Dragon Fruit Cultivation 
कृषी सल्ला

ड्रॅगन फ्रूट लागवडीचे तंत्र

रोप लागवड करताना जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता व वातावरण इत्यादी घटकाचा योग्य अभ्यास करून अंतर निश्चित करावे. पाण्याची सोय असल्यास, अति उष्ण महिने वगळता वर्षभरात कोणत्याही महिन्यात लागवड करता येते.

विजयसिंह काकडे, संग्राम चव्हाण  

रोप लागवड करताना जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता व वातावरण इत्यादी  घटकाचा योग्य अभ्यास करून अंतर निश्चित करावे. ३ x २.५ मीटर  आणि ३ x ३ मीटर  अंतरावर लागवडीची शिफारस आहे. पाण्याची सोय असल्यास, अति उष्ण महिने वगळता वर्षभरात कोणत्याही महिन्यात लागवड करता येते. लागवडीपूर्वी आधार प्रणाली उभारावी लागते. यामध्ये आरसीसी सिमेंट किंवा लाकडी खांबांचा उपयोग केला जातो. आरसीसी सिमेंटचे खांब वापरणे योग्य ठरते.

खांबाचे आकारमान  

  •   ५ ते ६ फूट उंची, 
  •   ३.५-४ × ३.५-४ इंच (रुंद/जाड)
  •   वजन ४० ते ४५ किलो
  •   खांबाच्या टोकावरती एक ८ ते १० एमएम चा रॉड/नट असावा. जो प्लेट बसवण्यासाठी उपयोगी ठरतो.
  • प्लेटचे आकारमान  

  •   ५०-६० सेंमी लांबी × ५०-६० सेंमी रुंदी × ३-४ सेंमी जाडी)
  •   गोलाचा व्यास १२-१५ सेमी  
  •   प्लेटचे वजन २०-२५ किलो
  • लागवडीचे तंत्र   

  • जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता याचा अभ्यास करून अंतर निश्‍चित करावे.   ३ × २.५ मीटर  आणि ३ × ३ मीटर  अंतरावर लागवड करावी.
  • रोप लागवडीपूर्वी सिमेंटचे खांब उभे करून घ्यावेत (३ ते ४ फूट जमिनीवर ठेवावेत) त्यानंतर प्रत्येक खांबाच्या ठिकाणी १०-१५ किलो शेणखत मिसळून वाफे बनवावेत.  लागवड करताना, रोपे खांबाच्या जेवढ्या जवळ लावता येतील तेवढी लावावीत. नवीन फुटवा खांबाला योग्य रीतीने बांधता येईल. खांबाच्या चारही बाजूंना एक एक रोप लावावे.
  • रोपास येणारे नवीन फुटवे खांबालगत सुतळीच्या साहाय्याने बांधावेत. या फुटव्यांना खांबाच्या टोकावरती बसवलेल्या चौरस किंवा गोलाकार प्लेटच्या छिद्रांमधून वाढू द्यावे. सुरुवातीच्या काळामध्ये आडवे वाढणारे किंवा जमिनीच्या दिशेने वाढणारे फुटवे काढावेत. जेव्हा सरळ वाढणाऱ्या फांद्या खांबाच्या टोकावरती असणाऱ्या प्लेटपर्यंत पोहोचतील तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात परंतु योग्य फुटव्यांना वाढू द्यावे. जेणेकरून अधिक प्रमाणात फळ धारणा होईल.  रोगट तसेच सनबर्नने प्रभावित झालेल्या फांद्यांची छाटणी करावी. प्रत्येक वर्षी अनावश्यक फांद्यांची निर्जंतुकीकरण केलेल्या कटर्सने किंवा कात्रीने छाटणी करून बुरशीनाशकाची फवारणी करावी. प्लेटमधून जमिनीकडे वाढलेल्या फांद्यांचा शेंडा कापला असता फांदीवर अधिक प्रमाणात फुटवे निघण्यास मदत होते.फळांची तोडणी झाल्यानंतर छाटणी लवकर करून घ्यावी.  
  •  पाणी व्यवस्थापन  

  • या पिकाची पाण्याची आवश्यकता खूप कमी प्रमाणात आहे. हिवाळा व उन्हाळ्यात नियमित अंतराने आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. परंतु पाण्याची मात्रा एका वेळेस खूप जास्त राहणार नाही याची दक्षता घ्यावी. 
  • योग्य वाढ झालेल्या बागेमध्ये एप्रिल-मे महिन्यामध्ये पाण्याचा ताण दिल्याने अधिक प्रमाणात फुलधारणा होण्यास मदत होते. फूल आणि फळधारणा ही पावसाच्या महिन्यात होते. सूक्ष्म सिंचनाचा अवलंब फायदेशीर ठरतो. 
  • खत व्यवस्थापन  

  •   लागवडीपूर्वी वाफे तयार करताना एका डांबाजवळील चार रोपांसाठी १० ते १५ किलो शेणखत आणि ५०-१०० ग्रॅम डीएपी चारही बाजूंना एकसारखे टाकावे. 
  • जमिनीच्या प्रकारानुसार खतांचे प्रमाण निश्‍चित करावे. राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेच्या प्रक्षेत्रावर खडकाळ जमिनीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी ५०० ग्रॅम नत्र, ५०० ग्रॅम स्फुरद आणि ३०० ग्रॅम पालाश या प्रमाणात चार भागांमध्ये वितरित करून पहिल्या व दुसऱ्या वर्षासाठी देण्यात आली. ८०० ग्रॅम नत्र,९०० ग्रॅम स्फुरद, ५५० ग्रॅम पालाश या मात्रेला सहा भागांमध्ये वितरित करून तिसऱ्या वर्षापासून फळांची तोडणी झाल्यानंतर, फुलधारणेपूर्वी, फुलधारणेपश्‍चात, फळधारणेच्या वेळी व फळांच्या वाढीच्या वेळी देण्यात आली. 
  • योग्य वाढ झालेल्या झाडांना दरवर्षी १५ ते २० किलो शेणखत द्यावे. ठिबकद्वारे विद्राव्य खते,सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत. 
  • फळधारणा 

  • १८ ते २४ महिन्यांच्या  लागवडीनंतर फूल आणि फळधारणा होण्यास सुरुवात होते. फुले आकाराने मोठी, पांढऱ्या रंगाची, आणि संध्याकाळी-रात्री उमलणारी असतात.  विविध अंतराने फुले आढळून येतात. फुले येण्याची वेळ पावसावर अवलंबून असते, जसा पाऊस सुरू होईल तशी फुले उमलण्यास सुरुवात होते. जूनपासून ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत फुले आढळून येतात. फळमाशीच्या नियंत्रणासाठी बागेत सापळे लावावेत.
  • परागीकरणापासून साधारणपणे एक ते सव्वा महिन्यात फळ तोडण्यास तयार होते. या पिकामध्ये फळ धारणा होण्याकरिता प्रभावी परागीकरण होणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी रोपण करताना मिश्र प्रजाती एकत्रितपणे लागवड केल्याने फायदेशीर ठरू शकते. हे फूल संध्याकाळी-रात्री उमलत असल्याने वटवाघूळ, होक पतंग, आणि मधमाशी इत्यादी पासून मुख्यतः परागीकरण होते. 
  •  - विजयसिंह काकडे, ७३८७३५९४२६ (राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती, जि.पुणे)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

    Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

    Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

    Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

    Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

    SCROLL FOR NEXT