agriculture stories in Marathi, more opportunities in agriculture sector, Grab it 
कृषी प्रक्रिया

कृषी व्यवसायात भरपूर संधी, गरज योग्य निर्णयाची

नेमका कोणता कृषी व्यवसाय करता येईल? कसा करावा? बाजारपेठ कशी मिळवावी, या बाबत तरुणांच्या मनात शंका व संभ्रमावस्था असते. वेळीच योग्य तो निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आवश्यक ती व्यवसाय व्यवस्थापनाची कौशल्ये प्राप्त करणे गरजेचे आहे.

गोविंद हांडे

कृषी क्षेत्रात व्यवसायाला मोठा वाव आहे. कृषी विषयात शिक्षण घेतलेल्या व्यक्तींसोबत अन्य क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या व्यक्तीही यशस्वी कृषी उद्योजक झालेल्या दिसतात. मात्र, शेती आणि कृषी घटक आपल्या अवतीभवती पसरलेले असूनही नेमका कोणता कृषी व्यवसाय करता येईल? कसा करावा? बाजारपेठ कशी मिळवावी, या बाबत तरुणांच्या मनात शंका व संभ्रमावस्था असते. वेळीच योग्य तो निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आवश्यक ती व्यवसाय व्यवस्थापनाची कौशल्ये प्राप्त करणे गरजेचे आहे. कोणत्याही देशाच्या विकासाचा पाया म्हणून शेती क्षेत्राला पर्याय नाही, हे अगदी कोरोनाच्या काळातही स्पष्ट झाले आहे. गेल्या काही वर्षात नोकरदार, व्यावसायिक, सुशिक्षित तरुणांचा कृषी क्षेत्रात ओढा वाढत आहे. व्यावसायिक संधी म्हणून शेती व संलग्न व्यवसायांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. कृषी उत्पादनासाठी परकीय बाजारपेठेसह देशांतर्गत बाजारपेठही उपलब्ध होत आहे. बाजारपेठ व ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून योग्य व्यवसायाची निवड करणे गरजेचे आहे. भारताला निर्यातीतून प्रति वर्ष सुमारे एक लाख कोटी रुपये परकीय चलन मिळते. सध्या अनेक शेती उत्पादने आपण कच्च्या स्वरूपात निर्यात करतो आणि प्रक्रिया केलेला पक्का माल आयात करतो. हे चित्र बदलण्यास प्रचंड वाव आहे. प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी शासकीय पातळीवर (केंद्र व राज्य सरकारमार्फत) अनेक योजना आहे. तसेच निर्यातवृद्धीसाठी विविध योजना राबवल्या जातात. महाराष्ट्र राज्यात कृषी निर्यात धोरण राबविण्यात येत असून, राज्यात निर्यातीसाठी २१ क्लस्टर तयार केले आहेत. याद्वारे शेतीपासून ग्राहकापर्यंतची साखळी बळकट करणे शक्य आहे. या सर्व घटकांचा लाभ घेण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे. कृषी संलग्न व्यवसाय ः शेती क्षेत्रात कृषी संलग्न व्यवसायांमध्ये निर्यात, दुग्ध व्यवसाय, अन्नप्रक्रिया, रोपवाटिका, टिश्यूकल्चर, सेंद्रिय कंपोस्ट, जैविक खते, कीडनाशके, पॅकींग सामग्री, ठिबक सिंचन सुविधा, विविध प्रकारची शेती उपयोगी यंत्रे व त्यांची दुरुस्ती सेवा, शेडनेट, ग्रीनहाऊस, मल्चिंग पेपर, गनी बॅग, जूट पिशव्या, कोल्ड स्टोरेज, रायपनिंग चेंबर, पॅकिंग व ग्रेडींग युनिट, पेस्ट कंट्रोल, सौर यंत्रणा, पिकवण गृहे, साठवण गृहे, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, निर्यात सुविधा केंद्र, विविध प्रकारचे प्रकल्प अहवाल, कृषी सल्ला सेवा, याबरोबरच माती, पाणी, विषाणू, पौष्टिकता, भेसळ, टॉक्सिसिटी अशा विविध प्रकारच्या तपासणी प्रयोगशाळा, विविध प्रकारचे बाजार अभ्यास अहवाल निर्मिती इ.चा समावेश होतो. मार्केटींग व निर्यात ः शेतकरी ते ग्राहक या दरम्यानचे मध्यस्थ हटवून थेट शेतमाल पुरवठा केला तरी १० ते १५ टक्के अधिक फायदा होऊ शकतो. एकट्या शेतकऱ्याला हे थोडेसे अडचणीचे असले तरी गावातील शेतकऱ्यांना एकत्र आणून वा गटामार्फत यात खूप चांगले काम करता येऊ शकते. विक्री पद्धत व पॅकेजिंगमध्ये महत्त्वाचे बदल होत आहेत. ते लक्षात घेऊन ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आदी बहुराष्ट्रीय ऑनलाइन पोर्टलवरून विक्री करणे शक्य आहे. त्याबाबत माहिती मिळविणे गरजेचे आहे. प्रक्रिया ः प्रक्रिया हे उत्पन्नवाढीचे फार मोठे साधन आहे. अनेक उच्चशिक्षित तरुण ज्वारी, मका, रागी, सेंद्रीय डाळ अशा वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग उभे करून यशस्वीपणे वाटचाल करत आहेत. शेतीच्या ठिकाणी फक्त प्राथमिक प्रक्रिया केली तरी उत्पन्नात १० ते २० टक्के वाढ होते. सर्वप्रथम प्राथमिक आणि मग इतर मोठ्या प्रक्रियेकडे वळावे. ग्रामीण भागात प्रक्रियेसाठी खूप संधी आहेत. भाजीपाला प्रक्रियेत आपण खूप मागे आहोत. नवीन प्रक्रिया उद्योग सुरू करताना सर्व प्रमाणपत्रे, पॅकेजिंग, ब्रॅन्डिंगच्या अनुषंगाने काम करण्याची गरज आहे. सल्ला सेवा ः शेती व संलग्न व्यवसायातील नवीन लोकांना व्यावसायिक तत्त्वावर सल्ला, सेवा, मार्गदर्शन देण्याच्या विपुल संधी आहेत. धनिक लोकांना त्यांची शेती विकसित करण्यासाठी शेती व्यवस्थापकांची गरज असते. उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर यश मिळवून देणाऱ्या व्यक्तींची गरज भासते. त्यांच्यासाठी ते चांगली किंमत मोजायलाही तयार असतात. कृषी व्यवसायांना विशेषतः दुग्धव्यवसाय, अन्नप्रक्रिया, निर्यात या व्यवसायांमध्ये अधिक संधी आहेत. आपल्याला नक्की काय करायचंय हे आधी ठरविले पाहिजे. आपल्या भागातील अतिरिक्त उत्पादनांचे मूल्यवर्धन करणे, ही पहिली पायरी असू शकते. उपलब्ध गोष्टींचा पुरेपूर वापर केला व्यवसायात निश्चितच यश मिळू शकेल. ५ सप्टेंबरला मोफत वेबिनार शिक्षक दिनाच्या निमित्ताने शनिवारी (ता. ५) दुपारी ४ वाजता विविध कृषी व्यवसाय, त्यातील करिअरच्या संधी विषयावर मोफत ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केली आहे. त्यामध्ये भाग घेण्यासाठी पुढीलप्रकारे नोंदणी करावी. नोंदणी प्रक्रिया ः www.siilc.edu.in या संकेतस्थळाला भेट देऊन तिथे ‘रजिस्टर’ या टॅबला क्लिक करावे. त्यानंतर उघडणाऱ्या गुगल फॉर्ममध्ये माहिती भरून नाव नोंदणी करावी.

संपर्कः गोविंद हांडे, ९४२३५७५९५६ (लेखक  राज्य फलोत्पादन अभियानाचे मुख्य तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. )  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT