There are business opportunities in the agricultural sector
व्यावसायिक संधी म्हणून शेती व संलग्न बाबींकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. परकीय व देशांतर्गत बाजारपेठ प्रचंड मोठी आहे. बाजारपेठ व ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून योग्य दिशा निवडली तर शेती शेती क्षेत्रात विपुल संधी आहेत. जगाची फळे, भाजीपाल्याची मागणी वाढत आहे. भारताला सध्या वर्षाला सुमारे एक लाख कोटी रुपयांचे परकीय चलन निर्यातीतून मिळते. ज्वारी, बाजरी, भात या अन्नधान्यांची फार मोठी निर्यात होते, मात्र त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. सुमारे दीड लाख कोटींची शेती उत्पादने आपल्या ग्राहकांसाठी आयात केली जातात. यात तेलाची आयात मोठ्या प्रमाणात होते. दर वर्षी सुमारे ५००० कोटी रुपयांचा काजू निर्यात आणि ९००० कोटीचा काजू आयात केला जातो. मसाला पिकांची ४५०० कोटींची निर्यात आणि ६००० कोटींची आयात होते. कापसाची ६००० कोटी रुपयांची निर्यात होते आणि तेवढाच आयातही केला जातो. आपण साधा कापूस निर्यात करतो आणि वैद्यकीय कापूस आयात करतो. अनेक शेती उत्पादने आपण कच्च्या स्वरूपात निर्यात करतो आणि प्रक्रिया केलेला पक्का माल आयात करतो. हे चित्र बदलण्यास मोठी संधी आहे. निर्यातवृद्धीसाठी विविध योजना
केंद्र व राज्य सरकारच्या निर्यातवृद्धीसाठी विविध योजना आहेत.महाराष्ट्राने निर्यातीसाठी २१ क्लस्टर केले आहेत. विपणन, प्रक्रिया, इ मार्केटिंग, इ ट्रेडिंग व निर्यातीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. स्मार्ट योजना आहे.विविध पिकांच्या निर्यातवृद्धीसाठी क्लस्टर निहाय काम सुरू आहे. अपेडा, इतर अनेक संस्था शेतकरी आणि कृषी व्यावसायिकांसाठी कार्यरत आहेत.फलोत्पादक राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्राची आता रसायन अवशेषमुक्त द्राक्ष उत्पादक राज्य म्हणून नवी ओळख होत आहे.डाळिंब, संत्रा, मोसंबी, लिंबू, केळी आदी फळपिके व भाजीपाला पिकांचे द्राक्षाच्या धर्तीवर काम सुरू आहे. याचा शेती संबंधित सर्वच व्यवसायांना उपयोग होणार आहे. बहुउपयोगी सुविधा उपलब्ध होत आहेत.उत्पादकांनी आता प्रक्रिया, विपणन व व्यापारात येण्याची गरज आहे. शेतीपासून ग्राहकापर्यंतची साखळी बळकट करावी लागणार आहे. ग्राहकांची मानसिकता ग्राहकांना अन्न सुरक्षा हवी आहे, रसायन अवशेषमुक्त शेतमाल पाहिजे. आरोग्य हीच संपत्ती या नजरेने ग्राहक शेती उत्पादकांकडे बघत आहे. गुणवत्तेबरोबरच सुरक्षेची हमी दिली तर शेतमालास चांगला दर मिळू शकेल. त्यासाठी उत्पादन पद्धतीत बदल करावा लागणार आहे. प्रमाणीकरण
ग्राहक किंवा बाजारपेठ कागदपत्रांवर विश्वास ठेवते. पूर्वी फक्त युरोपीय देश शेतमालाच्या गुणवत्तेच्या हमीचे ग्लोबल गॅप प्रमाणपत्र मागत होते, आता सर्व देश मागतात. बाजारपेठ कोणतीही असो शेतमालाचे प्रमाणीकरण करून व्यापार करणे गरजेचे आहे. सेंद्रिय किंवा रसायन अवशेषमुक्त उत्पादन पद्धती, त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा, प्रक्रिया या सर्वांना सुरक्षितता प्रमाणपत्र गरजेचे झाले आहे. गुणवत्तेची हमी देणाऱ्या या सर्व गोष्टी असतील तर ग्राहक किंमत पाहत नाही.चांगल्या दर्जाच्या निविष्ठा, साठवणूक, वाहतूक, तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे. या सर्वांचा एकत्रित उपयोग करून एकात्मिक दृष्टिकोन ठेवावा लागेल. शेतकरी आणि बाजारपेठेतील दरी भरून काढण्याची गरज आहे. असे केले तर येत्या पाच-सहा वर्षांमध्ये आपण कोणतीही बाजारपेठ काबीज करू शकतो. व्यवसायाकडे वळताना शेतकऱ्यांनी शासनाच्या योजना काय आहेत हे पाहून शेती करण्यापेक्षा बाजारपेठेला काय हवे आहे, हे विचारात घेऊन शेती करण्याची करायची गरज आहे. नाशिकच्या विलास शिंदे यांनी पंधरा वर्षापूर्वी शून्यातून सुरुवात केली. आता त्यांची सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी कोट्यावधीची उलाढाल करत परिवर्तन घडवत आहे. शेतीकडे व्यवसाय म्हणून वळल्यानंतर अपयशी ठरणाऱ्यांमध्ये अनुदान किंवा ऐकीव गोष्टींवर त्याकडे वळलेल्यांची संख्या मोठी आहे. कमी जागेत जास्त उत्पादन घेणे, नवनवीन तंत्रज्ञान वापरणे हे खर्चीक आहे, पण बाजार असेल तर खर्च करण्यात हरकत नसावी. कृषी संलग्न व्यवसाय शेतीसाठी विविध प्रकारचे बियाणे, खते, औषधे शेतकऱ्यांना आवश्यक असतात. शेतकऱ्यांना ग्राहक म्हणून आवश्यक असलेल्या गोष्टींचा पुरवठा करण्याच्या कृषी संलग्न व्यवसायांना मोठा वाव आहे.
रोपवाटिका, टिश्यूकल्चर, सेंद्रिय कंपोस्ट, जैविक खते, कीडनाशके, पॅकिंग सामग्री, ठिबक वगैरे सिंचन सुविधा, विविध प्रकारची शेती उपयोगी यंत्र, अवजारे व त्यांची दुरुस्ती सेवा.शेडनेट, फोम नेट, ग्रीनहाऊस, मल्चिंग पेपर, गनी बॅग, जूट पिशव्या, कोल्ड स्टोरेज, रायपनिंग चेंबर, पॅकिंग व ग्रेडींग युनिट, पेस्ट कंट्रोल, सौर यंत्रणा, पिकवण गृहे, साठवण गृहे, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, निर्यात सुविधा केंद्र.विविध प्रकारचे प्रकल्प अहवाल, कृषी सल्ला सेवा, माती, पाणी, विषाणू, पौष्टिकता, भेसळ, टॉक्सिसिटी तपासणी प्रयोगशाळा, विविध प्रकारचे बाजार अभ्यास अहवाल निर्मिती आदी क्षेत्रात संधी.शेतकरी ते ग्राहक या दरम्यानचे मध्यस्थ हटवून थेट शेतमाल पुरवठा केला तरी १० ते १५ टक्के जास्त फायदा होतो. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन, गटामार्फत यामध्ये संधी.विक्री पद्धत व पॅकेजिंगमध्ये महत्त्वाचे बदल होत आहेत. पॅकिंगसाठी कागदाची जागा आता क्रेट, पनेट घेत आहेत.अमेझॉन, फ्लिपकार्ट आदी बहुराष्ट्रीय ऑनलाइन पोर्टलवरून विक्री होते. काही दोष असेल तर ग्राहकांना उत्पादन बदलून दिले जाते.देशातील एकूण द्राक्ष निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा ९८ टक्के आहे. केळीची निर्यात ४ कोटी वरून २०७ कोटीपर्यंत वाढली आहे.लिंबूवर्गीय फळांच्या निर्यातीसाठी सिट्रसनेट प्रणाली सुरू झाली आहे. देशातून ४४ हजार टन संत्रा निर्यात होतो, त्यात महाराष्ट्राचा वाटा फक्त १,१९२ टनांचा आहे. देशाच्या ६१ हजार टन नैसर्गिक मध निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा फक्त १ टक्के आहे.संत्रा, कलिंगड आदी सर्वच फळांच्या निर्यातीस मोठी वाव आहे. अद्यापही कडधान्य, मका, ज्वारी, हरभरा आदी अनेक पिके निर्यातीच्या दृष्टीने दुर्लक्षित आहेत.प्रक्रिया हे उत्पन्नवाढीचे फार मोठे साधन आहे. अनेक उच्चशिक्षित तरुण ज्वारी, मका, रागी, सेंद्रिय डाळ अशा प्रकारचे उद्योग उभे करून यशस्वीपणे वाटचाल करत आहेत.शेतीच्या ठिकाणी फक्त प्राथमिक प्रक्रिया केली तरी उत्पन्नात १० ते २० टक्के वाढ होते. सर्वप्रथम प्राथमिक आणि मग इतर मोठ्या प्रक्रियेकडे वळावे. भाजीपाला प्रक्रियेत आपण खूप मागे आहेत.नवीन प्रक्रिया उद्योग सुरू करताना सर्व प्रमाणपत्रे, पॅकेजिंग, ब्रॅन्डिंगच्या अनुषंगाने काम करण्याची गरज आहे.शेतीविषयक व्यवसायांनी बॅंकांमार्फत कर्ज उपलब्ध होते, मात्र त्यासाठी प्रस्ताव तयार करताना पुढील पाच वर्षाच्या अनुषंगाने लागणाऱ्या सुविधांसाठीच्या खर्चाचा समावेश प्रकल्प खर्चात करायला हवा.तात्पुरता विचार करून कर्ज घेतले आणि पुढे काही नवीन करायची वेळ आली तर आर्थिक समस्या उद्भवते.शेती व संलग्न व्यवसायांतील अनुभवी व्यक्तींना व्यावसायिक तत्त्वावर सल्ला, सेवा, मार्गदर्शन करण्याची संधी.उत्पादनापासून विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर यश मिळवून देणाऱ्या व्यक्तींची गरज भासते आणि त्यांच्यासाठी चांगली किंमत मोजण्याची अशा व्यक्ती, संस्थांची तयारी असते.अपेडा, नाबार्ड अशा अनेक संस्था कृषी व्यावसायिक व उद्योजकांसाठी विश्वासाहार्य नेटवर्क उभारत आहेत. ग्राहक चांगली उत्पादने, उद्योजक, शेतकऱ्याच्या शोधात आहेत. त्यांच्यापर्यंत तुमची माहिती योग्य पोहोचली पाहिजे.व्यवसायाला नाव देणे, त्याचं बोधचिन्ह तयार करणे, विविध ठिकाणी नोंदणी करणे, विविध संस्थांशी व्यावसायिक संबंध जोडणे, वेबसाइट असणे हितकारक ठरते. आयकर विवरण पत्र व गुणवत्ताविषयक कागदपत्रे व्यवसाय, संस्थेची विश्वासाहार्यता वाढवतात. संपर्क- गोविंद हांडे, ९४२३५७५९५६ (लेखक राज्य फलोत्पादन अभियानाचे मुख्य तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.)