Tuta Absoluta infestation 
कृषी सल्ला

टोमॅटोवरील टुटा ॲबसोलुटा किडीची ओळख, लक्षणे, उपाययोजना

टोमॅटो पिकात टुटा ॲबसोलुटा या किडीचा प्रादुर्भाव अलीकडील काळात वाढत आहे. या किडीची सविस्तर ओळख, नुकसानीची लक्षणे ओळखून एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे आहे.

गणेश पडगळ

टोमॅटो पिकात टुटा ॲबसोलुटा या किडीचा प्रादुर्भाव अलीकडील काळात वाढत आहे. या किडीची सविस्तर ओळख, नुकसानीची लक्षणे ओळखून एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे आहे. यंदाच्या वर्षी उन्हाळी टोमॅटो पिकात टुटा ॲबसोलुटा या किडीच्या प्रादुर्भावाने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. या किडीची नेमकी ओळख करून घेणे व वेळीच उपाय करून ती नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. टुटा किडीविषयी जाणून घेऊया. या किडीचे मूळ ठिकाण 'पेरू' देश आहे. ही कीड दक्षिण अमेरिकेत खूप उपद्रवी असल्याने त्यास ‘साऊथ अमेरिकन मॉथ' या नावाने सुद्धा ओळखले जाते. आपल्या देशात व महाराष्ट्रात २०१४ मध्ये ती सर्वप्रथम आढळली. नुकसानीचा प्रकार व लक्षणे

  • टुटा अळी मुख्यत्वे टोमॅटो पिकावर आपली उपजीविका करते. या व्यतिरिक्त मिरची, बटाटा, सिमला मिरची व वांगी या ‘सोलॅनॅनिसी’ वर्गातील पिकांचेही देखील ती नुकसान करते.
  • मादी साधारणतः २०० ते २६० अंडी एकावेळी पानाच्या खालील बाजूला किंवा फांदीवर घालते. -अंड्यातून बाहेर पडलेली अळी पांढरट व कालांतराने पिवळी दिसते.
  • ती पानांमध्ये ‘गॅलरी’ तयार करते व नंतर कोवळ्या फांद्या व हिरवी फळे यांना हानी पोहोचवते.
  • जास्त उद्रेक असल्यास पाने जळून जातात.
  • जसजशी अळी मोठी होते तसतशी हिरवट दिसू लागते. डोक्यावर काळसर पट्टा दिसतो.
  • पूर्ण परिपक्व अळी साधारण ९ मिमी म्हणजेच तांदळाच्या दाण्याच्या आकाराएवढी असते.
  • त्यानंतर गॅलरी बाहेर येऊन मातीमध्ये अथवा पानांना गुंडाळून कोषावस्थेत जाते.
  • उष्ण, ढगाळ वातावरण पतंग कोषातून लवकर बाहेर पडण्यास पोषक असते.
  • कोषातून बाहेर पडलेला पतंग अंधारप्रिय असल्याने दिवसा पानांच्या मागच्या बाजूस ते लपून राहतात. रात्रीचे बाहेर पडतात.
  • अळी पानांवरती व फळांवरती गॅलरी तयार करते. त्यानंतर तेथे बुरशीचा प्रादुर्भाव होतो. अशी फळे बाजारात विकता येत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.
  • पोषक हवामान टुटा किडीसाठी हिवाळा किंवा खूप उष्ण व कोरडे वातावरण प्रतिकूल असते. त्यामुळे या दिवसांत एक जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी ३० ते ७४ दिवस लागतात. कोषावस्थाही दीर्घ होते. त्यामुळे पावसाळ्यात, हिवाळ्यात व अति उष्ण, कोरड्या भागात या किडीचा उपद्रव दिसत नाही. उन्हाळ्यात म्हणजेच डिसेंबर ते एप्रिल २८ ते ३४ अंश सेल्सिअस तापमान व आर्द्रता ५५ ते ६० टक्के हे वातावरण उपद्रवासाठी पोषक असते. त्यामध्ये ही कीड जीवनक्रम १८ ते २२ दिवसांत पूर्ण करते व त्यांची संख्या झपाट्याने वाढते. यावर्षी डिसेंबरपासून प्रत्येक १५ दिवसांत पाऊस अथवा ढगाळ वातावरण राहिल्याने प्रादुर्भाव वाढण्यास मदत मिळाली. किडीची नेमकी ओळख  नेहमीची नागअळी, फळमाशी आणि टूटा यांच्या ओळखण्यामध्ये संभ्रम होऊ नये म्हणून पुढील बाबी गोष्टी तपासाव्यात.

