Onion nursery 
कृषी सल्ला

कांदा रोपवाटिका तयारी अन् व्यवस्थापन

मागील वर्षी खरीप कांद्याच्या रोपवाटिकेत बुरशीजन्य मानमोडी रोग, रोपांच्या मुळांची सड आणि रोपे पिवळे पडणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. सुरवातीच्या काळातच रोपवाटिकेची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

डॉ. साबळे पी. ए., डॉ. विजय महाजन, सुषमा साबळे

मागील वर्षी खरीप कांद्याच्या रोपवाटिकेत बुरशीजन्य मानमोडी रोग, रोपांच्या मुळांची सड आणि रोपे पिवळे पडणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. सुरवातीच्या काळातच रोपवाटिकेची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. खरीप कांद्याच्या रोपवाटिकेसाठी सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध, वालुकामय चिकणमातीयुक्त, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन (सामू ६ ते ७.५)योग्य ठरते.

  • जमिनीला किंचित उतार असावा. यामुळे पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होणे सोईस्कर ठरते. रोपवाटिकेत सतत पाणी साठून राहण्याची स्थिती बुरशीजन्य रोगांच्या संसर्गास अनुकूल ठरते.
  • जमिनीत चिकन मातीचे प्रमाण जास्त नसावे.
  • रोपवाटिकेच्या क्षेत्राची खोल नांगरणी आणि गरजेनुसार वखरणी करून घ्यावी. यामुळे जमीन भुसभुशीत होण्यासोबतच तण, बुरशीजन्य रोग व जमिनीतील किडींचा उपद्रव कमी होण्यास मदत होईल.
  • रोपवाटिकेत विविध बुरशीजन्य रोग (रायझोक्टोनिया, फायटोप्थोरा, पिथीयम आणि फ्यूजॅरिअम इ.) येण्याची शक्यता असते. ज्या ठिकाणी रोपवाटिकेत बुरशीजन्य मानमोडी (डम्पिंग ऑफ) किंवा मातीतून प्रसार होणाऱ्या रोगांचा परिणाम होतो, अशा जमिनींमध्ये मातीचे निर्जंतुकीकरण (मृदा सौरीकरण - सोलॅरायझेशन) उपचार करावेत.
  • मृदा सौरीकरण करण्याची पद्धत  रोपवाटिकेचे क्षेत्र हलके पाणी थोडे ओलसर करून घ्यावे. मार्च ते मे दरम्यान रोपवाटिकेसाठी निवडलेली जागा २०० गेजच्या पांढऱ्या पारदर्शक पॉलिथीनने झाकून घ्यावी. सर्व बाजूनी माती टाकून घट्ट दाबून घ्यावी. यामुळे उष्णतेमुळे आतील भागात तयार होणारी बाष्पयुक्त हवा बाहेर पडणार नाही. आतील तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत टिकून राहील. ६-७ आठवड्यांनंतर पॉलिथिन काढून टाकून आवश्यक प्रतिक्षा काळानंतर रोपवाटिकेसाठी वाफे तयार करावेत. वाफे तयार करणे 

  • रोपवाटिकेसाठी वाफे कशा प्रकारचे बनवावे, हे ऋतूवर (हंगाम) अवलंबून असते.
  • सपाट वाफ्यात पाणी एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे वाहत जाते. यात बियाणे वाहून जाण्याची शक्यता असते.
  • भारी (चिकणमाती) जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. खरीप कांद्याची रोपवाटिका ही गादीवाफ्यावर करणे फायद्याचे असते. गादीवाफ्याची लांबी २-३ मी., रुंदी १-१.५ मी. आणि जमिनीपासून १५ ते २० सें.मी. उंची असावी. तण काढणी सुलभ होण्यासाठी वाफ्याची रुंदी १ ते १.५ मी ठेवावी.
  • वाफे बनवताना या आकाराच्या प्रति वाफ्यात ८-१० किलो चांगले कुजलेले शेणखत, १५० ग्रॅम १९:१९:१९ (एन.पी.के.) आणि ५० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड मातीत एकसमान मिसळून द्यावे. किंवा प्रति वर्गमीटर प्रमाणे १ किलो चांगले कुजलेले शेणखत, ०.५ ग्रॅम नत्र, ५ ग्रॅम स्फुरद आणि ५ ग्रॅम पालाश खतांची मात्रा पायाभूत स्वरूपात द्यावी. उर्वरित ५ ग्रॅम नत्र पेरणीच्या २० दिवसांनी प्रति वर्गमीटर द्यावे.
  • शेणखतासोबत ट्रायकोडर्मा हर्जियानम ३० ग्रॅम प्रति वाफा मातीत मिसळावे किंवा बुरशीजन्य मर रोग नियंत्रणात राहून निरोगी रोपे मिळण्यासाठी प्रति हेक्टरी १.२५ किलो ट्रायकोडर्मा वापरण्याचीही शिफारस आहे.
  • बियाणे 

  • एक हेक्टर क्षेत्रावर कांदा पुनर्लागवड करण्यासाठी ८-१० किलो बियाणे आवश्यक असते. जर ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीने रोपवाटिका नियोजन केले असल्यास हेक्टरी ५-७ किलो बियाणे पुरेसे असते.
  • पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास कॅप्टन २-३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २-३ ग्रॅम या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. पॅकेटबंद
  • बियाणांवर उपचार केलेले असतात, त्यावर पुन्हा उपचार करण्याची आवश्यक नसते. बाजारातून आणलेल्या बियाणे पाकिटावर कोणत्या रासायनिक घटकांची प्रक्रिया झाली का, याची खात्री करावी.
  • बियाणे ओळींमध्ये १ ते १.५ सें.मी. खोलीवर टाकावे. ओळींमध्ये ५ ते ७.५ सें.मी. अंतर ठेवावे.
  • बियाणे टाकून त्यावर कुजलेल्या शेणखत किंवा कंपोस्ट खताच्या बारीक भुकटीचा हलकासा थर द्यावा व नंतर हलके पाणी द्यावे.
  • योग्य तापमान आणि आर्द्रता राखण्यासाठी वाफे वाळलेल्या हलक्या गवताने झाकू शकतो.
  • रोपवाटिका लहान असल्यास बियाणाची उगवण होईपर्यंत झारीने पाणी द्यावे. रोपवाटिकेच्या विस्तार मोठा असल्यास ठिबक किंवा तुषार सिंचनाची सोय करावी. ते शक्य नसल्यास गादीवाफ्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या पाटातून पाणी द्यावे.
  • साधारण ६-८ दिवसांनी बियाणांचा उगवण झाल्यानंतर वाफ्यावर टाकलेले हलके गवत त्वरित काढावे. गवत काढण्यास विलंब झाल्यास रोपांची लांब वाढ होऊन पिवळसर होऊ शकतात.
  • रोपवाटिकेत तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खुरपीच्या साहाय्याने २ खुरपण्या प्रभावी ठरतात.
  • तणनाशकाच्या साहाय्याने तण नियंत्रण करायचे असल्यास रोपे उगवण्यापूर्वी वाफ्यावर पेंडीमिथॅलीन २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. २०-२५ दिवसांनी हाताने खुरपणी करावी.
  • ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यायचे असल्यास १६ मि.मी. व्यासाच्या लॅटरलचा वापर करावा. प्रति तास ४ लिटर क्षमतेच्या दोन ड्रीपरमध्ये ३०-५० सें.मी. अंतर असावे.
  • तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करणार असाल, तर २ लॅटरलमध्ये ६ मीटर अंतर ठेवावे. नोझलची पाणी फेकण्याची क्षमता प्रति तास १३५ लिटर असावी.
  • वरील दोन्ही पद्धतीचा अवलंब शक्य नसल्यास आणि रोपवाटिकेच्या विस्तार लहान असल्यास रोपवाटिकेतील पावसाचे अतिरिक्त पाणी साठून राहू देऊ नये. पाणी साठून राहिल्यास जमिनीमध्ये हवा (ऑक्सिजन) खेळती राहत नाही. परिणामी मुळांना अन्नद्रव्ये घेणे कठीण होते. अशा वेळी बुरशीची वाढ होऊ शकते व रोपे पिवळी पडून मरण्याची शक्यता असते. म्हणून जमिनीपासून २ मीटर उंचीवर हिरवे शेडनेट किंवा ६० ते १०० मेश नायलॉनची कीडरोधक जाळीच्या साहाय्याने पावसाळ्यात रोपांना संरक्षित करता येते. निरोगी, कीड आणि रोग मुक्त रोपे मिळण्यासाठी हे अत्यंत आवश्यक असते.
  • कीड-रोग व्यवस्थापन 

  •  कांदा रोपवाटिकेसह पुनर्लागवडीमध्येही फुलकिडे ही प्रमुख कीड आहे.
  • तिच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी फिप्रोनिल (५ एस.सी.) १ मि.लि. किंवा कार्बोसल्फान (२५ % ई.सी.) २ मि.लि.
  • पावसाळ्यात सोबत स्टिकरचा वापर करावा.
  • ढगाळ हवामान आणि दव स्थिती बुरशीजन्य रोगास अनुकूल असते.
  • काळा आणि तपकिरी करपा रोग नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी मँकोझेब २.५ ग्रॅम किंवा हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम.
  • पावसाळ्यात रोपवाटिकेत सतत पाणी साठून राहणे आणि जमिनीची अयोग्य पाणी निचरा क्षमता यामुळे बुरशीजन्य रोगामुळे रोपांची मूळसड होऊ शकते. नियंत्रणासाठी आळवणी प्रति लिटर पाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम
  • मर रोगापासून नियंत्रणासाठी, आळवणी प्रति लिटर पाणी मेटॅलॅक्झिल (४ %) अधिक मॅन्कोझेब (६४ %) (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम.
  • अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे रोपे पिवळी पडणे  सतत पडणाऱ्या पावसामुळे निचरा झाल्याने पोषक अन्नद्रव्यांचा ऱ्हास होऊन रोपे पिवळी पडण्याची शक्यता असते. बियाणे टाकल्यानंतर २० दिवसांनी १९:१९:१९ (एन.पी.के.) आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण (जस्त ३ %, लोह २.५ %, मंगल १ %, तांबे १ % आणि बोरॉन ०.५ %) यांची फवारणी कमतरतेचे प्रमाण जाणून किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी. (प्रमाण - १ ते २ ग्रॅम प्रति लिटर) माती परीक्षण आणि पिकांचा प्रतिसाद किंवा जेव्हा पीक अन्नद्रव्यांच्या कमतरतेचे लक्षण या प्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन परिस्थितीनुसार करावे. पुनर्लागवडीसाठी तयार रोपे  लागवडीसाठी तयार झालेल्या रोपांना साधारणतः ५-६ दिवस पाणी देणे बंद करावे. लागवडीसाठी रोपे काढण्यापूर्वी १ ते २ दिवसआधी हलके पाणी द्यावे. पुनर्लागवड करताना वाढलेल्या रोपांचा शेंड्याकडील एक तृतीयांश भाग कापून टाकावा. कार्बोसल्फान २ मि.लि. व कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति १ लिटर पाणी या प्रमाणे मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात रोपांची मुळे २ तास बुडवून नंतर लागवड करावी. पुनर्लागवड साधारणतः रोपे ४०-४५ दिवसांची झाल्यानंतर त्यांची १५ x १० सें.मी. अंतरावर पुनर्लागवड करतात. साधारणतः ०.८ ते ०.९ सें.मी. मानेची जाडी असलेली २०-३५ सें.मी. उंचीचे रोपे लागवड करण्यासाठी उपयुक्त मानली जातात. ( टीप :  लेखातील कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशकांना कांदा व लसूण संशोधन संचनालयामार्फत शिफारस करण्यात आली आहे.) -  डॉ. साबळे पी. ए., ८४०८०३५७७२ (सहायक प्राध्यापक -उद्यानविद्या विभाग, के.व्ही.के., सरदार कृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, साबरकांठा, गुजरात. ) डॉ. विजय महाजन, ९४२१००५६०७ (प्रमुख शास्रज्ञ, कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

    Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

    Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

    Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

    PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

    SCROLL FOR NEXT