
Parbhani News : लेक जाऊ नको म्हणत व्हता शेतात.पण दम निघत नव्हता. सव्वा एकरावरील समद सोयाबीन वाहून गेलं, मातीबी खरडून गेली. एवढा पाऊस अन् इतके नुकसान आजपातोर कव्हाच झाल नाही बघा... अशी व्यथा कासापुरी (ता.पाथरी) मंडलातील पाथरगव्हाण येथील जानकीबाई घांडगे यांनी मांडत असताना त्यांचे डोळे पाणावले.
अशीच काहीशी अवस्था मुसळधार पावसामुळे अवघ्या काही तासांत होत्याचे नव्हते झालेल्या कासापुरी मंडलातील असंख्य शेतकऱ्यांची झाली आहे. सोयाबीन, कपाशी, ऊस, केळी, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान तर झालेच शिवाय मातीचा सुपीक थर खरडून गेला. जमीन नापिक झाल्याचे खूप मोठे दुखः आहे अशी व्यथा बाधित शेतकऱ्यांनी ‘अॅग्रोवन’शी बोलताना मांडली.
जानकीबाई घांडगे यांनी त्यांची जमीन बटईने कसायला दिलेली आहे. मुसळधार पावसामुळे झालेल्या पीकहानीची इतर शेतकऱ्यांप्रमाणे जानकीबाई यांच्या पिकाचेही अतोनात नुकसान झाले आहे. त्या पीकहानी बद्दल सांगताना जानकीबाईना गलबलून आले.
परभणी जिल्ह्यातील कासापुरी मंडलात जून महिन्यात जुलै महिन्यात सरासरी २१३ मिमी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४६७.५ (२१९.५ टक्के) पाऊस झाला.
जून व जुलै महिन्यात सरासरी ३६७.५ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना यंदा प्रत्यक्षात ५८७.९ मिलिमीटर (१५९.९ टक्के) पाऊस झाला. १७ ते २७ जुलै या १० दिवसांत १७ जुलै रोजी ८८.५.मिलिमीटर, २२ जुलै रोजी २१५ मिलिमीटर तर २७ जुलै रोजी ८८.८ मिलिमीटर या ३ दिवशी अतिवृष्टी झाली.त्यातही २२ जुलै रोजी अवघ्या ३ ते ४ तासांत मुसळधार पाऊस झाला. मुसळधारमुळे आलेल्या पुराचे पाणी ओढे, नाल्यांच्या पात्रात मावले नाही.
पात्रातील झाडे-झुडपांमुळे अडखळलेला पाण्याचा वेगवान प्रवाह धुरे, बांध फोडून शेतात शिरला. त्यासोबत पुरापासून संरक्षण करण्यासाठी लावले दगड कित्येक मीटर वाहून गेले. कपाशी, सोयाबीन, ऊस, केळी या पिकांच्या मुळ्या उघडल्या पडल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात वाळूचा थर जमा झाला आहे.
सखल भागातील पिके कित्येक तास पाण्याखाली राहिल्याने पाने सडली आहेत. अनेक शेतकरी पिकांतील पाणी सौरपंपाद्वारे उपसत आहेत. परंतु अतिवृष्टीनंतर दहा-बारा दिवस उलटले तरी शेतातून पाणी हटत नाही.
ठिबक, तुषार संचासह, अवजारे, आखाड्यावरील खते तसेच शेतीउपयोगी साहित्याचे नुकसान झाले. तत्काळ पंचनामे करावेत. पीकहानी, जमीन खरडून गेल्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल भरीव मदत द्यावी.कर्जमाफी करावी. पक्के शेतरस्ते तयार करावेत आदी बाधित शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत.
कासापुरी मंडळ खरीप २०२५ पीकपेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)
पीक...पेरणी क्षेत्र
सोयाबीन...३८६४
कपाशी...३७६७
तूर...५८५
मूग...१०३
उडीद...४४
बाजरी...४
कासापुरी मंडळ पाऊस स्थिती (मिलीमीटरमध्ये)
महिना...सरासरी पाऊस...प्रत्यक्ष झालेला पाऊस...टक्केवारी
जून...१३३.९...११७.३...८७.६
जुलै...२१३...४६७.५...२१९.५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.