  • नेहमीची नागअळी पानांवर नागासारख्या रेषा ओढते. आकाराने ती टूटा किडीपेक्षा खूप लहान असते.
  • फळमाशी फळाला दंश करते. फळ कापल्यावर आतमध्ये लहान सुतके आढळतात.
  • टुटा फळाच्या सालीवर गॅलरी बनवते. पाने गुंडाळते.
  • टुटा किडीचे एकात्मिक नियंत्रण

  • प्रभावी नियंत्रणासाठी किडीचा उद्रेक, झपाट्याने वाढ होणारे वातावरण व पिकांची अवस्था यांची माहिती असणे फार गरजेचे आहे.
  • प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा.
  • डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत जास्त प्रादुर्भाव होत असल्यामुळे उपजिवीकेसाठीच्या गवतांचे नियंत्रण करावे.
  • आधीच्या पिकाची काढणी झाल्यानंतर शेत तळपू द्यावे. यामुळे कोषावस्था नष्ट होण्यास मदत होते.
  • रोपवाटिकेद्वारे किडीचा प्रसार होऊ नये म्हणून त्यास ‘इन्सेक्ट प्रूफ नेट' लावावे.
  • रोपांची दाट लागवड टाळावी.
  • पिवळे चिकट सापळे व त्याला टूटा या किडींसाठीचे ल्यूर सुरवातीला शेतात लावावेत. त्यामुळे कीड शेतात आलेली समजते. त्यावेळेसच अटकाव होण्यास मदत होते.
  • पतंग अवस्था अंधारप्रिय असल्याने झाडाच्या खाली व पानांच्या मागील बाजूस दडलेले असतात. त्यामुळे टोमॅटोचे दोन ते तीन तोडे झाल्यानंतर खालील बाजूची एक ते दीड फूट पाने काढून टाकावीत. -रात्रीच्या वेळेस एकरी २ ते ३ प्रकाश सापळे लावावेत.
  • 'आयआयएचआर’ या बंगळूर स्थित संस्थेने विकसित केलेला अर्का-टूटा सापळा आहे. शिफारसीनुसार त्याचा वापर करता येईल.
  • टोमॅटो पीक घेण्याआधी वा काढणी झाल्यानंतर सोलेनेसी वर्गातील पिके (उदा. मिरची, बटाटा, सिमला मिरची, वांगी) त्या शेतात घेऊ नयेत.
  • झाडाला अजैविक ताण देऊ नये. म्हणजेच पाणी कमी किंवा जास्त देऊ नये. वाढीनुसार योग्य अन्नद्रव्ये खतांमार्फत द्यावीत.
  • टूटा किडीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी ट्रायकोडर्मा प्रजाती मित्रकिटकांचा एक लाख अंडी प्रति एकर याप्रमाणेही वापर करतात.
  • रासायनिक नियंत्रण बंगळूर येथील ‘आयआयएचआर’ संस्थेने केलेल्या शिफारशी पुढीलप्रमाणे. प्रति लिटर पाण्यासाठी

  • -इंडोक्साकार्ब (१४. ५ एससी)- एक मिली किंवा
  • क्लोरॲंट्रानीलीप्रोल (१८. ५ टक्के)- ०.३ मिली किंवा
  • फ्लुबेन्डायअमाइड (४८० एससी)- ०.२५ मिली
  • टीप

  • वरील कीडनाशके लेबल क्लेमयुक्त नसली तरी ‘आयसीएआर’ अंतर्गत संस्थेतील म्हणून प्रमाणित मानली आहेत. शेतकरी संस्थेतील शास्त्रज्ञांचा अधिक सल्ला घेऊ शकतात.
  • ही कीड खूप कमी म्हणजेच १८ ते २२ दिवसांत एक पिढी पूर्ण करते. त्यामुळे किटकनाशकांप्रति प्रतिकारशक्ती येऊ शकते. यामुळे कीटकनाशके आळीपाळीने किंवा योग्य दिवसांच्या अंतरानेच फवारावीत.
  • संपर्क- गणेश पडगळ-९७३०९५६४४४

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

    Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

    Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

    Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

    Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

    SCROLL FOR NEXT