सातारा जिल्ह्यातील सांगवी येथील सचिन मारुती शिर्के या अभियंत्याने निशिगंध, झेंडू व जरबेरा या फुलांच्या उत्पादनात सुमारे १२ ते १५ वर्षांपासून प्रयत्नपूर्वक सातत्य ठेवले आहे. शेडनेट, पॉलिहाउस व खुल्या पद्धतीने बारमाही उत्पादन घेत बारामती व फलटण येथील फूल व हार विक्रेत्यांची सक्षम बाजारपेठ विकसित केली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात सांगवी हे विहिरी, कॅनॉल या रूपाने बागायत झालेले गाव आहे. ऊस व भाजीपाला ही पिके येथे घेतली जातात. गावातील सचिन मारुती शिर्के हे अभियांत्रिकी शिक्षण (बीई केमिकल्स) घेतलेले प्रगतिशील शेतकरी आहेत. त्यांचे वडील शिक्षक असून त्यांनी पाच एकर शेती घेतली होती. सचिन यांना शेतीची आवड असल्याने शिक्षणानंतर त्यांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीच करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काळात ऊस व भाजीपाला ते घेत. दरांतील अस्थिरतेमुळे आर्थिक गणिते जुळत नव्हती. विक्री व्यवस्थेत अडचणी येत होत्या. सन २००७ मध्ये वडिलांचे मित्र जरंडे गुरुजी यांची निशिगंध फुलांची शेती पाहण्यात आली. या शेतीचा सर्वांगीण अभ्यास सचिन यांनी केला. ती आश्वासक वाटली. आपणही हा प्रयोग करून पाहावा असे ठरवले. फुलशेती बहरली जरंडे गुरुजींकडून २४ पोती कंद आणून २००७ मध्ये एक एकर क्षेत्रात जूनमध्ये एक एकरांत जरबेराची लागवड केली. खते, कीडनाशके व्यवस्थापन सुधारले. सुरुवातीपासूनच फुलांची बाजारपेठ तयार करण्यास सुरुवात केली. सांगवी हे गाव फलटण व बारामती यांच्या मध्यभागी असून दोन्ही शहरे सुमारे १० किलोमीटरच्या परिघात आहेत. येथील फूल व हार विक्रेत्यांशी संपर्क करून विक्री व्यवस्था उभारण्यास सुरुवात केली. जरबेरा व झेंडू लागवड निशिगंधाच्या विक्रीत स्थिरता येऊ लागली. फूल व्यावसायिक जरबेरा फुलांची मागणीही करू लागले. ती ओळखून सचिन यांनी २००८ मध्ये दहा गुंठे क्षेत्रावर पॉलिहाउसची उभारणी केली. यासाठी बँक ऑफ इंडिया बँकेकडून कर्ज घेतले. तमिळनाडू येथून रोपे आणली. विक्री स्थानिक बाजारपेठेत सुरू केली. या दोन्ही फुलांबरोबर सचिन यांनी झेंडू पिकातून फुलशेतीचा आणखी विस्तार केला. सुमारे १२ वर्षांपासून ते झेंडूचा मळा फुलवत आहेत. फुलशेतीतील नियोजन
विक्री बारामती व फलटण येथे मिळून सुमारे १३ ते १४ फूल-हार व्यावसायिकांना दररोज किंवा दिवसाआड सचिन दुचाकीवरून फुले नेऊन पुरवतात. दिवसाआड जरबेराची ५० ते २०० फुले, झेंडूची १० ते ३० किलो तर निशिगंधाची मात्र दररोज १ ते ५ किलो अशी मागणी राहते. झेंडूला किलोला ३० ते ७० रुपये, जरबेरा ३ ते ५ रुपये प्रति फूल, तर निशिगंध ५० ते ७० रुपये प्रति किलो असे दर मिळतात. सणसमारंभावेळी दर व मागणी जास्त राहते. या विक्री व्यवस्थेमुळे अन्य कोठेही बाजारपेठ शोधण्याची गरज भासत नाही. दरांतील अस्थिरता त्यामुळे संपली आहे. भांडवल व अर्थकारण तीनही फुलांमधून वर्षभर उत्पन्न राहील असेच नियोजन असते. प्रत्येक व्यापाऱ्याच्या मागणीनुसार पॅकिंग केले जाते. सुरुवातीला पॉलिहाउस व शेडनेटसाठी मिळून २४ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागली. सातत्य, चिकाटीतून चांगल्या दर्जाचे उत्पादन घेत तसेच खर्चावर नियंत्रण ठेवत सचिन यांनी सुमारे चार वर्षांत कर्जाचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न केला. वडील मारुती, आई शकुंतला, पत्नी वर्षा यांनीही शेतीतील विविध कामांचा भार सांभाळला. त्यामुळेच आज सुमारे ३० ते ४० टक्के नफा फुलशेतीतून मिळवण्यात सचिन यशस्वी झाले आहेत. दोन ते अडीच एकरांतील उसाचे एकरी ५० ते ६० टनांपर्यंत उत्पादन मिळते. फुलशेतीत दररोज काम असल्याने चार मजूर कायमस्वरूपी असतात. कृषी सहायक योगेश भोंगले यांचे मार्गदर्शन मिळते. संपर्क : सचिन शिर्के, ९७६४८६९६६३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.