Commodity purchase activities through farmer producer company 
कृषी सल्ला

शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रशासकीय कामकाज

शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेचा मूळ उद्देश सभासदांचे उत्पन्न वाढविणे हा आहे. कंपन्यांच्या कामकाजातील पारदर्शकतेसाठी उत्तम व मजबूत प्रशासनाची निर्मिती करणे आवश्यक असून यामध्ये भागधारकांचे हक्क सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

मिलिंद आकरे, हेमंत जगताप 

शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेचा मूळ उद्देश सभासदांचे उत्पन्न वाढविणे  हा आहे. कंपन्यांच्या कामकाजातील पारदर्शकतेसाठी उत्तम व मजबूत प्रशासनाची निर्मिती करणे आवश्यक असून यामध्ये भागधारकांचे हक्क सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे याकरिता शासनामार्फत विविध तरतुदी करण्यात येत आहेत. गेल्या दोन दशकांचा विचार केला, तर असे निदर्शनास येईल की, केंद्र व  राज्य शासनाच्या पातळीवर विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमार्फत निधी कर्जरूपाने उभारून शेतकरी कंपनी, सहकारी संस्था, महिला बचत गट व त्यांचे फेडरेशन अशा समुदाय आधारित संस्थांकरिता कर्ज घेऊन विविध योजना व प्रकल्पांची आखणी केलेली आहे. त्याचप्रमाणे या प्रकल्पांची व योजनांची अंमलबजावणी सुद्धा तितक्याच तीव्रतेने केली जाते. काही प्रकल्प निर्णय घेण्याच्या क्षमतेच्या कमतरतेमुळे अंमलबजावणीच्या दृष्टीने रखडले जातात.   ग्रामीण अर्थव्यवस्थेत सद्यःस्थितीत शेतकरी वर्गातील जे घटक दूरदृष्टीने विचार करून या प्रकल्पाचा फायदा घेतात, अशा घटकांमुळे शेतकरी वर्गाला नक्कीच फायदा झालेला आहे. नवीन संस्थांच्या/ कंपन्यांच्या प्रगतीसाठी बहुविध योजना, व्यापारातील विविध नियम, चिकाटी व सातत्य, व्यापारातील माहितीचे स्रोत, प्रशासकीय जोड देऊन संस्थेची उभारणी व व्यवस्थापन या विविध सूत्रांच्या माध्यमातून अशा समुदाय आधारित संस्थांची उभारणी तर झाली; परंतु प्रगतीच्या पुढील कक्षेत प्रवास करताना या संस्थांमार्फत जोरदार प्रयत्न करीत आहेत. त्यातील ज्या संस्थामधील संचालक मंडळी संस्था वाढीसाठी प्रयत्न करतात, त्यांना नक्कीच उशिरा का होईना यश येते. मात्र ज्या संस्थांमधील संचालक मंडळी स्वार्थापोटी संस्थाची निर्मिती करतात व शासकीय योजना मिळण्याच्या आशेने कामकाज करतात, अशा संस्थांचे आयुष्य योजनेपूरतेच मर्यादित असते, असे गेल्या बऱ्याच वर्षांच्या अनुभवावरून व अभ्यासावरून निदर्शनास आले आहे.   प्राथमिक स्तरावर शेतकरी कंपनीची संस्थात्मक रचना आजपर्यंत महाराष्ट्रात सुमारे ५२०० शेतकरी उत्पादक कंपन्यांची विविध प्रकल्प व  योजना यामुळे निर्मिती झालेली आहे. छोट्या शेतकऱ्यांना खते व शेतीमाल यांचा मोठा साठा नसल्याने खरेदी व विक्री दोन्ही वेळेस घाऊक किमतीचा फायदा होत नाही. शेतीमाल विक्रीच्या बाबतीत बाजारात पारदर्शकता नसल्याने ग्राहकाला मिळणाऱ्या किमतीत शेतकऱ्याचा वाटा अत्यंत कमी असतो. या उद्देशाने निर्मिती झालेल्या या सर्व कंपन्या पुढील अनेक वर्ष टिकाव धरून राहण्याच्या अनुषंगाने खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या कामकाजाची पद्धत समुदाय आधारित संस्थानी अवलंबिली पाहिजे.   शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेचा मूळ उद्देश शेतकरी उत्पादक तथा सभासद यांचे उत्पन्न वाढविणे त्याचप्रमाणे पर्यायी बाजारपेठेची निर्मिती करणे. परंतु सदयस्थितीत चांगल्या शेतकरी कंपनीची कामगिरी पाहून त्याचे अनुकरण न करता बऱ्याच शेतकरी कंपन्यांची निर्मिती अनुदान व तत्सम लाभासाठी होत आहे. परंतु ज्या शेतकरी कंपन्या प्रगतीच्या दृष्टीने सर्वसमावेशक असे कामकाज करताहेत त्यांना खरोखर दैनंदिन मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. याचाच एक भाग म्हणून आपण शेतकरी कंपनीचे संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कार्य व जबाबदारी समजावून घेऊयात.   शेतकरी उत्पादक कंपनीचे कामकाज व विविध प्रशासकीय बाबी या त्यातील नेमणूक केलेल्या वेगवेगळ्या स्तरावरील व्यवस्थापनातील व्यक्तींवर अवलंबून असते. यामध्ये संचालक मंडळ, संचालक मंडळातील संचालकांना दिलेले अधिकार व जबाबदाऱ्या, व्यवस्थापनातील प्रक्रिया, अंतर्गत नियम व तरतुदी, लेखापरीक्षण याचा समावेश आहे. शेतकरी कंपन्यांच्या कामकाजातील पारदर्शकतेसाठी उत्तम व मजबूत प्रशासनाची निर्मिती करणे आवश्यक असून यामध्ये भागधारकांचे हक्क सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी उत्पादक कंपनीचा कारभार / प्रशासन मुख्य:त तीन स्तरावर व्यवस्थापन विभागलेले असावे. 

  • सदस्य/ भागधारक/सभासद  
  • संचालक मंडळ 
  • मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)/ व्यवस्थापक / इतर अधिकारी
  • कंपनी ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तयार होते. कंपनीचा कारभार संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर मंडळीच्या मदतीने चालविला जातो. कंपनीच्या वतीने कंपनीचा कारभार हा वाटेल त्या व्यक्तीने निर्णय घेऊन चालविला जात नाही तर कंपनीचा समभाग खरेदी केलेले सभासद काही व्यक्तींना कंपनीचा कारभार/व्यवसाय चालविण्यासाठी नेमणूक करतात, या नेमणूक झालेल्या व्यक्तींच्या समूहाला संचालक मंडळ असे संबोधले जाते. या मंडळातील प्रत्येक व्यक्तीस “संचालक” असे म्हणतात.      सदस्य/ भागधारक/ सभासद 

  • शेतकरी कंपनीचे भाग (शेअर्स) संपादन करून क्लस्टर किंवा समूह यामधील व्यक्ती उत्पादक कंपनीचे भागधारक बनू शकतात, यांना कंपनीचे सभासद म्हणतात. परंतु ते असंख्य व विखुरलेल्या स्वरूपात असल्याने कंपनीच्या कामकाजात लक्ष घालू शकत नाही. म्हणूनच ते आपले प्रतिनिधी म्हणून संचालकांना निवडून देतात.   
  • दुसऱ्या प्रकारात सभासद म्हणजे एखादी व्यक्ती किंवा उत्पादक संस्था, की जो किंवा जी आपल्या पात्रतेने एखाद्या संस्थेचा वा कार्याचा भाग होऊ शकते. कंपनीच्या बाबतीत, सदस्यत्व निकष हे कंपनीच्या घटनेच्या लेखात परिभाषित केलेले असतात. हे सदस्य जे संस्थेचा भाग असतात व संस्थेच्या सेवांचा लाभ घेऊ शकतात.  
  • कंपनीचे भाग हे एक पेक्षा अनेक नावांवर घेऊ शकतात ज्याला “संयुक्त सदस्यता” म्हणतात. कंपनी कायद्यानुसार असे भाग हे कितीही लोक घेऊ शकतात. त्याला काहीही बंधन नाही. उदा. महिला बचत गट , त्याचे संघटन किंवा शेतकरी कंपनी  यांचे  इतर शेतकरी कंपनीचे भागभांडवल (शेअर्स) खरेदी करू शकतात.  
  • शेतकरी कंपनीची भागधारक संख्या वाढविणे हे महत्त्वाचे कार्य असून, याकरिता शेतकरी कंपनीमार्फत विविध सेवा शेतकऱ्यांना पुरवणे आवश्यक असून त्याद्वारे भागधारक संख्या वाढविणे सोपे होऊ शकते. यामध्ये प्रामुख्याने कृषी निविष्ठा पुरवठा, विक्री व्यवस्था, व्यवसाय उभारणी, अर्थ पुरवठा सेवा व शासकीय योजनांचे साहाय्य इत्यादी महत्त्वाच्या सेवा वितरणामुळे शेतकरी कंपनीकडे शेतकरी भागधारक म्हणून नोंदणी करू शकतात.   
  • कंपनीच्या सभासदांचे कामकाज सभासद किंवा सदस्य सर्वसामान्य समितीद्वारे/ सर्वसाधारण मंडळ खालील कार्य करतात आणि सदर कार्य समिती एकट्याने करू शकते, असे कार्य

  • अर्थसंकल्प मंजूर करणे आणि कंपनीची वार्षिक खाती व त्यावर संनियंत्रण करणे
  •  संरक्षक बोनस मंजूर करणे
  • बोनस समभाग वितरित करण्यास संमती देणे.
  •  लेखापरीक्षकाची नेमणूक करणे
  • लाभांश जाहीर करणे आणि लाभांशाच्या वितरणावर निर्णय घेणे;
  •  कंपनीच्या घटनेत (MoA/AoA) सुधारणा करणे  ;
  • विशेषत: घटनेत राखीव असलेल्या इतर कोणत्याही गोष्टीस मान्यता  किंवा त्यावर कारवाई करणे. 
  • कंपनीने निश्‍चित केलेल्या व्यवसायास सर्वोपतरी सहकार्य करणे. 
  • सर्वसाधारण बैठकीस उपस्थित राहणे व मुद्दे मांडणे. 
  • कंपनीचा वार्षिक खर्च पाहणे व मंजुरी देणे. 
  • कंपनीस व्यवसाय सुचविणे अथवा व्यवसायाच्या आर्थिक वृद्धीसाठी सूचना देणे. 
  • संचालकांच्या निवडीच्या दृष्टीने मत प्रदर्शित करणे/ अथवा सूचना देणे / मतदान करणे .
  • कंपनीच्या कामात गैरव्यवस्थापन/ गैरव्यवहार होत असल्यास ते सर्वांच्या/ संचालक मंडळाच्या निदर्शनास आणून देणे.  
  • शेतकरी कंपनीचे व्यवसाय

  • कृषी निविष्ठा विक्री व्यवस्थापन       
  • कृषी प्रक्रिया उद्योग 
  • धान्याची शासकीय व खासगी खरेदी       
  • कृषी अवजारे भाड्याने देणे 
  • अन्नधान्य, फळे व भाजीपाला विक्री व्यवस्थापन 
  • कृषी क्षेत्रातील बाजारपेठ माहितीचे वितरण 
  • कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान व नावीन्यपूर्ण प्रकल्पाची माहिती 
  • कृषी निविष्ठा खरेदीसाठी अर्थसहाय्याची  मदत
  • कृषी उत्पादनाचे संकलन व साठवणूक 
  • अन्नधान्यावर प्राथमिक प्रक्रिया जसे की  संकलन, प्रतवारी, वाळवणूक 
  • कृषी व संलग्न क्षेत्रातील इतर उद्योग जसे की पिकांची विक्री व्यवस्था, दुग्ध व्यवसाय, मासेपालन, कुक्कुटपालन इत्यादी.
  • वरील व्यवसायाचा ठोकताळा मांडताना आपल्याला विविध बाबी गृहीत धरणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकरी कंपनीने आपले व्यवसाय खाते खालील चार मोठ्या प्रकारात विभागून घेणे आवश्यक आहे. 

  • कृषी निविष्ठा खरेदी व विक्री व्यवस्थापन करिता लेखाविषयक खाते 
  • शेतीमाल संकलनासाठी लेखाविषयक खाते
  • शेतीमाल उत्पादन विक्रीसबंधीत लेखाविषयक खाते 
  • कार्यालयीन खर्च, उत्पन्न व भांडवली साहित्याबाबतचे खाते    
  • वेगवेगळ्या शेतकरी कंपन्या विविध प्रकारचे किंवा एकच शेतकरी कंपनी अनेक व्यवसाय उपक्रम राबवू शकतात. 
  • - प्रशांत चासकर, ९९७०३६४१३० (कृषी व्यवसाय व पणन तज्ञ, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

    Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

    Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

    Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

    Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

    SCROLL FOR NEXT