सुर्डी गावाने जलसंधारणाची केलेली कामे.
सुर्डी गावाने जलसंधारणाची केलेली कामे. 
ग्रामविकास

पाण्याच्या स्वंयपूर्णतेकडे सुर्डीची यशस्वी वाटचाल !

Sudarshan Sutaar

गावरस्ते, स्वच्छता, शोषखड्डे, वृक्षारोपण, आरोग्यपत्रिकेसह विविध कामांत आघाडी घेत एकेकाळी दुष्काळ सोसणाऱ्या सुर्डी गावाने (जि. सोलापूर) पाण्याबाबत स्वयंपूर्ण होण्याकडे मजल मारली आहे. यंदा पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत या गावाने राज्यात पहिला क्रमांक मिळवला. जुन्या व नव्या स्रोतांच्या माध्यमातून एकावेळेस जवळपास ३० कोटी लिटर पाणी साठू शकेल एवढी क्षमता गावाने तयार केली आहे. एकीच्या बळावर मिळवलेले यश अन्य गावांसाठी निश्‍चित प्रेरणा देणारे ठरले आहे.   सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातील सुर्डी हे वैराग-माढा महामार्गावरील ऐतिहासिक गाव आहे. गावच्या मध्यभागी साधारण १७ व्या शतकातील निंबाळकर संस्थानिकांचा वाडा पाहायला मिळतो. चार रुबाबदार बुरुजांसह सात पिढ्यांची कहाणी हा वाडा उराशी बाळगून आहे. शिवाय १२ व्या शतकातील विरगळही इथे पाहायला मिळते. गावातील शूरवीरांचा इतिहास या माध्यमातून अद्याप जीवंत असल्याचे दिसते. सुर्डी गाव दृष्टिक्षेपात

