Marigold Cultivation Agrowon
फूल शेती

झेंडू लागवडीसाठी योग्य नियोजन आवश्यक

योग्य बाजारभाव मिळविण्यासाठी आणि सण-समारंभाच्या काळात फुलांचे उत्पादन मिळेल याप्रमाणे झेंडू लागवडीची वेळ ठरवावी.

Team Agrowon

झेंडूच्या फुलांना सण-समारंभात चांगली मागणी असल्यामुळे फुलशेेतीमध्ये झेंडुला (Marigold) महत्त्वाचे स्थान आहे. झेंडूची लागवड वर्षभर म्हणजे सर्व हंगामात करता येते. परंतु योग्य बाजारभाव मिळविण्यासाठी आणि सण-समारंभाच्या काळात फुलांचे उत्पादन मिळेल याप्रमाणे लागवडीची वेळ ठरवावी. लागवडीपासून साधारणतः अडीच ते तीन महिन्यात फुलांचे उत्पादन मिळण्यास सुरुवात होते त्यानूसार लागवडीचे नियोजन करावे.

फुलशेतीमध्ये झेंडू हे मुख्य पीक म्हणून घेतले जाते. तसेच भाजीपाला व फळपिकांमध्ये सूत्रकृमी नियंत्रणासाठी झेंडूचे मिश्रपिक घेतले जाते. राज्यात प्रामुख्याने पुणे, नाशिक, नगर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, परभणी, औरंगाबाद, नांदेड, अकोला, नागपूर या जिल्ह्यांत झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.

झेंडू पिकासाठी जमीन कशी असावी?

झेंडू पिकासाठी उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६ ते ७.५ असावा. हलकी ते मध्यम जमीन या पिकास पोषक आहे. भारी जमिनीत पिकाची वाढ चांगली होत असली तरी उत्पादन कमी मिळते. उष्ण आणि समशीतोष्ण हवामान असेल तर झेंडूची वर्षभर लागवड करता येते. थंड हवामानात हे पीक चांगले येते. दर्जेदार फुलांचे उत्पादन मिळते. जास्त पावसाचा परिणाम फुलांच्या वाढीवर होतो.

झेंडुच्या प्रमुख जाती कोणत्या?

झेंडूच्या झाडाची उंची, वाढीची सवय आणि फुलांचा आकार यावरुन झेंडूच्या जातींचे आफ्रिकन आणि फ्रेंच या दोन प्रकारांत वर्गीकरण करता येते.

आफ्रिकन झेंडू ः या प्रकारातील झेंडूची झाडे १०० ते १५० सें. मी. उंच वाढतात. फुले टपोरी असून फुलांना केशरी आणि पिवळ्या रंगाच्या छटा असतात. या प्रकारातील फुले हारांसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जातात. आफ्रिकन झेंडूमध्ये कॅकरजॅक, आफ्रिकन टॅाल डबल मिक्स्ड, यलो सुप्रिम, गियाना गोल्ड, पाई, आलास्का, पुसा बसंती गेंदा या प्रमुख जाती आहेत.

फ्रेंच झेंडू ः या प्रकारातील झाडे बुटकी ३० ते ४० सें. मी. उंचीची आणि झुडूपासारखी वाढतात. फुलांचा आकार लहान ते मध्यम असून रंगात मात्र विविधता असते. फ्रेंच झेंडूमध्ये स्प्रे बटर लेमन ड्रॅाप्स, फ्रेच डबल मिक्स्ड, अर्का बंगारा या प्रमुख जाती आहेत.

लागवड कशी करावी?

झेंडूची लागवड बी पेरुन किंवा रोपं लावून करता येते. २ बाय १ आकाराच्या गादीवाफ्यावर रोपे तयार करावीत. रोपे तयार करणे शक्य नसल्यास खात्रीच्या ठिकाणाहून रोपे आणावीत. पाच ते सहा पाने आलेली रोपे निवडावीत. ३ ते ४ आठवड्यांच्या रोपांची लागवड करावी. लागवडीपुर्वी जमीन हलकी नांगरुन नंतर २० ते २५ गाड्या शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे. सपाट वाफे अथवा सरी वाफे तयार करावेत. त्यात रोपं लावावीत. जातीनूसार तसेच हंगामानुसार झेंडूची लागवड ४५ बाय ३० सेमी किंवा ६० बाय ३० सेमी अंतरावर करावी. प्रत्येक ठिकाणी निवडक एकच रोप ठेवावे.

खते आणि पाणी व्यवस्थापन

फुलांचे एकसारखे आणि भरपूर उत्पादन मिळण्यासाठी झेंडूला वरखते देणे आवश्यक आहे. संपूर्ण स्फुरद व पालाश आणि अर्धे नत्र लागवडीच्या वेळी आणि उर्वरित अर्धे नत्र लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे. हेक्टरी ६० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश या प्रमाणात खते देऊन झाडाला मातीची भर द्यावी. पावसाळ्यात आवश्यकतेनूसार १५ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. झाडांना कळ्या आल्यापासून तोडणी संपेपर्यंत पाण्याचा ताण पडू देऊ नये. याच काळात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी देऊ नये.

फुलांची काढणी व उत्पादन

लागवडीपासून साधारणपणे अडीच ते तीन महिन्यात फुलांचे उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. जून महिन्यात लावलेल्या झेंडूच्या फुलांची तोडणी ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात सुरु होते. पूर्ण उमललेली फुले देठाजवळ तोडून वेचणी करावी. हारांसाठी देठविरहीत फुले तसेच गुच्छ किंवा फुलदाणीसाठी फुले देठासह तोडावीत. तोडणी दुपारनंतर करावी. तोडलेली फुले सावलीत गारव्याला ठेवावीत. योग्य काळजी घेतल्यास हेक्टरी ७ ते १० टनापर्यंत उत्पादन मिळते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT