Amla cultivation in forestry
महाराष्ट्रामध्ये आवळा लागवडीसाठी कृष्णा, कांचन, एनए-१० व एनए-७ या जातींची शिफारस आहे. जमिनीचा पोत व पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन आवळ्यामध्ये आंतरपिके घ्यावीत. आवळा हे भारतीय उपखंडातील सर्वांत महत्त्वाचे औषधी व आरोग्यवर्धक फळ आहे. आवळा फळ क जीवनसत्त्व आणि टॅनिनचा समृद्ध स्रोत आहे. फळांमध्ये सरासरी १०० ग्रॅममध्ये ७०० मिलिग्रॅम अस्कोर्बिक अॅसिड आणि लोह, प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. जमीन
हे फळझाड कोरड्या उप-उष्णकटिबंधीय, उष्ण व समशीतोष्ण हवामानात सर्व ठिकाणी येते. हा वृक्ष आकाराने मध्यम, कठीण, जास्त फांद्या असतात. साधारणपणे १० ते १५ मीटर उंच वाढते. जानेवारी ते मार्च महिन्यामध्ये पर्णपाती होते. फेब्रुवारी ते मार्च महिन्यात फांद्यांवर फुले येण्यास सुरुवात होते. जुलै-ऑगस्ट महिन्यांमधील उबदार हवामान फळांच्या वाढीस अनुकूल असते. लागवडीसाठी सुपीक चिकण मातीचे प्रमाण जास्त असलेली व पाण्याचा निचरा योग्य होणारी जमीन उत्तम असते. परंतु हे फळझाड विविध प्रकारच्या जमिनींमध्ये, कॅल्शिअमयुक्त जमीन आणि सामू ६ ते ९.५ असणाऱ्या जमिनीमध्ये वाढू शकते. चुनखडीयुक्त किंवा रेताड जमिनीत लागवड करू नये. बियांपासून तयार केली रोपे प्रामुख्याने रूटस्टॉक म्हणून कलमे तयार करण्यासाठी वापरली जातात. कारण बियांपासून तयार केलेल्या रोपांपासून आकाराने छोटी, कमी दर्जाची व खूप कालावधीनंतर फळे मिळतात. म्हणून व्यापारीदृष्ट्या लागवडीमध्ये ती वापरत नाहीत. देशी जातीपासून परिपक्व फळे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत गोळा केली जातात. फळे सावलीमध्ये सुकवून दाब देऊन बिया काढल्या जातात. एका फळामध्ये सरासरी सहा बिया असून, जवळ जवळ ३००-५०० बिया प्रति १० ग्रॅम असतात. बियांना १२ ते २४ तास पाण्यामध्ये किंवा ५०० पीपीएम जीए३ च्या द्रावणामध्ये २४ तास भिजवाव्यात. गादी वाफ्यावर वसंत ऋतू किंवा पावसाळी हंगामात, २ ते ३ सेंटिमीटर खोल बिया (दोन ओळींमध्ये १५ सेंमी अंतर ठेवून) पेरल्या जातात. ४० दिवसांनंतर पिशव्यांमध्ये रोपे भरली जातात. गादीवाफ्यावर किंवा रोपवाटिकेमध्ये पुरेशी सावली असावी. ६ ते ८ देशी आवळ्याच्या रोपावर मृदकाष्ठ किंवा ढाल पद्धतीने डोळे भरून कलमे तयार केली जातात. सुधारित जाती महाराष्ट्रामध्ये लागवडीसाठी कृष्णा, कांचन, एनए-१० व एनए-७ या जातींची शिफारस आहे. राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेमध्ये एनए-१० या जातीची लागवड यशस्वीरीत्या केली आहे.
जाती | वैशिष्ट्ये |
बनारसी | फळांचे वजन ४०-४५ ग्रॅम, साखरेचे प्रमाण १२.५ %, आम्लता १.५ %, फळांच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात ६५० मिलिग्रॅम ‘क’ जीवनसत्त्व असते. उत्पादन ३५-३८ किलो प्रति झाड. |
कृष्णा (एन.ए.-५) | फळांचे वजन ३५-४० ग्रॅम, साखरेचे प्रमाण ११.५ %, आम्लता १.४ %, १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात ४७५ मिलिग्रॅम ‘क’ जीवनसत्त्व असते. |
चकैया | फळांचे वजन ३०-३२ ग्रॅम, फळांच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात ५०० मिलिग्रॅम ‘क’ जीवनसत्त्व असते. उत्पादन ३० किलो प्रति झाड |
कांचन (एन.ए.-४) | फळांचे वजन ३०-३२ ग्रॅम, साखरेचे प्रमाण १० %, आम्लता १.४५ %. फळांच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात ५०० मिलिग्रॅम ‘क’ जीवनसत्त्व असते. |
आनंद-१ | फळाचे वजन ३५ ग्रॅम, जीवनसत्त्व ‘क’ ७७० मि.ग्रॅम प्रती १०० ग्रॅम असते. उत्पादन - ७०-८० किलो प्रति झाड |
आनंद-२ | फळाचे वजन ४५ ग्रॅम असते. जीवनसत्त्व ‘क’चे प्रमाण १०० ग्रॅम ला ७७५ मि.ग्रॅम असते. उत्पादन १००-१२५ किलो प्रति झाड |
बी.एस.आर.-१ | फळाचे सरासरी वजन २७.३० ग्रॅम. फळांमध्ये साखरेचे प्रमाण १८.१० %, जीवनसत्त्व ‘क’चे प्रमाण १०० ग्रॅमला ६२० मिलिग्रॅम. उत्पादन ४०-४५ किलो प्रति झाड. |
बलवंत (एन.ए.-१०) | फळाचे वजन ४० ग्रॅम, साखरेचे प्रमाण ९.९० %, आम्लता २.१७ %, जीवनसत्त्व ‘क’चे प्रमाण १०० ग्रॅम ला ५२८ मि.ग्रॅम असते. उत्पादन ४२ किलो प्रति झाड. |
जून ते जुलै महिन्यामध्ये लागवड केल्याने रोपांची उत्तम वाढ होते.लागवडीपूर्वी, उभी-आडवी खोल नांगरणी करून जमीन तयार करावी. ६० × ६० × ६० सेंमी आकाराचे खड्डे खोदून प्रत्येक खड्ड्यात १०-१५ किलो कुजलेले शेणखत, २५० ग्रॅम निंबोळी खत आणि २५० ग्रॅम एनपीकेचे मिश्रण (१९:१९:१९) मातीमध्ये मिसळून खड्डे भरून घ्यावेत.कठीण खडकाळ जमिनीमध्ये १ × १ × १ मीटर आकाराचे खड्डे यंत्राच्या साह्याने खोदून त्यामध्ये १:१:१ या प्रमाणात मूळ माती, काळी किंवा पोयटा माती आणि स्पेंट मशरूम सबस्ट्रेट यांचे मिश्रण भरल्याने कलमांची चांगली वाढ होते. लागवड ६ × ६ मी., ८ × ८ मी. किंवा ८ × ६ मी. अंतरावर करावी.लागवड करताना परागीभवन आणि जास्तीत जास्त उत्पादनाच्या हेतूने २:२:१ च्या गुणोत्तरामध्ये किमान तीन जातींची लागवड करावी. नवीन कलमे जगविण्यासाठी गरजेनुसार २० ते ३० लिटर पाणी प्रति झाड १० ते १५ दिवसांच्या अंतराने द्यावे. जून, जुलै महिन्यांत पाऊस नसेल तर बागेला पाणी द्यावे. उन्हाळ्यामध्ये १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. आंतरपिके घेतल्यास पाणी व खाते देण्याची विशेष गरज भासत नाही.जुलै महिन्यामध्ये पूर्ण शेणखत आणि अर्धी रासायनिक खताची मात्रा द्यावी. अर्धी रासायनिक खतांची मात्रा ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये पावसाचा अंदाज घेऊन द्यावी. खतांचा वापर केल्यानंतर (जानेवारी/फेब्रुवारी) प्रथम पाणी दिले जाते. फूलधारणेच्या कालावधीत म्हणजेच मार्चच्या-एप्रिलदरम्यान पाणी तोडावे. फळगळती कमी करण्यासाठी एखादे संरक्षित पाणी द्यावे. झाडाचे वय | शेणखत (किलो) | खताची मात्रा प्रति झाड |
नत्र (ग्रॅम) | स्फुरद (ग्रॅम) | पालाश (ग्रॅम) |
१ | ५ ते १० | ५० | ५० | ५० |
२ ते ४ | १५ ते २० | १०० | १०० | १०० |
५ ते ६ | २५ ते ३० | २०० | १५० | १५० |
७ व त्यापुढील | ३० ते ४० | ४०० | २०० | २०० |
( माहिती स्रोत : कृषी संवादिनी, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) फळ परिपक्वता आणि उत्पादन
कलमे केलेली झाडे लागवडीनंतर तिसऱ्या वर्षापासून फळे देण्यास सुरुवात करतात, तर बियांपासून लागवड केलेल्या झाडांना ६ ते ८ वर्षे लागतात. आवळ्याला मार्च-एप्रिल महिन्यात फुले येतात. फूल ते परिपक्व फळासाठी सामान्यपणे ५ ते ६ महिने लागतात. फळधारणा झाल्यानंतर फळे सुप्तावस्थेत जातात. या काळात कोणत्याही प्रकारची आंतरमशागत करू नये. मृगाचा पाऊस पडल्यानंतर फळाची वाढ होण्यास सुरुवात होते.तोडणी हंगाम तोडणीचा हंगाम जातिपरत्वे सप्टेंबरपासून डिसेंबरपर्यंत चालतो. चांगली तयार झालेली फळे काढावीत.फळे आकडीने किंवा बांबूने हलवून काढावी लागतात. तोडणीच्या विलंबामुळे काही जातींच्या बाबतीत फळे मोठ्या प्रमाणात गळतात. तोडणी सहसा दिवसाच्या लवकर किंवा उशिरा करावी. पूर्ण वाढलेल्या १० वर्षांपुढील झाडापासून १०० ते १२० किलो फळे मिळतात. हेक्टरी १५ ते २० टन उत्पादन मिळते. आकारानुसार फळांचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते. मोठ्या आकाराची फळे मुख्यतः कँडीसाठी वापरतात. लहान आकाराची च्यवनप्राश आणि त्रिफळा तयार करण्यासाठी वापरतात. उरलेली फळे पावडर आणि शाम्पू बनवण्यासाठी वापरतात. -विजयसिंह काकडे (उद्यान विद्या), ७३८७३५९४२६ - संग्राम चव्हाण (वनशेती), ९८८९०३८८८७ (राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती)