Sugarcane Cultivation advisory 
कृषी सल्ला

तंत्र आडसाली ऊस लागवडीचे...

जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, सुधारित जातींचे शुद्ध व निरोगी बेणे निवड, ५ फूट सरीमध्ये रोप लागवड तंत्र, ठिबक सिंचनाद्वारे पाणी आणि खत व्यवस्थापन, तणनियंत्रण आणि योग्य आंतरमशागत केल्यास अपेक्षित उत्पादन मिळू शकते.

डॉ. भरत रासकर

आडसाली उसाची उत्पादकता वाढविण्यासाठी पंचसूत्री तंत्रज्ञानाचा वापर करावा. जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, सुधारित जातींचे शुद्ध व निरोगी बेणे निवड, ५ फूट सरीमध्ये रोप लागवड तंत्र, ठिबक सिंचनाद्वारे पाणी आणि खत व्यवस्थापन, तणनियंत्रण आणि योग्य आंतरमशागत केल्यास अपेक्षित उत्पादन मिळू शकते. ऊस लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ८ पर्यंत असावा. सेंद्रिय कर्बाचे किमान प्रमाण ०.५ टक्के पेक्षा अधिक असावे. भारी जमिनीतील १.५ ते २ फूट खोलीवरील जमिनीचा कठीण थर फोडण्यासाठी दर तीन वर्षांतून एकदा १ ते १.५ मीटर अंतरावर उताराच्या दिशेने सब सॉयलरने नांगरट करावी. मुख्य चरापर्यंत नांगराचे तास काढावेत. गेली दोन वर्षे सातत्याने पाऊस जास्त पडल्याने पश्‍चिम महाराष्ट्रात ऊस लागवड क्षेत्रात ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले. त्यामुळे त्या ठिकाणी एक शिवडी ऊस आढळून आले. अशा जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला झाल्यास उसामध्ये फुटव्याचे प्रमाण आणि संख्या अपेक्षित राहू शकते. जमीन व्यवस्थापन  आपला प्रदेश उष्ण कटिबंधात असल्याने जे काही सेंद्रिय पदार्थ जमिनीत आहेत त्याचे विघटन होण्याचा वेग जास्त आहे. त्यामुळे सेंद्रिय पदार्थाचे संकलन आणि साठवण फार कमी प्रमाणात होते. त्याकरिता हे प्रमाण कायम ठेवणे किंवा वाढविण्यासाठी लवकर कुजणारे, मध्यम वेळ घेणारे आणि उशिरा कुजणारे सेंद्रिय खत वापरल्यास कर्बाचे योग्य प्रमाण ठेवता येते. लागवड करण्यापूर्वी ताग किंवा धैंचा ही हिरवळीची पिके घ्यावीत. साधारणपणे हेक्टरी २० ते २५ टन बायोमास गाडल्यानंतर त्यापासून ८५ ते ९० किलो नत्राची मात्रा मिळते. हिरवळीचे खत नसल्यास शेवटच्या पाळीअगोदर हेक्टरी ३० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. मातीची तपासणी करून अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे.लोह, जस्त, मॅगेनीज आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असणाऱ्या जमिनीसाठी हेक्टरी २५ किलो फेरस सल्फेट, २० किलो झिंक सल्फेट, १० किलो मॅगेनिज सल्फेट आणि ५ किलो बोरॅक्स चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये (१० : १ प्रमाणात) ५ ते ६ दिवस मुरवून लागवडीच्या अगोदर सरीतून द्यावे. हुमणी प्रादुर्भाव कमी होण्यास लागवडीच्या वेळी हेक्टरी २ टन निंबोळी पेंड सरीत मिसळावी. जातींची निवड 

  •  को.८६०३२ (निरा), को.एम.०२६५ (फुले २६५) आणि व्हीएसआय ८००५ या अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड करावी. महाराष्ट्रामध्ये को.८६०३२ जातीची ५० ते ५५ टक्के आणि फुले २६५ जातीची ३० ते ३२ टक्के क्षेत्रावर लागवड केली जाते.
  • बेणे मळ्यातील ९ ते ११ महिने वयाचे अनुवांशिकदृष्ट्या शुद्ध आणि निरोगी बेणे वापरावे. बेणे लांब कांड्यांचे व फुगीर डोळ्याचे आणि रसरशीत असावे. आनुवंशिकदृष्ट्या शुद्ध बेणे वापरल्यास उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते.
  • जास्त पावसाच्या प्रदेशात आडसाली लागवड रोप लागण पद्धतीने महिनाभर उशिरा करावी म्हणजे शिवडी ऊस राहणार नाही.
  • दर तीन वर्षांनी बेणे बदलावे. याचे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा अधिक असावे.
  • बेणे प्रक्रिया 