  • गावचे क्षेत्रफळ २४०० हेक्टर. लोकसंख्या ३३३७.
  • सर्वाधिक ८१० हेक्टर रब्बीचे क्षेत्र.
  • सर्वाधिक कांदा, भाजीपाला पिके.
  • पावसावर शेतीचे ठरते मुख्य भवितव्य
  • दुष्काळ हटविण्यासाठी पुढाकार सर्वसाधारणपणे कमी पाऊसमान झाला की दुष्काळ हमखास ठरलेला. दर एक-दोन वर्षांतून पिण्याच्या पाण्याचा टँकर आणि जनावरांच्या पाण्याची आबाळ ठरलेली. ही परिस्थिती बदलण्यासाठी गावची प्रमुख मंडळी एकत्र आली. यात सरपंच सौ. सुजाता डोईफोडे, उपसरपंच अण्णासाहेब शेळके, विनायक डोईफोडे, मधुकर डोईफोडे, मोहन शेळके, महावीर शेळके, दाजी शेळके, संतोष शेळके, प्रमोद शेळके, अभिनंदन शेळके, बालाजी शेळके, अनिल शेळके, सना शेख, मुमताज मुलाणी, सुशिला कसबे, ग्रामसेवक पांडुरंग कागदे, काकासाहेब राखुंडे आदींचा समावेश होता. पाणी फाउंडेशन संस्थेनेही मदतीचा मोठा हात दिला. पाणीप्रश्‍नाला प्राधान्य गावातील रस्ते, वीज, स्वच्छता या कामांसाठी ग्रामपंचायतीचा पहिल्यापासूनच सक्रिय सहभाग आहे. बहुतेक सर्व रस्ते सिमेंटचे आहेत. स्वच्छता आहे. विजेची सोय आहे. केवळ पाण्यासाठीच वणवण होती. त्यामुळे गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतीने पाण्याच्या कामाला प्राधान्य दिले. त्यादृष्टीने एकीची मोट बांधण्याचे काम सुरू झाले. काम मोठे होते. आर्थिकदृष्ट्या आवाक्याबाहेरील होते. सुरवातीला गावकऱ्यांना जल अभियानात सहभागी करून घेताना काही अडचणी आल्या. मात्र प्रबोधन, जागृती याद्वारे त्यावर मात करण्यात यश मिळाले. खास ग्रामसभा घेऊन गावकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. काही निर्णयही घेण्यात आले. प्रत्येकाची मदत ठरली मोलाची गावकऱ्यांनी नफ्यातील १० टक्के हिस्सा कामांना दिला. पाण्याचा नियंत्रित वापर करताना ठिबक-तुषार संचाचा वापर, वृक्षलागवड, चराईबंदी, कुऱ्हाडबंदीसारखे निर्णय घेण्यात आले. अनेक कुटुंबांनी घरातील काही शिल्लक रक्कम वापरून, वाढदिवस आदींवरील खर्च टाळून आपापल्या परीने मदत केली. त्यातून तब्बल ६० लाख रुपये वर्गणी जमा झाली. पाणीवापरात काटकसर गावात पूर्वी ठिबक, तुषार सिंचनाखालील क्षेत्र नगण्य होते. गेल्या सहा महिन्यांत मात्र त्याचा वापर अधिक वाढला आहे. शिवाय मल्चिंग, बायोमास या माध्यमातून ४३७.१९ हेक्टरवर संरक्षित पाण्याचा वापर होऊ लागला आहे. ८०४ शेतकऱ्यांकडे जमीन आरोग्यपत्रिका जमिनीच्या आरोग्याकडेही शेतकऱ्यांनी लक्ष दिले आहे. त्यातूनच गावातील १५७० खातेदार शेतकऱ्यांपैकी ८०४ शेतकऱ्यांनी आरोग्य पत्रिका तयार करून घेतली आहे. रब्बी हंगामासह फळबागा व भाजीपाला क्षेत्रासाठी त्याचा उपयोग होणार आहे. तसेच जमिनीचा प्रकार, त्यातील उपलब्ध घटकांची माहिती त्याद्वारे मिळत आहे. स्वच्छता आणि शोषखड्डे प्रमुख रस्त्यावरींल स्वच्छतेसह घरांतील सांडपाणी रस्त्यावर सोडले जाऊ नये यासाठी शोषखड्डे घेण्यात आले. त्याचा उपयोग आरोग्यासाठी झाला. दुर्गंधीही दूर झाली. सुमारे ७५७ कुटुंबांपैकी ६०७ कुटुंबांनी शोषखड्डे घेतले आहेत. झाडांची लागवड पर्यावरणाची काळजी घेताना वृक्षलागवडीवर भर दिला असून, विविध प्रकारच्या १९०० पर्यंत झाडांची लागवड झाली आहे. महत्त्वाचे रस्ते तसेच घरांसमोर लागवड झालेल्या या झाडांची जोपासनाही सुरू आहे. तीस कोटी लिटरची साठवणक्षमता गावच्या उत्तरेला माथ्यावर कामे झाली. लोकसहभागातून १३ पाझर तलाव, ११ सिमेंट नाला बंधारा आणि २४ मातीनाला बांधांची दुरुस्ती झाली. कंपार्टमेंट बंडिंग, मातीनाला बांध, सीसीटी, कंटूर पद्धतीची खोदाईची कामे, विहिर पुनर्भरण, एलबीएस, गॅबियन पद्धतीच्या कामांचा समावेश राहिला. सुमारे १८ लाख ७० घनमीटर खोदाई झाली. यंत्राच्या साह्याने दोन कोटी ५२ लाख ८०२ घनमीटर काम झाले. यातून पाऊस झाल्यास एकाचवेळी ३० कोटी लीटर पाणी साठू शकेल एवढी क्षमता तयार झाली. राज्यस्तरीय ७५ लाखांचे बक्षीस मोठ्या क्षमतेने आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने झालेल्या कामांचे तब्बल ७५ लाख रुपयांचे बक्षीस गावाला पाणी फाउंडेशनतर्फे मिळाले. राज्य शासन आणखी ७५ लाख रुपये देणार आहे. त्यातून दीड कोटी रुपये गावाला मिळतील. त्यातून पुन्हा पाण्याच्या कामांवरच भर देण्यात येईल. हा पुरस्कार म्हणजे कष्टाला मिळालेली दाद, ऊर्जा आणि प्रेरणाही आहे अशी गावकऱ्यांची भावना आहे. प्रतिक्रिया  रस्ते, वीज, पाणी यांच्याबरोबर आम्ही गावच्या पाणीप्रश्‍नावर मार्ग काढला. यामध्ये सर्वाधिक लोकसहभाग महत्त्वाचा ठरला. -सौ. सुजाता डोईफोडे सरपंच, सुर्डी गावकऱ्यांच्या एकीचे फळच मिळाले. यापुढेही पाण्यावरच काम करणार आहोत. -अण्णासाहेब शेळके, उपसरपंच   गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळ सहन केला. पाण्याबाबत जागरूकता होती. मार्ग मिळाला आणि ग्रामस्थांच्या सहभागातून तेही काम यशस्वी झाल्याचे समाधान वाटते. -मधुकर डोईफोडे, ग्रामस्थ, सुर्डी पाण्याबाबत स्वयंपूर्ण होत आहोत. यापुढेही आणखी जोमाने काम सुरू ठेवू. -विनायक डोईफोडे, ग्रामस्थ   संपर्क- मधुकर डोईफोडे- ९८५०७३०२०९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

    Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

    Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

    Horticulture : ‘कोठली’ला मिळाला बागायती चेहरा

    Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

    SCROLL FOR NEXT