. 
  • ॲझोटोबॅक्‍टर 

  • हे जिवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वनस्पतीच्या मुळाभोवती राहून असहजिवी पद्धतीने नायट्रोजिनेज विकराच्या साहाय्याने हवेतील नत्र स्थिरीकरणाचे कार्य करतात. या जिवाणूच्या अनेक जाती आहेत. आपल्याकडे उष्ण प्रदेशाच्या जमिनीत ॲझोटोबॅक्‍टर क्रोकोकम ही उपजात दिसून येते. 
  • हे जिवाणू हवेतील मुक्त स्वरूपात असणाऱ्या नत्र वायूचे स्थिरीकरण करून पिकास उपलब्ध करून देतात. या जिवाणू खताचा उपयोग तृणधान्य (मुळावर गाठी नसणारी पिके) पिकांसाठी होतो. 
  • अझोस्पिरीलम 

  • जिवाणू खताचा वापर डाळवर्गीय पिके सोडून तृणधान्य, गळीत धान्य, भाजीपाला, फळझाडे, बटाटा, ऊस, आले, फळझाडे, रताळी, गाजर, लसूण इत्यादी पिकांसाठी करावा. 
  •  जिवाणू पिकाच्या मुळात किंवा मुळांच्या सभोवतालच्या मातीत राहून नत्र स्थिर करतात.
  •  ॲसेटोबॅक्‍टर 

  • हे जिवाणू अंतर प्रवाही असून पिकाच्या मुळाद्वारे नत्राचे स्थिरीकरण करतात.
  • हे जिवाणू उसातील सर्व भागात जाऊन कार्य करतात. 
  • ऊस व इतर शर्करायुक्त पिकामध्ये या जिवाणूंचा सर्वाधिक वापर होतो. 
  • स्फुरद विरघळविणारे जिवाणू 

  • रासायनिक खताद्वारे स्फुरद पूर्णपणे पिकास उपलब्ध होत नाही. यापैकी २० ते २५ टक्के स्फुरद पिकांना वापरात येऊ शकतो. बाकीचा ७५ ते ८० टक्के स्फुरद मातीच्या कणांवर स्थिर होतो, तो पिकाला उपलब्ध होत नाही. उपलब्ध स्फुरदाचा पिके पूर्णत: वापर करू शकत नाहीत.
  • स्फुरद विरघळविण्याचे कार्य विशिष्ट प्रकारचे जिवाणू करतात.  त्यामुळे तो पिकांना उपलब्ध होतो. मातीच्या कणावर स्थिर झालेला व उपलब्ध नसणाऱ्या स्फुरदाचे विघटनकरून त्याचे पाण्यात विरघळू शकणाऱ्या द्राव्य स्वरूपात रूपांतर करतात. 
  • स्फुरद जिवाणूखतामध्ये अनेक जिवाणूंचा सहभाग असतो. स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणूकडून सायट्रिक आम्ल, लॅक्‍टीक आम्ल, मॅलीक आम्ल, फ्युमॅरीक आम्ल यासारखी कार्बनिक आम्ल तयार होतात. अविद्राव्य स्वरुपातील स्फुरदाबरोबर संयोग होऊन त्याचे रूपांतर विद्राव्य स्वरूपात करतात. 
  • - डॉ. अनिल धमक   ९४२००३३०४६  (मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

    Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

    Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

    Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

    Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

    SCROLL FOR NEXT