  • काणी रोग तसेच कांडीवरील खवले कीड व पिठया ढेकूण नियंत्रणासाठी हेक्टरी १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि ३०० मिलि डायमिथोएट प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून बेणे १० मिनिटे बुडवावे.
  •  या प्रक्रियेनंतर अॅसिटोबॅक्टर १० किलो आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक १.२५ किलो प्रति १०० लिटर
  • पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात टिपरी ३० मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी. जिवाणू संवर्धकाच्या प्रक्रियेमुळे ५० टक्के नत्र व २५ टक्के स्फुरद खतांची बचत होते. (ॲग्रेस्को शिफारस)
  • लागवड तंत्र 

  •  लागवड १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी. रिजरच्या साह्याने भारी जमिनीत १५० सें.मी. व मध्यम भारी जमिनीत १२० ते १३५ सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात.सरीची लांबी उतारानुसार २० ते ४० मीटर ठेवावी.
  •  एक डोळा पद्धतीने डोळा वरच्या बाजूस ठेवून १ फूट अंतर आणि दोन डोळ्यांची टिपरी वापरावयाची असल्यास दोन टिपऱ्यांमधील अंतर अर्धा फूट ठेवून लागवड करावी.
  • जोडओळ पट्टा पद्धतीने लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीसाठी २.५ फुटांवर, तर भारी जमिनीसाठी ३ फुटांवर सलग सऱ्या पाडाव्यात.
  • आडसाली उसातील आंतरपिके

  • भुईमूग, चवळी, सोयाबीन व भाजीपाला इत्यादी आंतरपिके घेता येतात.
  • जमीन सुपीकतेसाठी ताग, धैंचा यांसारख्या हिरवळीच्या पिकांची लागवड करावी. बाळबांधणीच्या वेळी हिरवळीची पिके सरीमध्ये गाडावीत.
  • रा सायनिक खतांची मात्रा  माती परीक्षणानुसार हेक्टरी ४०० किलो नत्र, १७० किलो स्फुरद आणि १७० किलो पालाशची खत मात्रा द्यावी. युरिया खत देताना निंबोळी पेंडीच्या भुकटी बरोबर ६:१ या प्रमाणात मिसळून द्यावीत. टीप :  को ८६०३२ ही जात रासायनिक खतांच्या जादा खत मात्रेस प्रतिसाद देत असल्यामुळे प्रति हेक्टरी नत्र, स्फुरद व पालाश या रासायनिक खतांची २५ टक्के जादा मात्रा द्यावी. पाणी व्यवस्थापन 

  • ठिबक सिंचन पद्धतीमुळे ५० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत, खतामध्ये २५ टक्के बचत आणि उत्पादनात २० टक्के वाढ होते.
  • ठिबक सिंचनातून खते दिल्यास कार्यक्षमता ९० टक्क्यांपर्यंत वाढते, तर प्रचलित पद्धतीत ३५ ते ४० टक्के खते उपयोगी पडतात.
  • लागणीपासून मोठ्या बांधणीपर्यंत दर आठवड्याच्या अंतराने समान २० हप्त्यांत किंवा दर पंधरा दिवसांच्या अंतराने समान १० हप्त्यांत नत्रखताची मात्रा विभागून दिल्यास उत्पादनात वाढ होते.
  • नत्रासाठी युरिया, स्फुरदयुक्त खते देण्यासाठी फॉस्फरिक आम्ल किंवा १२:६१:०० या खतांचा वापर करावा. पालाश खतांच्या वापरासाठी पांढरे पोटॅशिअम क्लोराइड वापरावे.
  • पाण्यात विरघळणाऱ्या मिश्र खतात १९:१९:१९, २०:२०:२०, २०:०९:२०, १५:०४:१५ तर द्रवरूप खतात ४:२:८, ६:३:६, ६:४:१०, १२:२:६, ९:१:६ अशी विविध ग्रेडची खते उपलब्ध आहेत. ही खते शिफारशीप्रमाणे वापरावीत.
  • संपर्क ःडॉ. भरत रासकर, ८७८८१०१३६७ (ऊस विशेषज्ञ मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Blockchain Technology: कृषी पुरवठा साखळीसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान

    Cotton Farming: कपाशीच्या शाश्‍वत उत्पादनासाठी काटेकोर नियोजनावर भर

    Rural Banks: गरिबांना अखेर वाली तो कोण?

    Bogus Agriculture Inputs: बनावटगिरीला हवा कायद्याचा धाक

    Agriculture Support: भीज पावसामुळे ऊस, तरकारी पिकांना नवसंजीवनी

    SCROLL FOR NEXT